ईशान्य भारताच्या प्रेरणादायी शौर्यगाथा

    28-Oct-2023   
Total Views |
Book Review of braverystory Book

ईशान्य भारतात जेव्हा परकीयांनी पाय रोवण्यास आणि धर्मांतरास उघड सुरुवात केली, तेव्हा तेथील टोळ्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्राणपणाने लढे दिले. त्यांच्या शौर्यगाथा कथन करणार्‍या या पुस्तकाविषयी...

भारताने आपल्या स्वातंत्र्यासाठी परकीयांशी कायमच निकराने लढला दिला. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि अरुणाचलपासून महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक संघर्षगाथा. आपल्या संस्कृतीचं, धर्माचं रक्षण करणं ही त्या लढ्यामागची मूळ प्रेरणा. राजस्थानची पद्मावती, छत्रपती शिवाजी महाराज, गोवा, वसईचे वसाहतवाद्यांशी लढा देणारे स्थानिक, मुस्लीम आक्रमकांशी लढा देणारे गुजरातचे बिंब राजघराणे अशी कितीतरी नावे आपल्या समोर येतात. परंतु, याबाबतीतही ईशान्य भारताकडे आपलं थोडंसं दुर्लक्षच झालं आहे, हे प्रामाणिकपणे आणि अपराधी भावनेने मान्य करायला हवं.

इथला समाज आजही टोळ्यांतून राहणारा. स्वतःच्या स्वतंत्र आणि विशिष्ट अस्तित्वासाठी त्याने कायमच आपल्या जीवाचे रान केले. त्यासाठी प्रसंगी घनघोर लढा दिला. आपली हार-जीत डांगोरा पिटून साजरी केली नाही. आपला पराभव आपल्यापुरता मान्य केला आणि त्याच भूमीत त्याच टोळ्यांतील अनेकांना लढण्याचे बळ देऊन, संस्कृती टिकवण्याची, झुंज घेण्याची प्रेरणा देऊन देह ठेवला. अनेक वर्षे या टोळ्या परकीयांशी लढत राहिल्या. ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण भारत भूमीवर कब्जा मिळवला. परंतु, ईशान्य भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मात्र त्यांना पाऊणशे वर्षे लागली! ’ईशान्यभारतातील अपरिचित स्वातंत्र्यलढे’ हे पुस्तक महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ, मुंबईने प्रसिद्ध केले आहे. विनायक गोगटे यांचा अनुवाद आहे. तसेच विविध लेखकांनी लिहिलेले नऊ लेख यात लिहिलेले आहेत. पुस्तकाला हरिभाऊ मिरासदार यांची सर्वंकष प्रस्तावना लाभली आहे. हरिभाऊंनी आसाम प्रांतात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहिले आहे.

स्वातंत्र्यपूर्व कालावधीत भारत संस्थानांमध्ये विखुरलेला असल्यामुळे एक एक संस्थान खालसा करणे ब्रिटिशांना सहज जमले. तसेस काहीसे ईशान्य भारतातही. इथेही स्वतंत्र टोळ्या वेगवेगळ्या लढल्याने हे स्वातंत्र्यलढे अल्पजीवी राहिले. परंतु, त्यामुळे त्यांच्या शौर्याचे मोल तसूभरही कमी होत नाही. तेव्हा हे पुस्तक वाचून त्यांच्या लढा देण्याच्या, पुढल्या पिढीला प्रेरणा देण्याच्या आणि संस्कृतीरक्षण करण्याच्या पद्धती मात्र वाखाणण्याजोग्या आहेत.
 
डॉ. अंकिता दत्त यांच्या लेखात आलेली रोपुइलियानीची गोष्ट. ही लुशाई टेकड्यांतील एक रणरागिणी. टोळी प्रमुख लाल याची ही पत्नी. पतीच्या निधनानंतर आपल्या पुत्रांच्या किंवा होऊ घातलेल्या पोटातल्या पुत्रांच्या नावाने त्यांच्या स्त्रिया राज्य करू शकत. तशीच हीसुद्धा प्रमुखपदी आली. लढली आणि तिने अक्षरश: प्राणांची शर्थ केली.

मेघालयातल्या गारो टेकड्यांतले देशभक्त यांचीही गोष्ट अशीच. करुणामय सिंह आणि ही कथा दिली आहे. खासी टेकड्यांतले टिरोट सुंग यांच्याबद्दल क्लूरसिंग लिंगडोह यांनी लिहिलेय. काही पुस्तकांमध्ये यांचे नाव तीर्थ सिंग असेही येते. चांदलोक दखऱ यांनी लिहिलेली किआंग नान्ग्बाह या जैतिया टेकड्यांवरच्या योद्ध्याची कथा. अरुणाचल प्रदेशातील अँग्लो-आदी संघर्षाची ग्रुप कॅनी मोहोंतो पांगिन्ग यांची कथा, लेफ्ट. जनरल एल निशिकांत सिंग यांनी लिहिलेली थौबलचा संग्राम म्हणजेच अँग्लो-मणिपूर युद्ध, डॉ. फिर्मी बोडो यांची वीर सेन्ग्या संबुद्धन फोंगलो एक दिमास स्वातंत्र्यसैनिक कथा, सुमित्रा मुखर्जी यांची नवतारुनी कनकलता बारूया यांची कथा, सोम कोमेई यांची हैपौउ जाडॉनांग यांची कथा, अशा एकूण नऊ कथांचा समावेश या पुस्तकात केला आहे. केवळ जमीन आणि फारशी नसलेली स्थावर संपत्ती बळकावली जातेय, म्हणून नाही तर ही सांस्कृतिक आक्रमणं आहेत, वर्षानुवर्षे बहरत आलेल्या प्रथा-परंपरा त्यांच्या चालीरितींवर गदा येतेय म्हणून घेतलेले हे लढे. ते प्रकाशात आणण्याचं मोलाचं कार्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ, मुंबई यांनी केले आहेत.

पुस्तकाचे नाव : ईशान्य भारतातील अपरिचित स्वातंत्र्यलढे
अनुवाद : विनायक गोगटे
प्रकाशक : महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ,मुंबई
स्वागत मूल्य : ११० रु.
पृष्ठसंख्या : ६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.