ढोंगी शहरी नक्षलवाद्यांचा पर्दाफाश!

    10-Jun-2025   
Total Views |

ABVP anti-urban Naxalism campaign
 
 
देशातून नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचा विडा अमित शाह यांनी उचलला असून, त्यादिशेने आक्रमक कारवायाही सुरु आहेत. पण, शहरी नक्षलवाद्यांच्या षड्यंत्रांना सुरुंग लावण्यासाठी नागरी पातळीवरही जनजागृती करणे तितकेच अत्यावश्यक. ही बाब लक्षात घेता, अभाविपने तेलंगणमधील विद्यापीठांमध्ये शहरी नक्षलवादाविरोधात राबविलेली मोहीम परिणामकारक ठरली आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे संपूर्ण उच्चाटन केले जाईल, अशी घोषणा केली असून, त्यादृष्टीने जोरदार कृतीही सुरू केली आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध जी ‘ऑपरेशन कगार’ मोहीम हाती घेण्यात आली आहे, त्या मोहिमेस मिळत असलेल्या यशामुळे माओवाद्यांचे धाबे दणाणले. सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत अनेक नक्षली म्होरके मारले गेले, तर अनेक माओवाद्यांना उपरती होऊन ते शरणागती पत्करत आहेत. या मोहिमेत सुरक्षादलाच्या अनेक जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. असे असले, तरी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठीचा लढा अथकपणे सुरू आहे. या मोहिमेमुळे माओवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः छत्तीसगढ आणि तेलंगण या राज्यात ही चळवळ खिळखिळी होताना दिसते. सरकारने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन कगार’मोहिमेचे यश साजरे करण्यासाठी आणि माओवादी चळवळीचा निषेध करण्यासाठी तेलंगण राज्यात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने विविध विद्यापीठांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
 
‘अभाविप’ने माओवाद्यांना हिंसाचाराचा त्याग करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन यानिमित्ताने केले. तेलंगणमध्ये हैदराबाद, हनामकोंडा, निजामाबाद आणि मेडचल येथे ‘अभाविप’ने या निदर्शनांचे आयोजन केले होते. एकेकाळी म्हणजे सुमारे पाच दशकांपूर्वी उस्मानिया विद्यापीठ, काकतीय विद्यापीठ आणि वारंगल येथील रिजनल इंजिनिअरिंग महाविद्यालय म्हणजे माओवाद्यांची भरती केंद्रे होती. माओवाद्यांचे अनेक वरिष्ठ नेते तत्कालीन आंध्र प्रदेशातून उदयास आले होते. त्यातील अनेक नेते विद्यार्थी आंदोलनातून पुढे आले होते. पण, आता या माओवाद्यांचा प्रभाव ओसरू लागल्याचे दिसून येते. गेल्या दि. 6 जून रोजी ‘अभाविप’ने माओवाद्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन केले. उस्मानिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ‘अभाविप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जीवन यांनी माओवाद्यांच्या तत्त्वज्ञानावर सडकून टीका केली. “सत्ता ही केवळ बंदुकीच्या नळीतून येते, हा भ्रम माओवाद्यांनी पसरविला. त्यास अनेक निष्पाप विद्यार्थी बळी पडले. माओवाद्यांच्या हिंसाचारात देशभरातील सुमारे 14 हजार निष्पाप लोकांचा बळी गेला,” असेही जीवन यांनी सांगितले.
 
आपल्या भाषणात जीवन यांनी शहरी नक्षलवाद्यांचा बुरखा फाडला. हे शहरी नक्षलवादी विद्वत्तेचा बुरखा पांघरतात. पण, त्यांच्याकडून घटनाविरोधी कारवायांना खतपाणी घातले जाते. ते आपल्या समाजास तुच्छ लेखतात. आपल्या स्वतःच्या मुलांना ते शिक्षणासाठी विदेशात पाठवितात. मात्र, अन्यांना जंगलातच राहण्याचे आमिष दाखवितात, असे सांगून अर्बन नक्षलवाद्यांचे पितळ जीवन यांनी उघडे पाडले! अशा तत्त्वांच्या विरुद्ध शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन कगार’ मोहिमेमुळे माओवादी हादरून गेले आहेत. छत्तीसगढ राज्यातील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत माओवाद्यांचे बसवराजू आणि भास्कर हे दोन ज्येष्ठ नेते मारले गेले. त्यामुळे माओवाद्यांना हादरा बसला. संपूर्ण देशातून मार्च 2026 सालापर्यंत माओवाद्यांचे उच्चाटन करण्याचा निर्धार केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. त्या दिशेने सरकारची पावले दमदारपणे पडत आहेत.
 
