ये रिश्ता क्या केहलाता हैं?

    05-Oct-2023   
Total Views |
ED crackdown on Sanjay Singh


'आप’चे खासदार संजय सिंह मद्यघोटाळा प्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी म्हणे संजय राऊत त्यांच्या घरी गेले. आता राऊतांचा म्हणा काय संबंध? संजय सिंह काय मोठी देशसेवा करून समाजहित साधले म्हणून तुरुंगात गेले का? तर नाही मद्य घोटाळ्यात ‘ईडी’च्या चौकशीत संजय सिंह यांचे चारवेळा नाव आले. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर कारवाई झाली. दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणाले की, ”जे खरे बोलतात, त्यांना शिक्षा दिली जाते. पत्रकारांचे मोबाईलही जप्त केले जातात.” आदित्य ज्या पत्रकारांबद्दल बोलतात ते कोण आहेत, तर चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी कृत्य करणारे लोक. त्या पत्रकारांवर कारवाई झाली, तर आदित्य ठाकरेंना इतके वाईट वाटावे? त्यांचे सोबती संजय राऊत यांनाही या देशद्रोही पत्रकारांवर कारवाई झाली म्हणून फारच जिव्हारी लागले. देशविरोधी प्रचारप्रसार करणारे आणि प्रसारमाध्यमांचा वापर केवळ देशद्रोहासाठी करणारे लोक पत्रकार नव्हतेच, ते देशद्रोहीच म्हणायला हवेत. अशा देशद्रोही लोकांची बाजू आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांनी का घेतली?संजय राऊत पुढे म्हणाले की,”सध्या देशात आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आहे.“ राऊतांना भीती आहे की, आता सगळ्यांनाच (म्हणजे ते आणि त्यांच्या सहकार्‍यांना) तुरुंगात जायची वेळ येईल. यावर काही लोक म्हणतात की, महाराष्ट्रात ‘कोविड’ घोटाळ्यामध्ये संजय राऊतांसाठी काय वाढून ठेवले, याबाबत राऊतांना खात्री आहे. त्यामुळे आपल्या कृत्यामुळे उद्या आपल्यासोबतही असे काही घडले, तर ‘आप’वाल्यांनी आपली विचारपूस करावी, यासाठी ते संजय सिंहच्या घरी गेले. तसेच दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाने विचारपूस केली म्हणून देशभरात आपण बातम्यांमध्ये दिसू. मग काय सगळ्या वृत्तवाहिन्यांवर ‘मैं ही मैं.’ राष्ट्रीय घडामोडीत तेवढेच नाव येईल, या मुत्सद्दीपणानेही संजय राऊत संजय सिंहच्या घरी गेले असावेत. काहीही म्हणा, भ्रष्टाचारी आणि देशद्रोही लोकांबाबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना इतके प्रेम का? काही लोक म्हणतात की, समविचारी आणि समदुःखी लोक एकमेकांचे मित्रत्व शोधत असतात. अरेरे असे असेल, तर भ्रष्टाचारी संजय सिंह आणि ते देशद्रोही पत्रकार यांचे कोणते दुःख आणि विचार आदित्य आणि राऊत यांच्याशी जुळतात? ये रिश्ता क्या केहलाता हैं?


ढवळ्या शेजारी पवळ्या!



राहुल गांधी यांनी नुकतीच अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. यावर ‘एसजीपीसी’ सचिव गुरूचरण सिंह ग्रेवाल म्हणाले की, “राहुल यांच्या आजीने अकाल तख्त साहिब पाडले होते. तसेच त्यांच्या हत्येच्या पश्चात अनेक निष्पाप शिखांच्या कत्तली झाल्या होत्या.” तेव्हा राहुल यांचे पिता राजीव गांधी म्हणाले होते की, ”मोठा वृक्ष उन्मळून पडला, तर जमीन थोडी हलते.” त्यामुळे राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली म्हणजे त्यांना पश्चाताप आहे, असे मानायचे का? शिखांच्या हत्याकांडात जे काँग्रेसी नेते दोषी होते, त्यांच्याबाबत राहुल गांधी यांची भूमिका काय? राजीव गांधी यांच्या हत्येची गुन्हेगार नलिनी हिला भेटण्यासाठी प्रियांका गांधी गेल्या. मात्र, शीख हत्याकांडामध्ये विधवा झालेल्या भगिनींना भेटण्यासाटी प्रियांका गांधी गेल्या नाहीत. थोडक्यात, ग्रेवाल यांचे म्हणणे होते की, राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली, म्हणजे शीख समाज त्यांचे शिरकाण विसरला असे नाही.
पण, यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, ग्रेवाल यांनी राहुल गांधींना इतके गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही. कारण, राहुल गांधी जे काही करतात, ते केवळ आणि केवळ सत्ताप्राप्तीसाठी. लोकांना लुभावण्यासाठीचा हा एक प्रयत्न. त्यामुळेच राहुल गांधी कधी मस्त मजेत व्हीआयपी ताफा घेऊन देशभर फिरतात, मनसोक्त हिंडतात, कधी ट्रक चालवण्याची कृती करतात, चॉकलेट बनवतो असे दाखवतात. ते जिथे, तिथे कुठे जातात, तिथे आधीच त्यांच्या पीआर टीमने काय करायचे? कसे करायचे? हे अगदी आखूनरेखून ठेवलेले असते. जसे सुवर्ण मंदिरात शीख बांधव लंगरसाठी सेवा प्रदान करतात, तर सुवर्ण मंदिरात गेले की, राहुल गांधी यांनी ती सेवा पुरवण्याची नुसती कृती करायची. पवित्र लंगरसाठी अगणित लसणाच्या पाकळ्यांपैकी एक लसणाची पाकळी सोलायची. कधी भक्तांना पाण्याचा ग्लास भरून द्यायचा, तर कधी भांडी विसळायची. हे सगळे का? तर म्हणे राहुलही शीख बांधवांसारखे धार्मिक आहेत, हे दाखवण्यासाठी आणि शीख परंपरांचा आदर करतात, हे लोकांनी मानावे यासाठी. राहुल गांधींचे जे कोणी सल्लागार असतील, त्यांच्याबाबत एकच वाटते की, बिचारे राहुल गांधी सोबत आहेत म्हणून त्यांच्याइतकेच बालिश नियोजन आणि विचार करीत असतात. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.