रग रग हिंदू मेरा परिचय!

    16-Jan-2023   
Total Views |
नरेश मराड


‘हिंदू तन-मन हिंदू मेरा परिचय’ अशी साक्ष देत, वारली समाजाचे प्रबोधन करणारे आणि स्वत:च्या आयुष्याचा उत्तम आदर्शच निर्माण करणारे नरेश मराड यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...


वारली समाजाचा प्रचंड विश्वास कमावलेले नरेश. नरेश मराड सध्या जव्हार येथे डेंगाची मेट गावातील एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तसेच ते जनजाती विकास मंच, पालघरचे जिल्हाध्यक्ष आहेत. या सर्वांपलीकडे नरेश आपली ओळख देतात ती म्हणजे, ‘मी हिंदू’ आहे हीच!नरेश हे मूळ डहाणूच्या धुंदलवाडीचे, वारली समाजाचे. त्यांचे वडील देवल्या मराड आणि आई लक्ष्मी. दोघांना तीन अपत्ये. त्यापैकी एक नरेश. लक्ष्मीबाई वारली चित्रकलेत पारंगत. पाड्यात कुणाच्याही घरी मंगलकार्य असले की, तिला बोलावले जाई. मग तिच्यासोबत लहानगे नरेशही जात. समाजातल्या विधी-परंपरा आणि त्यामागचे निसर्गशास्त्र हे लहानपणापासूनच नरेश शिकले. आयुष्यातील सगळ्या समस्या म्हणजे आपल्या आयुष्याचा भागच आहेत आणि त्यांना हसत हसत सामोरे गेले पाहिजे, हीच शिकवण नरेश आणि इतर सगळ्याच समाजाला देतात.

नरेश जेव्हा इयत्ता दुसरीत शिकत होते, तेव्हाच त्यांनी चणे आणि वाटाणे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय तरी कसा म्हणायचा? कारण, एक किलो चणे-वाटाणे आणून ते गावात विकायचे. पाड्यात किंवा गावात कुणाला काही बाजारातून आणायचे असल्यास अर्धा तास चालत जावे लागे. अशावेळी नरेश बाजारात जाऊन त्यांना हवे ते आणून देत असत. अर्धा तास बिनाचपलेचे चालणे. तेही दिवसातून किती वेळा बाजारात जात, तर कमीत कमी दहावेळा. बाजारातून वस्तू आणून दिली की, मग ती व्यक्ती नरेशना पाच पैसे देई. ते पैसे साठवून साठवून त्यांनी मग बाजारातून किलोभर चणे आणि वाटाणे आणले. मिठाच्या पाण्यात उकडवले आणि विकले. प्रचंड ‘नाही रे’ परिस्थितीमध्येही ते दहावी उत्तीर्ण झाले. त्याच काळात गावातूनच कळले की, भाईंदर येथे पूल बांधत आहेत आणि त्या कामासाठी मजूर हवे आहेत.

 नरेश यांना शिकायचे होते. मात्र, पैसे नव्हते. त्यामुळे ते भाईंदरला आले. मजूर म्हणून तीन महिने काम केले. पुढे नरेश यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. डहाणूला विश्व हिंदू परिषदेच्या वसतिगृहात ते राहू लागले. पहिलाच दिवस होता. ते महाविद्यालयातून वसतिगृहात आले आणि कळले की, वसतिगृहावर कम्युनिस्टांनी हल्ला केला, तोडफोड केली. वसतिगृहाची आईच्या मायेने काळजी घेणार्‍या सगळ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यात अप्पा जोशी गंभीर जखमी झाले.गरीब-वनवासी मुलांचे आयुष्य घडवणार्‍या वसतिगृहावर आणि संबंधित माणसांवर हल्ले करणारे किती समाजविघातक असतील, असा विचार त्यावेळी नरेश यांच्या मनात आला. वसतिगृह पुन्हा उभे राहणे गरजेचे होते. गावकर्‍यांकडून सहकार्य मागण्यासाठी दुसर्‍या दिवशी वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांसोबत नरेश गावात गेले. काही मिनिटांतच गावातील 50-60 तरूण एकत्र झाले. त्यांनी भरघोस मदतही केली. ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. यामध्येच स्वयंसेवक गोपीनाथ अंभीरेही होते.

