‘डाव्यांचा खरा चेहरा’ देशासमोर आणणारे पुस्तक

    06-Aug-2022   
Total Views |

tf
 
१०० वर्षांपासून कम्युनिस्ट विचारधारेने या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न कसा केला? याचा लेखाजोखा पुराव्यासकट माधव भांडारी लिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर जी अस्वस्थता वाटते, ती अजूनही आहे. या अस्वस्थतेला एक समाधानाची किनारही आहे की, बरे झाले २०१४ साली सत्तापालट झाली. नाहीतर आपल्या पुढे आपल्या देशापुढे जे काही वाढून ठेवले होते ते भयंकर होते. या पुस्तकातले विचार अगदी सारांश रूपाने मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
’डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकात डाव्यांचा इतिहास, निर्मिती, ध्येयधोरणे आणि त्याची अंमलबजावणी, इंग्रजापासूनच्या कालखंडात डावे आणि त्यांचे विचार काय होते? ते काय करत होते आणि आता २०२२ सालीही ते काय करत आहेत? याचा लेखाजोखाच माधव भांडारी यांनी मांडला आहे. भांडारी यांनी भारतीय ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय जीवनाचा नि:स्पृह आणि कोणतेही पूर्वग्रह न ठेवता एक शतकापेक्षा जास्त कालावधींचा ‘धांडोळा’ या पुस्तकात घेतलेला दिसतो. हे पुस्तक शोधनिबंधाच्या तोडीस तोड तर आहे, त्याचबरोबर साहित्यिक स्तराचे सगळेच गुण या पुस्तकात समाविष्ट आहेत.
 
 
रसाळ आणि साधी भाषा, पुराव्यासकट तपशिलवार घटना मांडणी, तर्कसुसंगत आशय हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. म्हणूनच ‘डाव्यांचा खरा चेहरा’ हे पुस्तक कालातीत आहे, हे नक्की. अशोकराव मोडक या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात, ”भारतातल्या वामपंथीय मंडळींनी खिलाफत आंदोलनापासून लोटलेल्या १०० वर्षांत जाणीवपूर्वक बुद्धिभेद करण्याची खटपट चालवली. डाव्या मंडळींच्या या अशा विकृत खटपटीचे तर्कशुद्ध विश्लेषण करणार्‍या पुस्तकांची निकड होती. ही निकड माधवरांवाच्या पुस्तकामुळे भागवली जात आहे. भांडारी यांच्या पुस्तकामुळे या गरजेची पूर्ती होत आहे. हे पुस्तक म्हणजे उचित प्रमाणेव पुरावे देऊन तर्कशुद्ध विवेचन कसे करावे, याचा चांगला वस्तुपाठ आहे.”
 
 
मोडक यांच्या प्रस्तावनेनंतर माधव भांडारी यांनी ‘मनोगत’ लिहिले असून त्यानंतर या पुस्तकात एकूण १३ प्रकरण आहेत ती अनुक्रमे अशी -१. भारतातील डाव्यांचा खरा चेहरा, २. डाव्यांच्या भारतातील प्रयोगशाळा: प. बंगाल, त्रिपुरा व केरळ, ३. शेतकरी कामगार मागासवर्गीय, अल्पसंख्य व गरिबांचा दिखाऊ कळवळा ४. हिंसाचार हेच तत्वज्ञान व धोरण ५. हिंसाचाराचे शास्त्रशुद्ध तंत्र ६. नक्षलवाद : डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा ७. विश्वासघात हाच यांचा उद्योग ८. अखेर सत्याला वाचा फुटलीच ९. डाव्यांच्या भ्रष्टाचाराचे वास्तव १०. भ्रष्टाचार हाच आचार११. विरोधाचे केवळ ढोंग १२. बौद्धिक क्षेत्रातहीभ्रष्टाचार व अप्रामाणिकपणा, नामवंत खोटारडे १३. टोकाची असहिष्णूता आणि कंपूशाही
 
 
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कम्युनिस्टांची सत्ता प. बंगाल, त्रिपुरा व केरळ येथे होती. केरळमध्ये तर अजूनही सत्तेवर आहेत. महत्त्वाचे अहवाल, सर्वेक्षण विचारवंतांचा यासंदर्भातील तौलनिक अभ्यास यांचा पुरावा देत लेखक सप्रमाण सिद्ध करतो की, जिथे या कम्युनिस्टांची राजवट कितीतरी दशके होती आणि आहे, तिथे अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अधोगतीला गेली. हिंसाचार हेच तत्वज्ञान व धोरण आणि हिंसाचाराचे शास्त्रशुद्ध तंत्र या दोन प्रकरणात डाव्यांनी कशा प्रकारे हिंसा केली, हे वाचूनच अंगावर काटा येतो. कम्युनिस्टांनी प. बंगालच्या फाळणीला समर्थन दिले. पाकिस्तानची निर्मिती व्हावी यासाठी कम्युनिस्ट आघाडीवर होते.
 
