‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून ‘हमास’ वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरावर भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे, जो ‘हमास’ वापरतो. सध्या इस्रायली लष्कराच्या गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त ‘हमास’ आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत, जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील.
शहरी युद्धभूमी आणि भुयारे
इस्रायल गाझावर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. लष्करी हल्ल्यासाठी इस्रायलने गाझा सीमेजवळ १ लाख, ६० हजारांपेक्षा अधिक सशस्त्र सैन्यासह, तीन लाखांपेक्षा राखीव सैन्यांनादेखील सज्ज केले आहे. परंतु, गाझाच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात लष्कर पाठवणे, ही अतिशय धोकादायक मोहीम ठरू शकते. जमिनीवरील संभाव्य हल्ला किती मोठा असेल म्हणजेच लष्कर शहराच्या किती आतमध्ये जाईल आणि किती काळासाठी, हे अद्याप स्पष्ट नाही.
इस्रायलने गाझामध्ये राहणार्या पॅलेस्टिनींना दक्षिणेतून पळून जाण्याचा दिलेला इशारा, हा त्यांच्या लष्करी कारवाईचा पुढील टप्पा जवळ येत असल्याचे संकेत आहे. स्वतःचा प्रदेश सुरक्षित करणं, हे इस्रायलसमोरील पहिलं आव्हान आहे आणि ‘हमास’च्या हल्लेखोरांना मारणं किंवा पकडणं आणि ज्यांनी सीमा ओलांडून १ हजार, ३०० हून अधिक लोकांना मारलं आणि १५० जणांना ओलिस ठेवले.
शहरी युद्ध केंद्रात सैन्याला प्रशिक्षण
इस्रायल अनेक वर्षांपासून या लढाईची तयारी करतोय. ‘मिनी गाझा’ म्हणून ओळखल्या जाणार्या दक्षिणेकडील लाखो-कोटी डॉलर्सच्या शहरी युद्ध केंद्रात ते सैन्याला प्रशिक्षण देतात. तिथे त्यांना दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आणि भुयारांच्या चक्रव्यूहांचा सामना करत कसं लढायचं याचं प्रशिक्षण दिले जाते. कारण, ‘हमास’ने एक हजारांपेक्षा अधिक इमारती आणि भुयारं बांधली आहेत. आपला उद्देश साध्य करण्यालाठी लष्कराच्या विशेष तुकड्यांना सज्ज केले गेले आहे. रणगाडे आणि शस्त्रांस्त्रांसोबतच सशस्त्र बुलडोझर हाताळणार्यांना एकत्र करण्यात आले आहे.
गाझामधील भूमिगत भुयारांचे जाळे हेच लक्ष्य
‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून ‘हमास’ वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरावर भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे, जो ‘हमास’ वापरतो. सध्या इस्रायली लष्कराच्या गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त ‘हमास’ आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत, जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील. गाझामधील भुयारांच्या नेटवर्कच्या विस्ताराचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे मानले जाते की, ही भुयारे संपूर्ण गाझामध्ये पसरली आहेत.
गाझामध्ये ५०० किमी लांबीची भुयारे
२०२१ मध्ये झालेल्या संघर्षानंतर इस्रायली लष्कराने गाझामध्ये पसरलेली १०० किमी लांबीची भुयारं नष्ट केल्याचं सांगितले होते. पण, ‘हमास’ने दावा केला होता की, त्यांनी गाझामध्ये ५०० किमी लांबीची भुयारं बांधली आहेत आणि इस्रायलच्या हल्ल्यात फक्त पाच टक्के भुयारं उद्ध्वस्त झाली होती. २००५ मध्ये इस्रायली सैन्याने आणि ज्यू स्थायिकांनी गाझामधून माघार घेतली. त्यानंतर तिथे भुयारे बांधण्याचे काम सुरू झालं. दोन वर्षांनंतर ‘हमास’ने गाझावर ताबा मिळवला आणि त्यानंतर भुयारांचे जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारू लागले. ‘हमास’ सत्तेवर येताच, इस्रायल आणि इजिप्तने त्यांच्या सीमारेषेवरून वस्तू आणि लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने आणली. म्हणून ‘हमास’ने भुयारांवर लक्ष केंद्रित करून तस्करी करणे सुरू केले. एकेकाळी गाझा खाली सुमारे २ हजार, ५०० भुयारं होती. या भुयारांमधूनच ‘हमास’ आणि इतर कट्टरतावादी संघटनांना वस्तू, इंधन आणि शस्त्रे मिळायची. पण, २०१० मध्ये इस्रायलने इजिप्तच्या सीमारेषेवर घातलेली बंधनं कमी केल्यावर, ही तस्करी कमी होऊ लागली. इस्रायलने सीमारेषेद्वारे आयातीवरील निर्बंध कमी केले.
इस्रायली सैन्य भुयारे नष्ट करण्याची मोहीम
नंतर ‘हमास’ आणि इतर संघटनांनी इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी गाझामध्ये भुयारं बांधली. २००६ मध्ये अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमारेषेखालून जाणार्या एका भुयारातून इस्रायलमध्ये घुसून दोन सैनिकांची हत्या केली होती. गिलाड शालित नावाच्या सैनिकाचे अपहरण करून त्याला पाच वर्षे कैदी बनवून ठेवण्यात आलं होतं. २०१३ मध्ये इस्रायली सैन्याने गाझा पट्टीपासून त्यांच्या एका गावापर्यंत १८ मीटर खोल आणि १.६ किलोमीटर लांबीचं भुयार शोधले होतं. त्याच्या पुढच्या वर्षी इस्रायलने गाझामध्ये घुसून ही भुयारं नष्ट करण्याची मोहीम सुरू केली, ज्यात ३० भुयारं उद्ध्वस्त झाली. बोगद्यांची माहिती मिळाल्यास इस्रायली हवाई दल त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करू शकतं. बंकर उद्ध्वस्त करणारे हे बॉम्ब जमिनीत खोलवर जातात. मात्र, यामुळे काही निष्पाप लोकांचा बळीही जाऊ शकतो.
