बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चौकशी दरम्यान सापडले मृत गिधाडाचे अवशेष
12-Sep-2022
Total Views | 82
मुंबई(प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरातून मृत भारतीय लॉंग बिल्ड गिधाडाचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. पश्चिम नाशिक इगतपुरी वन परिक्षेत्र कार्यालयाने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चौकशी दरम्यान हे अवशेष सापडले आहेत. आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन होणारी वन्यजीवांची होणारी शिकार रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे निर्माण झाले आहे.
पश्चिम नाशिक इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी एकाच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या दरम्यान नामशेष होणारे अत्यंत महत्त्वाच्या भारतीय लॉंग बिल्ड गिधाड पक्षाचे अवयव जप्त करण्यात आले. बायकोला भूत बाधा होऊ नये यासाठी गिधाडाचे अवशेष हळद लावून घरात लटकवून ठेवले होते. याप्रकरणी वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. गिधाडांच्या अव्यावांबरोबर बिबट्याची जमिनीत पुरलेली हाडे देखील सापडली आहेत. जप्त केलेले अवयव व कातडी आणि बिबट्याची हाडे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल दिवाणे,राव,चव्हाण, वनरक्षक सय्यद,गांगुर्डे, गुव्हाडे,बोडके,मुज्जु शेख, आणि इगतपुरी व त्रंबकेश्वर वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
गिधाडांमागे नानाविध अंधश्रद्धा असल्या तरी रामायणातील सीतेला वाचविण्याकरिता रावणाशी दोन हात केलेला ’जटायू’ गिधाड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना कुरुप वाटणारे गिधाड हा निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. कारण, पक्षी जमातीमध्ये निसर्गाचा ‘स्वच्छतादूत’ म्हणून त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात सध्या गिधाड दिसणे म्हणजे दुर्मीळ घटना होऊन बसली आहे. अशातच या घटना समोर आल्याने, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
“अंधश्रद्धेपोटी किंवा पैश्याच्या हव्यासापोटी वन्यजीवांची शिकार कोणीही करू नये. शिकार केल्याने आपण आपली नैसर्गिक संपत्ती नष्ट करत आहोत. शिकार करणाऱ्या लोकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.” - वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस