महंतांनी आदेश द्यावा

    15-Aug-2022   
Total Views |

sr
 
 
चित्रा वाघ यांनी राठोडांच्या हातावर राखी बांधावी. जेव्हा संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. राठोड यांना पोलिसांनी ‘क्लिनचीट’ दिल्यानंतरही आरोप होत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,“ असा इशारा पोहरादेवी धर्मपीठाच्या महंतांनी दिला. अशी बातमी प्रसारमाध्यमांवर आहे. काय खरे काय खोटे? पण एखाद्या महिलेने कुणाला राखी बांधावी अथवा बांधू नये, याचे आदेश या स्वतंत्र भारतात कोणीही देऊ शकत नाही. दुसरे असे की, धर्मपीठ हे न्याय सत्याच्या अधिष्ठानाचे केंद्र आहे. मग ते पोहरादेवीचे धर्मपीठ असो की, आणखीन कोणतेही.
 
 
धर्मसंस्था कुणाही एका व्यक्तिची असते का? धर्मपीठ हिंदू तत्त्वप्रणालीचे शाश्वत मानवी मूल्यच जपते. या धर्मपीठावरून मुल्ला-मौलवींसारखे फतवे काढायचा विचार करणे म्हणजे धर्मपीठाचा आणि प्रत्यक्ष पोहरादेवीचा अपमान आहे. तसेही, संत-महंतांची उज्ज्वल पंरपंरा असलेला हिंदू समाज वैयक्तिक फ तवे मानत नाहीच म्हणा. मुळात महंतांसाठी सर्व समाज सारखाच. यांना मंत्री संजय राठोडही सारखेच आणि मृत पूजा चव्हाणही सारखीच असायला हवी.
 
 
चित्रा वाघ असो की संजय राठोड दोघेही राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांचे आरोप-प्रत्यारोप काय आहेत, त्याबाबत ते दोघे, फ ारच झाले तर त्यांचे नेते पाहून घेतील. समाज तर बघतोच आहे म्हणा. पण यामध्ये पोहरादेवी धर्मपीठाच्या मंहतांनी संजय राठेड यांच्या समर्थनार्थ समाज आणि धर्मपीठाचा वापर करणे योग्य आहे का? आई पोहरादेवी आणि समाजबांधवांनीच नव्हे, तर संविधान आणि मानवी शाश्वत मूल्ये मानणार्‍या सगळ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. धर्मपीठाच्या नावाने एका महिलेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे म्हणणे म्हणजे निष्पक्ष धर्मनिष्ठ आणि शाश्वत मानवी मूल्य जपणार्‍या भारतीयांसाठी नकारात्मक बाब आहे.
 
 
महंतांच्या म्हणण्यानुसार खरेच महाराष्ट्र त्यांचे आदेश मानत असेल, तर मग महंतांना विनंती आहे की, त्यांनी धर्मपीठावरून महाराष्ट्राला आदेश द्यावा की, “सर्व समाजबांधवांनी समाज आणि देशहिताचा विचार आणि कृत्य करावे, हिंदू समाजातील गटतट मिटून एक गाव, एक देऊळ, एक पाणवठा आणि एक स्मशान ही संकल्पना सगळ्यांनी स्वीकारावी, बालविवाह, लिंगभेद, घरगुती हिंसा यांना समाजाने कायमची मूठमाती द्यावी.” महंतजी कृपया असा आदेश नव्हे, तर नुसती समाजासमोर भूमिका तरी मांडा.
 
बीट्टा कराटे : न्यायाला सुरुवात
 
 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कृत्य करणार्‍यांवर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राज्यसरकारची उचित कारवाई सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ९०च्या दशकात काश्मिरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या बिट्टा कराटे, याची पत्नी एस्बा अर्जुमंद खान ही ग्रामीण विकास विभागात एक वरिष्ठ अधिकारी. तिला जम्मू-काश्मीर सरकारचे एलजी मनोज सिन्हा यांच्या निर्देशानुसार,पदरहित करण्यात आले. यासोबतच काश्मीर विश्वविद्यालयाचा एक वैज्ञानिक आणि एक साहाय्यक प्राध्यापक तसेच ‘जेकेईडीआय’चा प्रबंधक अब्दुल मुईद या सगळ्यांची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली.
 
 
अब्दुल मुईद, हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनचा मुलगा. ही सगळी कारवाई संविधानाच्याअनुच्छेद ३११च्या अंतर्गत करण्यात आली. आता यावर कुणाच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, कुणाची पत्नी किंवा कुणाचा मुलगा म्हणून कारवाई करणे कितपत योग्य आहे? पण बिट्टा कराटेची पत्नी एस्बा आणि सैयद सल्लाहुदिनचा मुगा अब्दुल हे दोघेही प्रतिबंधित केलेल्या दहशतवादी संघटनेचे समर्थक होते. हे सगळे अधिकारी देश आणि समाजासंदर्भाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणावर अधिकारी होते. नोकरी करताना त्यांनी दहशतवादीनातेवाईकांशी चांगले नातेसंबंधही जोपासलेले.
 
 
प्रशासनातील गोपनीय माहिती दहशतवाद्यांच्या घरातल्यांच्या हातात असणे हे किती धोकादायक होते. पण यापूर्वी असा विचार कुणी केलाच नाही. उलट दहशतवाद्यांच्या मुलांना सरकारी नोकर्‍या देण्याचे प्रयोजन आधीच्या काँग्रेस सरकारचे होते. का तर ते मुख्य प्रवाहात येतील म्हणून. पण याबाबत अभ्यास केला, तर काय दृश्य असेल? वाचक सुज्ञ आहेत. झारखंड, छत्तीसगढ येथे पाहिले होते की, नक्षल्यांना समर्थन देणारे आणि साहाय्यक भूमिका घेणारे लोक किंवा त्यांचे पती किंवा पत्नी हे विश्वविद्यालय किंवा प्रशासनात मोक्याच्या ठिकाणी अधिकारी आहेत.
 
 
भारत सरकार प्रशासनातील अधिकाराचा मेवा खाणार्‍या या अधिकार्‍यांच्या घरातलेच देशविरोधी कारवायामध्ये गुंतलेले. हे अधिकारी समाज आणि देशाशी खरेच एकनिष्ठ असतील का? त्यामुळेच बिट्टा कराटेची पत्नी एस्बा आणि सैयदचा मुलगा अब्दुल यांच्यावरच्या कारवाईचे स्वागतच आहे. बिट्टा कराटे ही तर न्यायाची सुरुवात आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.