...म्हणूनच हा सारा खटाटोप!

    03-Jan-2023   
Total Views |
MB.rajesh contrivrsal statement on shankaracharya


केरळामधील डाव्या सरकारचा हेतू काम कमी आणि बडबड जास्त असाच दिसून येतो. देशभरात दाणादाण उडूनही डाव्या विचारधारेच्या काही नेत्यांची हिंदूविरोधी मानसिकता आजही ‘जैसे थे’च म्हणावी लागेल. हिंदूंविरोधात बोला आणि खुर्चीवर राहा, असाच डाव्यांचा अजेंडा आहे की काय, अशी शंका निर्माण होते. आताही केरळ सरकारमधील मंत्री तथा डावे नेते एम. बी. राजेश यांनी आदिगुरू शंकराचार्यांबाबत वादग्रस्त विधान केले. “शंकराचार्य हे मनुस्मृतीवर आधारित क्रूर वर्णव्यवस्थेचे समर्थक होते,” असे वादग्रस्त वक्तव्य राजेश यांनी केरळमधील वर्कला येथील शिवगिरी मठातील एका कार्यक्रमादरम्यान केले. श्री नारायण गुरुदेव आणि शंकराचार्य यांची तुलना करत असताना त्यांनी शंकराचार्यांना जातीव्यवस्थेच्या बाजूचे असल्याचे सांगत समाजातील जातीव्यवस्थेचे अनेक लोक बळी ठरले असून याला शंकराचार्यही जबाबदार असल्याचे सांगितले. केरळमध्ये जर कोणी आचार्य असेल, तर ते शंकराचार्य नसून श्री नारायण गुरू आहेत, असेही मंत्री म्हणाले. राजेश यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राजेश यांच्या वक्तव्याचा निषेध करत वेदांत तत्त्वज्ञानी आदि शंकराचार्य आणि संत व समाजसुधारक श्रीनारायण गुरू हे दोघेही देशाच्या एकाच परंपरेतील आहेत. परंतु, राजेश हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, राजेश यांच्या विधानातून प्राचीन भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानाप्रती कम्युनिस्टांची असहिष्णुता स्पष्टपणे दिसून येते. विशेष म्हणजे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंडित एस. चिदानंदपुरी स्वामी यांनी अलीकडेच शंकराचार्य आणि श्री नारायण गुरुदेव यांच्या कार्यातील साम्य निदर्शनास आणून देत दोघांना ‘समान’ म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे डाव्यांचा संताप झाल्याचे दिसत आहे. अद्वैत वेदांताचे ज्ञान आणि तत्त्वज्ञानात आदि शंकराचार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांची तत्त्वेही त्यांनी सांगितली. आदि शंकराचार्य हे तत्त्वज्ञ म्हणूनदेखील ओळखले जातात. एकता आणि अध्यात्माबद्दल त्यांच्या विचारांची आजही प्रशंसा केली जाते. परंतु, हिंदू विरोधाशिवाय डाव्यांचे पान हलत नाही, म्हणूनच हा सारा खटाटोप यांना करावा लागतो, हेच खरे!

कर्नाटकात दक्षिण अयोध्या


'मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नही बतायेंगे’ अशी हेटाळणी करणार्‍यांना मोदी सरकारच्या कार्यकाळात सणसणीत प्रत्युत्तर मिळाले. सध्या मंदिराचे काम अतिशय वेगाने सुरू असून पायाभरणीचे काम पूर्णदेखील झाले आहे. त्यामुळे अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर असावे, हे कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. अयोध्येत रामलल्लाच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम जोरात सुरू असले तरीही आता कर्नाटकमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. कर्नाटक सरकारने रामनगर जिल्ह्यातील प्राचीन रामदेवरा बेट्टा मंदिर अयोध्येप्रमाणेच भव्य-दिव्य बनवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. या मंदिराच्या उभारणीबाबत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी रामदेवरा बेट्टा येथे राममंदिर बांधण्याचा निर्णय राज्याच्या पुढील अर्थसंकल्पात जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. जसे उत्तर भारतात अयोध्येत राममंदिर बांधले जात आहे, त्याचप्रमाणे कर्नाटकातही राममंदिर बांधले जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्नाटकात येतील आणि मंदिरासाठी राखून ठेवलेल्या जमिनीची पाहणी करतील. याआधी सीएन अश्वथ नारायण यांनी मुख्यमंत्री बोम्मई आणि मंत्री शशिकला जोळे यांना पत्र लिहून मंदिर बांधण्याची मागणी केली होती.रामदेवरा बेट्टा येथील एंडोमेंट विभागाची १९ एकर जमीन श्री राम मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले होते. रामदेवरा बेट्टा मंदिर त्रेतायुगात वानरराजा सुग्रीवाने बांधले होते. सुग्रीवानेच मंदिरात भगवान श्रीरामाची मूर्ती बसवली. इतकंच नाही, तर प्रभू श्रीरामांनी वनवासात माता सीता आणि लक्ष्मणासोबत एक वर्ष इथे घालवल्याचे स्थानिक लोक मानतात. या मंदिराच्या बांधकामामुळे उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही अयोध्यानगरी उभी राहणार आहे. मात्र, जेडीएस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या चांगल्या निर्णयावर नाराजीचा सूर आळवला आहे. “मी स्वतःदेखील मंदिर बांधू शकतो. त्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला कर्नाटकात आणण्याची गरज नाही. कर्नाटक दिवाळखोर झालेले नाही,” अशा शब्दांत कुमारस्वामींनी चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचेच काम केले. पण, ते काही का असेना, कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय मात्र कोट्यवधी हिंदूंना नक्कीच सुखावणारा आहे, हे नक्की.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.