मुंबई (प्रतिनिधी) : धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील तलावात गेल्या आठवड्यापासून मगरीचा वावर दिसत आहे. उद्यानातील कर्मचाऱ्यांना तलावाच्या परिसरात मगरीचे दर्शन घडत आहे. यासंदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आली असून बचाव कार्य राबवण्यात येणार आहे.
मगर हा प्राणी प्रामुख्याने आफ्रिका , आशिया , अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या उष्ण कटीबंधीय प्रदेशात आढळतात. मुंबईतील पवई आणि तुळशी तलावात मगरींचे वास्तव्य आढळते. मगर हा सस्तन प्राणी असून त्याचा अधिवास प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळून येतो. काही वेळा खाऱ्या पाण्यातही मगरींचा अधिवास आढळून येतो. मगर हा थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे तो उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतो. मगरींमधील मार्श क्राॅकोडाईल प्रजातीच्या मगरीचे दर्शन गेल्या आठवड्यात महाराष्ट्र निसर्ग उद्यानात घडत आहे. यापूर्वीही ऑक्टोबर, २०२२ मध्ये उद्यानाला लागून असणाऱ्या मिठी नदीच्या दलदलीवर मगर आढळून आली होती. पवई तलावातून उगम पावणाऱ्या मिठी नदीत तलावामधूनच मगर आल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावेळी वन विभागाला भरतीमुळे मगरीच्या बचावकार्य करता आले नव्हते. त्यानंतर आता चार महिन्यांनी निसर्ग उद्यान परिसरात पुन्हा एकदा मगरीचा वावर दिसू लागला आहे.
गेल्या आठवड्यापासून निसर्ग उद्यानामध्ये असणाऱ्या तलावात मगरीचे दर्शन घडत आहे. शीत रक्तीय असलेला हा प्राणी उन्ह शेकण्यासाठी म्हणून तलावाच्या काठावर आलेला असताना उद्यानातील कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे. साधारण पाच फूटांची ही मगर पावसाळ्यात नदीची पातळी वाढल्यानंतर या तलावात आल्याची शक्यता आहे. या तलावाला कुंपण असल्यामुळे तसा कुठलाही धोका नाही. मात्र, वन विभागाच्या पथकामार्फत तत्काळ या मगरीचे बचाव कार्य करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.