नारीशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. धार्मिक, सामाजिक ओळख असलेल्या, या उत्सवात गेल्या दशकापासून महिलांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वपूर्ण असून केवळ देवी उपासना, व्रतवैकल्ये करीत असताना आजच्या नारी आता देवीमहात्म्यातील शक्ती उपासनेवर देखील भर देऊ लागल्या आहेत. किंबहुना, काळाचीदेखील तीच गरज म्हणावी लागेल. उत्सवातून आपल्या कलागुणांचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन करताना भारतीयत्व अधोरेखित करण्याचा हा काळ... बदलत्या आधुनिक काळात ब्रॅण्डिंग आणि पाश्चिमात्य शैलीच्या नावावर भारतीयांच्या बोकांडी नको, त्या गोष्टी रुजविणारी जमात नेहमी नको ते उद्योग करीत असते आणि त्याचा फायदा भारतीयांना न होता, भारतीयांच्या माध्यमातून भलतेच लोक घेत असतात आणि आम्ही ते ब्रॅण्डिंग करायला मोकळे होतो. अशा शक्तींपासून सावध राहून आता नारीशक्तीने आपल्या मूळ भारतीयत्व नारीचे ब्रॅण्डिंग इतक्या कणखररित्या करावे की, आम्ही अबला नव्हे, तर सबला तर आहोत. मात्र, कोणत्याही क्षेत्रात कमजोर नाही, हे दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. नारीने यानिमित्ताने ‘आत्मनिर्भर’ तर बनावेच; मात्र आत्मबल दर्शवित शस्त्र प्रशिक्षणातदेखील निपुण होऊन आपल्या पुढील पिढीतील नारीसाठी आदर्श ठेवावा. तसेच आपल्याकडे वाईट नजरेने, हेतूने बघणार्यांसाठी धाकदेखील निर्माण करावा. नवरात्रीत जी देवींची नऊ रूपे सर्वत्र दिसतील, तेव्हा तिची आराधना करताना, या तिच्यातील शक्तीचा तिने लढलेल्या असुरांविरुद्धच्या लढायांतून प्रेरणा, स्फूर्ती घेत आजच्या आधुनिक नारीने, या उत्सव काळात बोध घेत भविष्यात आपल्यापुढे उभ्या ठाकणार्या संभाव्य संकटांचादेखील वेध घेणे गरजेचे.या देशात महिलांना आत्मरक्षणासाठी शस्त्र प्रशिक्षण देणे, ही काळाची गरज आहे, हे यानिमित्ताने येथे आवर्जून नमूद करावे वाटते. पुण्यात नव्या वर्षात अशा महिलांसाठी येथील एक रणरागिणी शस्त्रविषयक प्रशिक्षणाचे भव्य नियोजन करीत आहे. तेव्हा हा महिलांचा उत्सव केवळ नाच गाण्यापुरता न राहता प्रबोधन करणारा ठरावा, हीच इच्छा.
आपल्या देशात आणि विशेषतः राज्यात अलीकडील काळात महिलांसाठी अनेक विधायक उपक्रम शासकीय आणि सामाजिक पातळीवरदेखील राबवून महिलांचा आत्मविश्वास वाढेल, असे निर्णय होताना दिसतात. ‘ऑलिम्पिक’मधील किंवा गेल्या आठवड्यात आटोपलेल्या ‘आशियाई’ खेळातील महिलांचे देदीप्यमान यशही याच प्रयत्नांचा परिपाक आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. पुण्यातील दोन लेकींनी तर या ’आशियाई’ स्पर्धेत सोनेरी कामगिरी केल्याने पुणेकरांचा आनंद, अभिमान नक्कीच विशेष आहे. स्नेहल शिंदे हिने आपल्या परिवारासोबत दगडूशेठ गणपतीची आरती करून हा आनंद समर्पित केला. तिच्या पुणेकर चाहत्यांनी अतिशय निनादत तिची भव्य मिरवणूक काढून, या जल्लोषात सहभाग घेतला. ऋतुजा भोसले हिनेदेखील आपल्या सोनेरी कामगिरीचा आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या ‘लाडकी लेक योजने’चेदेखील जल्लोषात स्वागत पुणेकर भगिनींनी केले.विशेष बाब म्हणजे, कोणताही भेदभाव न करता, हा महिलांचा सन्मान देशात आपल्या राज्यात होत असल्याने ती केवळ सन्मानाची औपचारिकता उरत नाही, तर एकूणच महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव आपण सगळे जण साजरा करीत असतो आणि त्याचवेळी तो यातून प्रेरणा घेऊन भावी पिढीतील महिलांसाठीदेखील एक स्फूर्तीचा क्षण कर्तृत्वात सिद्ध करण्याची संधी निर्माण करणारा असतो. देशाच्या राष्ट्रपतीपदावर वनवासी महिलेला स्थान देणे, ही केवळ त्याच नव्हे, तर सर्वच समाजातील महिलांच्या उत्तुंग स्वप्नांना बळ देणारी ऐतिहासिक घटना. आपल्या देशातील महिलांसाठी असे स्फूर्तिदायी क्षण नित्य निर्माण केले पाहिजेत. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने तर महिलांना मोफत एसटी प्रवास हा निर्णय घेऊन त्यांच्या कर्तृत्वाला चालना देण्याची कृती केली.एकूणच महिलांच्या कर्तृत्वाचे गोडवे आपण गायला सज्ज असेल पाहिजे. मात्र, नारी अबला आहे, ही नीच मानसिकता समाजात घेऊन मिरवणार्या प्रवृत्ती एकत्र येऊन ठेचण्याची वेळदेखील आली आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली स्त्रीचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती आपल्या देशाच्या संस्कृतीला आणि एकूणच व्यक्तित्त्वला शोभणारी नाही, हे सर्वांनी तिचे कर्तृत्व समजून घेऊनच लक्षात घ्यावे.