आसाम : गोहत्या प्रकरणी 16 जणांना अटक
 
आसाममध्ये ईद-उल-झुआ सणाच्या निमित्ताने अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीरपणे गोहत्या करण्याच्या घटना घडल्याने आसाममधील अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही गायींची मंदिरांच्या निकट हत्या करण्याचा घटना घडल्याने हिंदू समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. श्रीभूमी (बदरपूर), धुब्री, होजाई यांसह अन्य अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे गोहत्या घडल्याचे वृत्त आहे. गोहत्या करण्याच्या घटना घडल्याने राज्यातील धार्मिक सलोखा बिघडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीभूमी जिल्ह्यातील बदरपूर येथे दि. 8 जून रोजी हिंदू वस्तीतील हनुमान मंदिराजवळ गायीचे शीर आढळून आले. या घटनेनंतर त्या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त जमावाने मागणी केली. जातीय तणाव वाढविण्याच्या हेतूने समाजकंटकांनी मुद्दामच हे कृत्य केल्याचा आरोप स्थानिक जनतेने केला. होजाई जिल्ह्यामध्ये एका हिंदू वस्तीमध्ये गोमांस फेकल्याबद्दल पोलिसांनी सहा समाजकंटकाना अटक केली. दि. 7 जून आणि दि. 8 जून रोजी असे दोन दिवस हा प्रकार घडला. ईदच्या दिवशी घडलेल्या अशा घटनांबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या अशा गोवंशांच्या हत्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. घटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला, तरी कायद्याचे पालन केले पाहिजे आणि सार्वजनिक शांतता राखली पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. कचार जिल्ह्यात तसेच करीमगंज जिल्ह्यात मिळून पाच ठिकाणी बेकायदेशीरपणे गोहत्या करण्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.
 
पुन्हा एकदा शबरीमला प्रकरण
 
केरळ राज्यातील मल्लपुरम जिल्ह्यातील निलाम्बुर विधानसभा मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक लक्षात घेऊन त्या राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारने पुन्हा एकदा शबरीमला प्रकरण उकरून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या मुद्द्यावरून मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या हेतूने आणि काही इस्लामी गटांना खूश करण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्याचे केरळ सरकारने ठरविल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने के. पी. शशिकला यांच्यासारख्या हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. आगामी पोटनिवडणूक लक्षात घेऊन डाव्या लोकशाही आघाडी सरकारने शबरीमला महिला प्रवेश प्रकरण पुन्हा उकरून काढण्याचे ठरविले आहे. मुस्लीम धर्मांध गटांना खूश करण्यासाठी प्रदेश ‘विश्व हिंदू परिषदे’च्या माजी अध्यक्ष आणि ‘हिंदू ऐक्य वेदी’च्या विद्यमान पालक के. पी. शशिकला यांच्यावर नव्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 2019 साली शबरीमला प्रकरणी हिंदू समाजाने जो तीव्र निषेध व्यक्त केला होता, त्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणी राज्य सरकारने आता नव्याने गुन्हा नोंदविला आहे. के. पी. शशिकला यांच्याशिवाय ‘शबरीमला कर्म समिती’चे निमंत्रक एसजेआर कुमार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. के. एस. राधाकृष्णन यांचेही नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. शबरीमला येथील परंपरा कायम ठेवण्यासाठी हिंदू समाजाने केरळमध्ये प्रचंड आंदोलन उभारले होते. सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यात यावा, असा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता त्याविरुद्ध हिंदू समाजाने तीव्र आवाज उठविला होता. हिंदू समाजाच्या तीव्र विरोधामुळे सरकार काहीच करू शकले नव्हते.हिंदू समाजाच्या शांततापूर्ण आणि प्रभावी आंदोलनामुळे तेथील डाव्या सरकारचे नाक कापले गेले होते. आता पोटनिवडणूक लक्षात घेऊन मुस्लीम मते आपल्या पदरात पडून घेण्यासाठी हिंदू नेत्यांविरुद्ध नव्याने गुन्हे नोंदविण्याचे उद्योग केरळ सरकारने चालविले आहेत.
 
खलिस्तान समर्थकांचा पत्रकारावर हल्ला
 
कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, हे सर्वविदित. तेथील काही राजकीय पक्षांचा या खलिस्तान समर्थकांना पाठिंबा आहे, हे काही लपून राहिलेले नाही. खलिस्तान समर्थकांनी कॅनडामधील वॅन्कोव्हर शहरात एका सभेचे आयोजन केले होते. या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या एका पत्रकारावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला करण्याची घटना घडली. खलिस्तान समर्थकांनी केलेला हल्ला आणि दिलेली धमकी यासंदर्भातील सर्व माहिती या पत्रकाराने समाजमाध्यमांवरील आपल्या खात्यावर दिली आहे. “खलिस्तानी चळवळीमुळे कॅनडाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच, या चळवळीमुळे भारत आणि कॅनडा या उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत,” असे या पत्रकाराने म्हटले आहे. “खलिस्तान समर्थकांचे वर्तन गुंडांसारखे होते. त्यांनी मला घेरले होते. माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती मोचा बेझीरगन नावाच्या या मुक्त पत्रकाराने समाजमाध्यमांवर दिली आहे. “ते मला विकत घेऊ पाहत होते. माझ्यावर प्रभाव टाकू पाहत होते. मला विकत घेणे शक्य न झाल्याने त्यांच्याकडून मला धमकाविण्यात आले,” असेही या पत्रकाराने म्हटले आहे. संबंधित पत्रकाराने खलिस्तान समर्थकांना अनुकूल असे लिखाण न केल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला, हे स्पष्टच आहे.
 
 

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.