मुंबई: भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-५३वर लाखनी आणि साकोली दरम्यान मोहघाटाजवळ तेलीनाला येथे मंगळवारी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी एका भरधाव वाहनाने मादी बिबट्याला धडक दिली. या धडकेत मादी बिबट जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. या मादी बिबट्याची तपासणी करायला गेले असता तिने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप यांच्यावर हल्ला केला. दरम्यान वनरक्षकाला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भंडारा विभागातील फॉरेस्ट डेव्हलपमेंट महाराष्ट्र कॉर्पोरेशन नर्सरी परिसराजवळील दुपदरी रस्ता ओलांडत असताना तिला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. ही बिबट्या अजूनही जिवंत असल्याचे वाटसरुंच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वनविभागला कळवले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) रोशन राठोड हे लाखनी येथील वनरक्षक कृष्णा सानप यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी जवळ गेले असता, ही मादी बिबट्या रस्त्यालगत असलेल्या झुडपात जाऊन बसली. या वेळी कृष्णा सानप तपासणी करायला गेले, आणि या मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानंतर या प्राण्याला बेशुद्ध करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमयेंकडे करण्यात आली. परंतु रात्र झाल्यामुळे ही मोहीम थांबवावी लागली. मोहघाट हा परिसर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्रच्या अखत्यारीत आहे. दरम्यान. बुधवारी दि. २७ रोजी ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र, यावर कारवाई करत आहे. लाखनी वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा हा तिसरा मृत्यू आहे. २३ जुलै रोजी रात्री साकोलीजवळील सेंदूरवाफा येथील टोलनाक्याजवळ बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी, दि. २५ जुलै रोजी बंद पडलेल्या साखर कारखान्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे. मृत झालेल्या तीनही बिबट्या मादी आहेत.
“मोहघाटा वन परिसर हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ब्रम्हपुरी आणि उमरेड-कऱ्हांडला-पावनी वन्यजीव अभयारण्य दरम्यान कार्यरत वन्यजीव कॉरिडॉर आहे. राष्ट्रीय महामार्ग-५३वर वन्यजीव विषयक उपाययोजना त्वरित राबवणे गरजेचे आहे, तसेच याची अमलबजावणी जलद गतीने होणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग-५३वर साकोली आणि देवरी दरम्यान बांधण्यात चार वन्यजीव अंडरपास बांधण्यात येणार आहेत, मात्र, त्याचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.” - मानद वन्यजीव वॉर्डन शाहिद परवेझ खान