कुणीही सांगेल म्हणून मोर्चात सहभागी व्हायचं का?, ठाकरेंच्या मोर्चाबद्दल नेमकं काय म्हणाले शरद पवार?
27-Jun-2025
Total Views |
कोल्हापूर : कुणीही सांगेल म्हणून मोर्चात सहभागी होता येत नाही. त्यांचा मुद्दा जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात सहभागी होण्याबाबत त्यांनी हे विधान केले.
शरद पवार म्हणाले की, "मी मुंबईला गेल्यावर दोन्ही ठाकरेंचे म्हणणे काय आहे ते समजून घेणार आहे. त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, हेही त्यांनी जाहीर केले. जर सहभागी व्हायचे असेल तर नक्की त्यांचे धोरण काय, हे समजून घ्यावे लागेल. कुणीही सांगितले मोर्चात सहभागी व्हा, अशी भूमिका घेता येत नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा आणि राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "पहिली ते चौथीमध्ये हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. पण पाचवीपासून हिंदी ही त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळजवळ ५५ टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाहीये की, जी ५५ टक्के लोक बोलतात. मराठी, कानडी, मल्याळम, तामिळ या भाषांचा एक ठराविक लोकसंख्या आधार घेते. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. महाराष्ट्रातील लोक हिंदीविरोधी नाही. पण पहिली ते चौथी या वयोगटातील मुलांच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा लादणे योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्वाची आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.