अखेर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेत दाखल!
10-Jun-2025
Total Views | 12
ठाणे : सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवार, ९ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच चंद्रहार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर माझ्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपाला प्रत्यारोपाने नाही, तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना ऐतिहासिक प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना आहे, टोमणेसम्राटांची नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "पैलवान चंद्रहार पाटील हे आता कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले आहे. तेव्हा असे डावपेच टाकले की, ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे," असे ते म्हणाले. यासोबतच सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केला आहे. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ, असेही ते म्हणाले.
यावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.