 
स्वातंत्र्यानांतर निझामाच्या फुटीरतावादाला कम्युनिस्टांनी मदत केली. का? तर निझामाने त्याबदल्यात तेलंगणला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन तो कम्युनिस्टांना द्यावा, असे क्रूर निझाम आणि त्यावेळच्या कम्युनिस्टांमध्ये करार झाला. पुढे १९६२ चीनने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी चीनला सर्वार्थाने समर्थन करत रशियानेही भारताला मदत करू नये, यासाठी रशियाला निवेदन देणारे कम्युनिस्ट नेते होते. या सगळ्याचे महत्त्वाचे पुरावे भांडारी यांनी या पुस्तकात दिले आहेत. इतकेच काय? काश्मीरचे अतिरेकी, पंजाबचे खलिस्तान आणि प. बंगाल मार्गे पूर्वोत्तर राज्य आणि देशात पसरलेला नक्षलवाद या सगळ्या फुटीरतावादी चळवळींमध्ये कमालीचे साम्य दिसते. या सगळ्यांच्या मुळाशी कोण आहे? ”भारत हे राष्ट्र नसून ते विविध राज्यांचा समूह आहे आणि त्या प्रत्येक राज्याला स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे,” असे स्टॅलिन आणि लेनिनचे मत.
 
 
या दोघांचे मत भारतीय कम्युनिस्टांनी कर्तव्य मानून त्यासाठी आयुष्यभर भारतविरोधी कारवाया केल्या. यासंदर्भातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचेसत्य पुरावे माधव भांडारी यांनी या पुस्तकात दिले आहेत. हा कम्युनिस्टांचा सगळा इतिहास ‘भारत तेरे तुकडे होंगे, इंशाअल्ला इंशाअल्ला’ म्हणणार्‍या कन्हैया कुमार आणि टोळक्यांशी, ‘सीएए’ विरोधातील शाहीनबागेशी आणि कोरेगाव-भीमाच्या हिंसेशी जुळतो, हा योगायोग नाहीच!
 
 
या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘मित्रोखीन आर्काइव्ह’चा संदर्भ. त्यामध्ये अनेक भयंकर गौप्यस्फोट आहेत. रशियाने भारतातील कम्युनिस्टांना काँग्रेस नेत्यांना आणि वर्तमानपत्रांना ‘पे-रोल’वर ठेवले. इंदिरा गांधींचा खून, संजय गांधींचा मृत्यू, पुढे सोनिया गांधींचे राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या माध्यमातून देशावर सत्तांकुश ठेवणे, हे सगळे संदर्भ या पुस्तकात आहेत. हे संदर्भ पाहिले की वाटते, कोणत्याही ‘ससपेन्स थ्रिलर’ आणि ‘व्हिलनिश बेस’ असलेल्या चित्रपटाला ‘पाणी कम चाय वाटेल’ असे काही तरी भयंकर आपल्याच देशात घडले आणि त्या सगळ्यापासून देशाची करोडो जनता अनभिज्ञ होती.
 
 
या पुस्तकात मणिशंकर अय्यर याचीही एक सुरस सत्यकथा वाचायला मिळाली. चीन-भारत युद्धावेळी मणिशकंर लंडनला शिकायला होता. तिथे तो कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. चीनच्या सैनिकांना मदत म्हणून त्याने तेव्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पैसा गोळा केला होता. त्याला काँग्रेसच्या राज्यात मंत्रिपदही मिळाले, हे विशेष. नंबुद्रीपाद, मानवेंद्र रॉय, बी. टी. रणदिवे, पी. सी. जोशी, भूपेश गुप्ता, न्या. काटजू, आर. एन. शर्मा, सुरज भान, एम. अख्तर, रोमिला थापर, तिस्ता सेटलवाड यांच्याबाबत अशा सत्यकथा या पुस्तकात वाचायला मिळतील. डांगे यांच्या जावयांनी बानी देशपांडे यांनी भारतीय संस्कृतीला मानणारे पुस्तक लिहिले आणि त्याला डांगे यांनी प्रस्तावना दिली म्हणून डांगेंना माफी मागायला लावणारे डावेच होते.
 
 
केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी भारतीय सैन्यासाठी रक्तदान करूया, असे जाहीर केले म्हणून त्यांना देशपातळीवरच्या पदावरून एका शाखेचा कार्यकर्ता अशी सजा देणारा कम्युनिस्ट पक्षच होता. सोमनाथ चॅटर्जी यांनी अणुकराराला समर्थन करून भारताला सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कार्यवाही करणारा कम्युनिस्ट पक्षच होता. यावर बोलताना कम्युनिस्ट पक्षाने म्हंटले की,”भारताच्या संविधानापेक्षा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्षाची घटना महत्त्वाचीअसायला हवी.” पण, तरीही भाजप सरकार सत्तेवर असले की, या न त्या कारणाने ‘संविधान बचाव’ असे डफली वाजवत फिरणारे स्वतःला कम्युनिस्ट विचारधारेशी बांधिलकी मानतात, हे विशेष.
 
