संयुक्त राष्ट्रवाल्यांना मार्गदर्शन करा

    08-Jan-2023   
Total Views |
sanjay raut
आमचे द्रष्टे आम्हाला काय काय बोलले, हे आम्हाला नारायण सांगणार आहे, शिरसाट पण म्हणाला की, नारायण जे बोलला ते खरे आहे. काय बरं आमचा ‘नॉटी’ आम्हाला म्हणाला असेल? हं त्यालाच विचारतो, “ऐकलं का द्रष्टे, काय म्हणतात, ते शिंदे गट वाले? काय म्हणतात, ते ‘कमळा’मध्ये गेलेले लोक, आम्हाला काय कळते? आमच्या माघारी आमच्याबद्दल असं बोलायचात? तुमच्या माघारी आम्ही तुमची आठवण म्हणून सभेत एकदा खुर्ची ठेवली होती.” वांद्रेचे साहेब अस्वस्थ होऊन येरझारा घालत द्रष्ट्यांना विचारत असतात. त्यांची अस्वस्थता पाहून द्रष्टा ‘काय बाई सांगू? कसं गं सांगू?’ भावगीताच्या धर्तीवर मनात म्हणू लागतात, “काय साहेब सांगू? कसं मी सांगू? मलाच माझी वाटे भीती, नवे नवे वाद, चर्चा करून, एकनाथ देवेंद्र छळती किती...” इतक्यात साहेबांचा पुन्हा प्रश्न, “सांगा काय म्हणायचात?” मग द्रष्टे आवाजात दुनियाभरचा मस्का टाकून म्हणतात, “काही नाही. मी म्हणायचो की, आमच्या साहेबांना भेटण्यासाठी रशियाचा पुतिन, अमेरिकेचा बायडन उत्सुक आहेत. मी त्यांना म्हणालो की, चीनमध्ये कोरोना वाढलाय, तर शि जिनपिंगसुद्धा आमच्या साहेबांना भेटायचं आहे, अशी विनंती करतो. कारण, आमचे साहेब आहेतच ‘कोविडोलॉजिस्ट. साहेब या जिभेने फक्त तुमची स्तुती केली. अगदी तुमच्या गेलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीची शपथ.” साहेबांना कसं बनवलं हे पाहून खुश होत द्रष्टा मनात म्हणतो, “मी तर नेहमीच म्हणतो, डॉक्टरला काय कळतं? कंपाऊंडरलाच अक्कल असते. तसेच पक्षाच्या अध्यक्षाला काय कळते, जे कळते ते माझ्यासारख्या त्याच्या हाताखालच्या प्याद्याला कळते.” इतक्यात साहेब पुन्हा आवाज देतात. “काय म्हणालात का द्रष्टे?” यावर द्रष्टे म्हणतात, “काही नाही. कोरियाहून किम जोंग म्हणत होता की, जेव्हा साहेबांना भेटायला पुतिन आणि बायडन येथील तेव्हा माझा पण नमस्कार सांगा. साहेब जगभरचे नेते तुमची पायधूळ घेण्यासाठी तडफडत आहेत. म्हणून ते ‘कमळ’वाले आणि शिंदे गटवाले जळतात. त्यांचे काही ऐकू नका.” इकडे साहेब विचार करतात, या विषयाला घेऊन ‘फेसबुक लाईव्ह’ यावे का? की द्रष्ट्यांना सांगून ही पानभर मुलाखत घ्यायला लावू? काय करावे? तर दुसरीकडे द्रष्टे सुटकेचा निश्वास सोडत मनातच म्हणतात, “मी यांना काय म्हणायचो, हे सत्य बाहेर येण्याआधी आणखीन काहीतरी खोटी स्तुती करायला हवी.” द्रष्टा म्हणतात, “साहेब मी काय म्हणतो संयुक्त राष्ट्र संघवाल्यांना जरा मार्गदर्शन करता का?”
विरोधी पक्ष सध्या काय करतो?


भारताचा विरोधी पक्ष सध्या काय काम करत आहे? ‘ती सध्या काय करते’ या प्रश्नासारखाच हा प्रश्न अधांतरी आहे. तसेच भारतात विरोधी पक्ष म्हणून जे काही भाराभर पक्ष एकत्रित आले आहेत, त्या पक्षामधला प्रमुख नेतृत्व करणारा पक्ष कोण, हे समजल्याशिवाय आपण सांगूच शकत नाही की, भारतात सध्या विरोधी पक्ष काय करतात? तसे पाहायला गेले, तर हे सगळे पक्ष मिळून एक समान एक कलमी कार्यक्रम राबवतात, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेष. तसेच या सगळ्या पक्षांचे एक समान स्वप्न आहे. समान ध्येय आहे. ते म्हणजे, त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्याने पंतप्रधान बनावे. काँगेस असो की राष्ट्रवादी, बसपा असो की सपा, दक्षिण भारतातील छोट्या-छोट्या प्रांतिक पक्षांनाही हेच वाटते. दुसरीकडे तृणमूलच्या ममता अगदी गेला बाजार सेनेच्या ठाकरेंनाही हे वाटतेच की, आपल्यापेक्षा पंतप्रधान पदाचे दुसरे कोणी लायक उमेदवार असूच शकत नाही. त्यांचाही विषय बाजूला राहू द्या, इथे कम्युनिस्ट पक्षालाही सारखे स्वप्न पडते की, येणार्‍या प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष दारुण पद्धतीने हरतोय आणि कम्युनिस्ट पक्ष देशातला सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष बनतोय. असतात एकेकाची कधीच न पूर्ण होऊ शकणारी स्वप्न. असो, पण त्यामुळेच हे सगळे पक्ष सत्ताधारी पक्षासमोर विरोधी पक्ष म्हणून एकत्र उभे राहतात. मात्र, विरोधी पक्ष म्हणून एकत्र उभे राहतानाही त्यांच्या त्यांच्यात प्रचंड दुरी, संघर्ष असतो. आपल्या आपापसातल्या संघर्षात हे सगळे पक्ष भारतीय जनतेपासून कोसो दूर गेले. पण याबद्दल या कोणत्याही विरोधी पक्षाला बिलकुल खंत नाही. उलट या सगळ्या विरोधी पक्षांना वाटते की, पंतप्रधान बनणे सोपे आहे. मोदींना शिव्या शाप द्यायचे, भारतीय इतिहासाला उकरून काढत वाद पेटवायचे की झाले काम. असे केले की, मोदींच्या सत्तेत भारताचा झालेला आर्थिक तसेच पायाभूत सुविधांचा विकास यावरून जनतेचे लक्ष हटेल. मोदी सत्तेत एकत्र आलेले भारतीय हिंदू पुन्हा जातिपातीत विभागतील. मग तर आणखीन काम सोपे. भाजपला एकगठ्ठा मतदान होणारेच विभागले, तर भाजप जिंकणार नाही. मग मोदी सत्तेत येणार नाहीत. मग सत्तेत कोण येणार तर आम्हीच. मग पंतप्रधान कोण होणार? आमचा नेता. पण जेव्हा पंतप्रधान आमचा नेता होणार हा विषय येतो तिथेच विरोधी पक्षाची मोट गळून पडते अन् आमचा नेता म्हणजे आमच्या पक्षाचाच नेता, या वादावादीवर विरोधी पक्षातले सगळे राजकीय पक्ष उतरतात.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.