फ्रान्समधील इमामाचा ज्यूद्वेष

    08-Sep-2022   
Total Views |
france



फ्रान्स सरकारने हा विद्वेष मोडून काढायचा ठरवले. त्यानुसारच इमाम हसनला देशाबाहेर हकलवण्यात आले. तरीही जगाच्या इतिहासात ज्यूंविरोधात, ख्रिश्चनांच्या विरोधात मुस्लीम असा द्वेषाचा एक त्रिकोण कायम आहे. या त्रिकोणाला ऐतिहासिक आणि धार्मिक रंग आहे. त्यामुळे युरोपातील ज्यू समुदायाचे जगणे आजही बिकट आहे.

इमाम हसन याला फ्रान्सच्या न्यायालयाने देशातून निघून जाण्याची शिक्षा सुनावली आहे. इमाम हसन हा फ्रान्समध्ये राहायचा, पण तो मुळचा मोरक्कोचा नागरिक. आता फ्रान्सहून त्याला मोरक्कोला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यावर फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमैनिन यांनी या घटनेला फ्रान्सच्या लोकशाहीचा विजय म्हंटले आहे. इमाम हसन याने जून महिन्यात प्रसार माध्यमांद्वारे ज्यू समाजाविरोधात द्वेषयुक्त वक्तव्य केले होते. 



त्यामुळे फ्रान्समध्ये समाजात दुही माजून ज्यू समाजाविरोधात दंगलसदृश्य वातावरण तयार झाले होते. त्यावेळी इमाम हसन याच्यावर कारवाई करण्यात आली. इमामने स्वत:च्या बचावासाठी फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, फ्रान्समध्ये जन्मलेल्या, परंतु मोरक्को देशाचेहीनागरिकत्व असलेल्या इमाम हसन याने तत्काळ देश सोडून चालते व्हावे!


इमाम हसन याने युट्यूबच्या माध्यमातून ज्यू समुदायाबद्दल बरेच आक्षेपार्ह विचार मांडले होते. आधीच फ्रान्समध्ये स्थानिक ख्रिस्ती आणि मुुसलमान यांच्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला. त्यात आता इमामने ज्यू समाजाविरोधातही द्वेषाचे वातावरणपेटवले. इमामवर कारवाई झाल्याने फ्रान्समध्ये न्यायालयाीन निवाड्याचे अभिनंदन केले जात आहे. तसेही फ्रान्समध्ये राष्ट्रपती इमॅन्युएल मेक्रॉन यांनी जिहादी दहशतवाद्यांविरोधात मोठी आघाडी उभारली होती.


फ्रान्सचे जनमतही या दहशतवाद्यांना विरोध करते. फ्रान्स सरकारने ७६ मशिदींवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. यापूर्वीही फ्रान्सने कशाचीही तमा न बाळगता दहशतवाद मुळापासून उखडून फेकण्यासाठी अनेक निर्णय घेतले. जिथे जिथे धार्मिक असहिष्णूता किंवा अतिशय टोकाची कट्टरता दिसते, अशा सगळ्याच गोष्टींना फ्रान्सला कायद्याने बंदी केली.


असो, तर गाझा पट्टीतील ज्यू-मुस्लीम संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यूंचा देश म्हणजे इस्रायल. या देशाला विरोध करण्यासाठी तमाम मुस्लीम देश एकवटतात. मात्र, तरीही इस्रायल काबूत येत नाही. यामुळे अनेक दहशतवादी संघटनांनाही दुःख वाटते. या संघटनांचे अप्रत्यक्षरित्या बौद्धिक पाठबळ असणारे लोकही आहेत.


ते जगभरात धार्मिक किंवा सामाजिक बुरखा घेऊन वावरतात, लोकांमध्ये मिसळतात, त्यांचा विश्वास संपादन करतात. त्याद्वारे अनुयायी किंवा गोतावळाही जमवतात. त्यानंतर मग ते ज्यू समुदायाविरोधात विष पेरायला सुरुवात करतात. इमाम हसनची कारकिर्दही यापेक्षा वेगळी नसावी, असे अभ्यासकांचे म्हणणे.

जागतिक घडामोडींचा अभ्यास करणार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत फ्रान्समध्येच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये ज्यू समुदायाविरोधात द्वेष वाढला. ‘युरोबैरोमीटर’ संस्थेने युरोपमध्ये ज्यू समाजाबाबत सर्वेक्षण केले, त्यात ५० टक्के जनतेने मत मांडले होते की, ज्यू समुदायाविरोधातली भावना ही देशासमोरची एक समस्या आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले की, जर्मनीमध्ये ७१ टक्के लोकांनी ज्यू समाजाविरोधात वातावरण आहे, असे कबूल केले.


जर्मनीमध्ये आजही यहुदी समाजाच्या वस्ती, शाळा आणि प्रार्थनास्थळांना सुरक्षा द्यावी लागते. युरोपमधील ज्यू समाजाच्या स्थितीबद्दल युरोप संघानेही चिंता व्यक्त केली. इस्रायल अमेरिकेनंतर फ्रान्समध्येही ज्यू समुदाय मोठ्या संख्येने राहतो. २०१९ साली फ्रान्सच्या अल्तास शहरात ज्यूंच्या कबरीवर हल्ला झाला होता. ८० कबरींची तोडफोड झाली होती, तर काही कबरींवर उलट्या स्वस्तिकचे चित्र काढले होते, जे नाझींचे प्रतीक होते. काही वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये ज्यू तरुणाचा खूनही झाला होता.


त्या हल्ल्याचा निषेध करत समाजाच्या सामंजस्याचे प्रतीक म्हणून फ्रान्स सरकारने दोन झाडे लावली होती. ती फ्रान्समधील यहुदी समुदायाच्या सुरक्षिततेची प्रतीक होती म्हणे. पण, २००६ साली यातले एक झाड कुणीतरी कापून काढले. एक ना अनेक प्रतिकात्मक घटनांचा आधार घेत फ्रान्स आणि मुख्यत: जर्मनीमध्ये ज्यू समुदायाबद्दलचा द्वेष प्रकट केला जातो. फ्रान्स सरकारने हा विद्वेष मोडून काढायचा ठरवले. त्यानुसारच इमाम हसनला देशाबाहेर हकलवण्यात आले. तरीही जगाच्या इतिहासात ज्यूंविरोधात, ख्रिश्चनांच्या विरोधात मुस्लीम असा द्वेषाचा एक त्रिकोण कायम आहे. या त्रिकोणाला ऐतिहासिक आणि धार्मिक रंग आहे. त्यामुळे युरोपातील ज्यू समुदायाचे जगणे आजही बिकट आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.