 
या पुस्तकामध्ये राष्ट्रीय सल्लागार समिती पुरस्कृत ’जातीय व लक्षित हिंसा प्रतिबंधक विधेयक, २०११’ यावर माधव भांडारी यांनी केलेले भाषणही आहे. हे भाषण वाचले की, डोक्याला अगदी मुंग्या येतात. राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. २०१४ साली पुन्हा भारतात काँग्रेस सत्तेवर आली असती, तर भारतातल्या बहुसंख्य हिंदूंच्या आयुष्यात काय घडले असते, याची अत्यंत मुद्देसुद झलकच या भाषणात आहे. कालपरवाच राहुल गांधी म्हणाले की, ”रा. स्व. संघाने त्यांची माणसे प्रत्येक व्यवस्थेत बसवली आहेत. त्या व्यवस्थेविरोधात आपण लढतोय,” तर काँग्रेसनेच व्यवस्थेत माणसं कशी बसवली म्हणण्यापेक्षा घुसवली, याचे अतिशय जळजळीतवास्तव भांडारी यांनी पुस्तकात सोदाहरण मांडले आहे.
 
 
‘बौद्धिक क्षेत्रातही भ्रष्टाचार व अप्रमाणिकपणा’ या प्रकरणात ‘भारतीय इतिहास संशोधन परिषद’ या संस्थेचा कारभार भांडारी यांनी विस्तृतपणे मांडला. पाठ्यपुस्तकात मुघलांचेच राज्य का? आपल्या महान लोकांवर संशोधन का झाले नाही? तर याचे कारण इतिहास लेखन-पुनर्लेखन संदर्भातल्या समितीवर काँग्रेसने डाव्या विचारसरणीचे लोक बसवले. या लोकांनी प्रचंड वैचारिक आणि आर्थिक भ्रष्टाचार केला. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहायला १९ कोटी संमत झाले. पुस्तक लिहिण्यासाठी कुणाला किती पैसे वाटले, हे नावानिशी लिहिले गेले. अगदी एक कोटी कुणाला दिले, तर त्या व्यक्तीचे नाव ‘मान्यवर’ इतकेच लिहिले गेले. मात्र,इतके पैसे वितरित करूनही त्यावर एकही पुस्तक निघाले नाही.
 
 
या इतिहास समितीने त्यांच्या कारकिर्दीत जी पुस्तके प्रकाशित केली, त्याची नामावली पाहा- ‘अकबराच्या राजवटीची समकालीन साधने’, ‘अखबारात इ-औरंगजेब’, ‘मुघल साम्राज्याचा नकाशा संग्रह’, ‘ताशिर उल अक्कानी’ अशी ऐतिहासिक पुस्तके. काँग्रेस सरकारने सत्तेत असताना या ‘डाव्यांना इतिहास संशोधना’साठी कोटी रुपये दिले त्याचा हिशोबही घेतला नाही. का? तर काँग्रेसने सत्ता करावी आणि डाव्यांनी बौद्धिक भ्रष्टता करून देशाचा सांस्कृतिक इतिहास खराब करावा, असे धोरण वाटले गेले होते. कसे? याबद्दलही या पुस्तकात भरपूर पुरावे दिले गेले आहेत.
 
 
पुढे रामजन्मभूमीबाबतही कम्युनिस्टांनी विरोधी भूमिका घेतली. हिंदू समाज, श्रद्धा यांना विरोध का? तर बहुसंख्य हिंदू समाजाने कम्युनिस्ट विचारधारेला सर्वतोपरी थारा दिला नाही म्हणून कम्युनिस्टांना राग. तसेच, लेनिन-स्टॅलिनच्या मते, भारत हे मुस्लीम राष्ट्र आहे, मग भारतात हिंदू श्रद्धांचा आग्रह का? असे कम्युनिस्टांचे मत. माधव भांडारी कम्युनिस्टांचे हे मत पुराव्यासकट पुस्तकात मांडतात. हे पुस्तक म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांना उघड किंवा छुपा पाठिंबा देणार्‍या संस्थांचा शतकाचा पुराव्यासकट मागोवाच आहे. आजपर्यंत कधीही न वाचलेल्या आणि अनुभवलेल्या कम्युनिस्टांच्या या कारवाया आणि त्यांना पुरून उरणार्‍या भारतीयत्वाच्या विजयाचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. संशोधन पातळीवर अत्यंत सिद्धहस्त होत ओघवत्या आणि सहज सुंदर भाषेत लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे.
 
 
पुस्तक : डाव्यांचा खरा चेहरा’(देश तोडण्याचे राजकारण, लोकशाहीला विरोध, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि असहिष्णुता)
 
लेखक : माधव भांडारी.
 
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स’
 
पृष्ठसंख्या : 236
 
मूल्य : 375 रु.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.