नरेश यांचा त्यांच्याशी चांगला स्नेह जमला. नरेश यांना भेटायला ते वसतिगृहामध्ये येऊ लागले आणि सणासुदीला नरेशलाही ते घरी बोलवू लागले. श्रीमंत-गरीब, जातपात कसलाच भेदभाव न बाळगणारे संघ स्वयंसेवक आणि वसतिगृहात येणारे संघाचे प्रचारक नितीन कुलकर्णी, गिरीश जोशी, नंदू गिरजे यांचा नि:स्वार्थी सेवाभाव आणि समाजशीलता पाहून नरेश भारावले. समाजात असेही लोक असतात, अशीही संघटना असते, याचे त्यांना अप्रूप वाटले. याच काळात अयोध्या राम मंदिरासाठी कारसेवेला जाण्याचे ठरले. प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीचे दर्शन घ्यावे, म्हणून नरेश ही गोपीनाथ यांच्यासोबत गेले. अयोध्येपर्यंतच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या प्रत्येक कारसेवकाने लहान भावासारखी त्यांची काळजी घेतली. संघ स्वयंसेवकांची ही निखळ माणुसकी आणि देश आणि धर्मनिष्ठा पाहून नरेश यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला.

अयोध्येमध्ये बाबरी ढाँचा पाडला गेला, त्यावेळी ते ‘जय श्रीराम’चा नारा देत पुढे होते. नरेश यांच्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण नाही. पुढे परतल्यावर महाविद्यालयातल्या प्राचार्य मीना फाटक यांनी त्यांना बोलावले. महाविद्यालय काही रा.स्व.संघाच्या विचारांचे नव्हते. कदाचित 13 दिवस गैरहजर होतो म्हणून आपल्याला शिक्षा मिळेल, असे नरेश यांना वाटले. पण, प्राचार्य मीना फाटक यांनी त्यांचा गौरव केला. प्रत्येकाला त्यांनी सांगितले की, “बघा, आपला विद्यार्थी अयोध्येला कारसेवेला, प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेसाठी गेला होता.” समाजाकडून आणि मान्यवरांकडून त्यांना पाठिंबा मिळाला होता.

याच काळात नरेश संघाच्या शाखेत जाऊ लागले. ही त्यांना प्रेरणाच होती. पुढे नरेश बी.ए. झाले. धुळे येथे संघाचे प्रचारकम्हणून गेले, याच काळात बी.पी.एड्ही शिकले. त्यानंतर त्यांना विक्रमगड येथे शिक्षकाची नोकरी लागली. पुढे ते जव्हार येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणूनही नियुक्त झाली. नरेश यांचे आयुष्य स्थिर झाले होते. मात्र, समाजात प्रचंड उलथापालथ होत होती. समाजविघातक शक्ती भोळ्याभाबड्या समाजाला चिथवत होती. कित्येक जणांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे सोडले होते. हे का? याचा अभ्यास नरेश यांनी केला. वनवासी समाजातील समविचारी तरुणांनी मिळून मग ‘जनजाती विकास मंचा’ची स्थापनाकेली. नरेश पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. आपण हिंदूच आहोत, याचे सबळ पुरावे देण्यासाठी नरेश यांनी प्रचंड संशोधन केले. समाजातील मुलांमधून खेळाडू तयार करण्यासाठीही नरेश यांनी अथक प्रयत्न केले. ते म्हणतात, ”हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग-रग हिंदू मेरा परिचय।” नरेश मराड यांच्यासारखे लोक समाजासाठी दीपस्तंभ असतात, हे नक्की!






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.