हैं कोई हमारे टक्कर का?

    26-Sep-2022   
Total Views |

uddhav thackeray
 
 
 
दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली म्हणजे जिंकलोच म्हणायचे. आता दिल्ली दूर नाही. नाही... नाही... दिल्ली नाही म्हणायचे. कारण, अफजुल्या-औरंग्या हे दिल्लीतून येतात, असे आम्ही खूप वेळा म्हणतो. पण दिल्ली बाकी आम्हाला हवी आहे. आम्ही काका-पुतणे दिल्लीला असे चीत करू. हं... काका कितीही नाही म्हणाले, तरीसुद्धा त्यांच्या मनात अजूनही दिल्ली आहे. आम्ही लाल किल्ल्यावरून भाषण करणे हे लाल किल्ल्याच्या सौभाग्यात आहे का? आम्ही कोण म्हणजे काय?
 
 
 सगळी आयुधं, अस्त्रं, शस्त्रं आमच्याकडे आहेत बरं! वाघनखं म्हणू नका की आणखी काही. आमच्या जिभेवरही शिवराळ भाषेचे साम्राज्य आहे. काय म्हणता, मराठी भाषा अमृताशीही पैजा जिंकत असताना आमच्या तोंडून नेहमी असे गलिच्छ आणि काहीबाही शब्दच का बाहेर पडतात? तीच तर आमची खासियत आहे. हे असले शब्दच तर आमचे सामर्थ्य, वैभव आहे. असे शब्द उच्चारले की, किती चर्चा होते? प्रसारमाध्यमांवर आम्हीच असतो. त्याचे सर्व श्रेय या असल्या शब्दांना आहे. किंबहुना हे सत्य आम्ही पार आधी उमगलो होतो. त्यामुळेच तर स्वत:ची ताकद ओळखून आम्ही कोरोना काळात ‘फेसबुक लाईव्ह’ करून कोरोनाशी युद्ध करण्यास सिद्ध झालो. असे ‘फेसबुक लाईव्ह’ केले की, त्याला तोडच नाही.
 
 
त्या काळात आमच्या ‘फेसबुक लाईव्ह’वरील शब्दसंपदा किती प्रसिद्ध झाली होती, आठवते का? आता तर काय अख्खे शिवाज पार्कच जिभेवर... नाही नाही... हातात आले. बघा, असे शब्द वापरतो, असे बोलतो की, त्याची चर्चा लोक करत राहतील. काय म्हणता?इतक्या पद्धतशीरपणे अशक्य कोटीतले सत्तांतर महाराष्ट्रात घडवून आणणार्‍यांनी सहजासहजी शिवाजी पार्क कसा सोडला असेल?
 
 
काय म्हणता, जिथे शिवसेनाप्रमुखांची जाज्वल्य भाषणं व्हायची तिथे जावाजावांमध्ये, नणंदा-भावजयामंध्येही होणार नाही अशी आमची टोमणेबाजी लोकांनी ऐकावी, ती ऐकून आrahul gandhi, bharat jodsमची समज, बुद्धी अनुभव लोकांना पुन्हा एकदा कळावा, असा त्यांचा डाव आहे? मग होऊन जाऊ दे. मी दसरा मेळाव्याच्या भाषणाचा सराव करतोय. माझ्या डोळ्यांसमोर दसर्‍याचे आम्ही स्वत:च दिसतोय. आम्ही असे कर कटीवर ठेवून सिद्ध झालो.(ही आमची नवीन ‘पोझ’ आहे. तीसुद्धा प्रसारमाध्यमांत खूप गाजली.)त्यात आमच्या जिव्हेवर विराजमान झालेले शिवराळ साम्राज्य! निवडणुकीत नसू दे, पण असल्या टोमण्यांमध्ये हैं कोई हमारा टक्कर का?
 
 
भारतीय मूर्ख नाहीत
 
 
 
राहुल गांधी चालत आहेत. मग अचानक कुणीतरी बालिका, किशोरी, युवती, वृद्ध महिला येते आणि त्यांच्या गळ्यात पडते. ते गळ्यात पडणेही अतिशय शिस्तबद्ध एका साच्यातले. आपण जिथे जातो तिथे बालिका मुली, महिला आपल्यासोबत येतात. त्यामुळे देशातील महिलांचा आपल्यावर विश्वास आहे आणि त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आपल्यावर विश्वास आहे, हे राहुल यांना सिद्ध करायचे असावे. अर्थात, राहुल यांना म्हणण्यापेक्षा ’भारत जोडो’ यात्रेचे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ ज्यांनी सांभाळले आहे, त्यांना हे सिद्ध करायचे असावे. पण हे सगळे पाहून वाटते की, खरेच काँग्रेस आणि संबधितांना भारतीयत्व कळले का?
 
 
राहुल भारतात यात्रा करत आहेत. विदेशात नव्हे. आपण ज्या देशात राहतो, त्या देशाची एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीला या देशाच्या मातीचे आणि समाजाचे बंध आहेत. कठोर नियम नाहीतच, पण सर्वांना सामावून घेता येईल, असे सहजसुंदर जगणे आणि वागणे आहे. छोटीशीच गोष्ट कोणतेही शुभ काम किंवा शुभ सुरुवात करताना भारताच्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावात औक्षण, पूजापाठ केला जातो. यामध्ये दोन व्यक्ती भेटल्या, तर वयाने मोठी व्यक्ती लहान वयाच्या व्यक्तीला शुभाशीर्वाद देते.
 
 
समवयस्काला नमस्कार करते आणि छोट्या वयाची व्यक्ती, मोठ्या वयाच्या व्यक्तीचा आशीर्वाद घेते. हेच सगळे भारतभर प्रत्येक समाजातील घरात आजही घडते. हेच चित्र बहुतेक राजकीय यात्रांमध्येही दिसते. इतकेच नव्हे, तर सामाजिक चळवळी आणि आंदोलनातही दिसते. मात्र, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये हे कुणी कुठे पाहिले आहे का? बालिकांपासून वृद्ध स्त्रियांनी एकाच पद्धतीने राहुल यांची गळाभेट घेणे या सगळ्यामधला कृत्रिमपणा समोर येतो. हे सगळे ठरवून केलेले आहे, हे चटकन कळते.
 
 
आपण सामान्य लोकांना फार आवडतो, हे राहुल यांना दाखवायचे आहे का? तसे असेल, तर त्यांनी एकदा सामान्यांचे जगणेही जगून पाहावे. सध्या ते दक्षिण भारतात आहेत. यात्रेदरम्यानचा अत्याधुनिक सोईसुविधांचा निवास सोडून त्यांनी तेथील पारंपरिक सामान्य कुटुंबाकडे एक दिवस राहावे, अगदी त्यांच्यासारखेच. पण ते राहुल यांना शक्य नाही. त्यामुळेच सामान्य भारतीयांची आणि राहुल गांधी यांची नाळ कधीही जुळणे शक्य नाही. हे न समजण्याइतके भारतीय आता मूर्ख नाहीत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.