‘हमास’ची ही भुयारं कशी आहेत?
सीमापार करण्याकरिता भुयारं अतिशय मूलभूत असतात, त्यांच्यासाठी कोणतीही तटबंदी नसते आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करणे हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु, गाझाच्या आत असलेल्या भुयारांचा उद्देश वेगळा आहे. ’हमास’ला तिथे दीर्घकाळ राहायचंय. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात, जेणेकरून तिथे दैनंदिन आयुष्य जगता येईल. तिथे त्यांचे नेते लपून बसतात. त्यांची ‘कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टीम’ही तिथेच आहे. वाहतुकीशिवाय, संवादासाठीही या भुयारांचा वापर केला जातो. त्यामध्ये वीजेची सोय आहे. भुयारे खोदण्यात ’हमास’ने नैपुण्य मिळवलं आहे, जी कला ते सीरियातील बंडखोर हल्लेखोरांकडून शिकले. गाझामधील भुयारं जमिनीपासून ३० मीटर खाली असावित आणि त्यात प्रवेश करण्यासाठी घरांच्या तळघरांमधून, मशिदी, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहूनही भुयारांमध्ये प्रवेश करता येतो.
इस्रायलचा आरोप आहे की, ‘हमास’ने गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी दिलेली कोट्यवधींची आंतरराष्ट्रीय मदत भुयारे तयार करण्याकरिता वापरली आहे. आता झालेल्या ‘हमास’च्या हल्ल्यात यापैकी काही भुयारांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. काफर आझा येथे एक भुयार सापडलं होतं, जिथे डझनभर इस्रायली नागरिक मारले गेले. इस्रायलने २०२१ मध्ये भुयारे ‘डिटेक्शन सेन्सर’ बनवले. मात्र, अनेक भुयारे इस्रायलने बनवलेल्या भूमिगत ‘अॅण्टी-टनल डिटेक्शन सेन्सर्स’पेक्षा खोल आहेत. अनेक भुयारे सेन्सरने पूर्णपणे शोधली जाऊ शकत नाही. सर्वसामान्यांना माहीत नसणारी अनेक भुयारं आहेत. भुयारं उद्ध्वस्त करताना सर्वसामान्य नागरिकांचा जीवही जाणार आहे. यामध्ये इस्रायली सैनिकांचाही समावेश असू शकतो.
गाझा पट्टीतील भुयारे सर्वात मोठा अडथळा
हल्ला होणार आहे, हे लक्षात येताच ’हमास’ सामान्य जनतेचा ढाल म्हणून वापर करतील. याच कारणास्तव इस्रायलला अनेकदा हल्ले थांबवावे लागलेत. ‘हमास’ यावेळी इस्रायली आणि अमेरिकन ओलिसांचा ढाल म्हणून वापर करू शकतो. २०२१ मधील संघर्षादरम्यान गाझा शहरातील तीन निवासी इमारती इस्रायली हल्ल्यात कोसळल्या आणि ४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा इस्रायली लष्कराचे लक्ष्य भूमिगत भुयारे होते. भुयारांच्या नेटवर्कमुळे इस्रायली लष्कराच्या तंत्रज्ञानाची आणि गुप्तचर यंत्रणेची ताकदही अपुरी पडत आहे. ‘हमास’कडे या बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये दारुगोळा भरण्यासाठी खूप वेळ मिळाला आहेत. ते इस्रायली सैनिकांना बोगद्यात घुसायला देऊन स्फोट घडवून आणण्याची पूर्ण शक्यता आहे. ‘हमास’ अचानक हल्ला करून इस्रायली सैनिकांचे अपहरणदेखील करू शकतो.
थोडक्यात, इस्रायलच्या जमिनी हल्ल्याला यश मिळण्यामध्ये आणि ‘हमास’ला पूर्णपणे बरबाद करण्यासाठी गाझा पट्टीतील भुयारे, हा सर्वात मोठा अडथळा आहे. शहरातली आणि भुयारामधील लढाईमध्ये दोन्ही बाजूंला पुष्कळ नुकसान सहन करावे लागेल आणि ही लढाई कोण केव्हा जिंकेल, हे केवळ येणारा काळच सांगू शकतो. निर्णायक लष्करी कारवाईमुळे या प्रदेशातील इस्रायलचे इतर शत्रू म्हणजेच ‘हिजबुल्ला’ आणि इराण यांनादेखील रोखणं शक्य होईल.
‘हमास’कडे पुन्हा कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची लष्करी क्षमता राहणार नाही, याची खातरजमा केली जाईल. त्यांना विरोध करणार्या २० लाख लोकांच्या सुरक्षेचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. गाझामधील लष्करी मोहिमेचा पल्ला फक्त २५ मैलांचा (४० किमी) आहे, तरीही त्याचे परिणाम काय होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाझामध्ये इस्रायलने जमिनीवरून आक्रमण करण्याशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन