गीतेचे वावडे कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2022   
Total Views |

himachal
 
 
हीमाचल प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, असा निर्णय घेणारे हिमाचल हे काही पहिले राज्य नाही. याआधीही उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातमध्येही शालेय अभ्यासक्रमात गीतेचा समावेश करण्याचा निर्णय झालेला आहे. गुजरातमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना गीतेमधील विचार आणि संस्कार शिकविले जाणार असून, विद्यार्थी शाळेत गीतेमधील निवडक श्लोक नित्यपाठ म्हणून म्हणतील. याआधी दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनीही देशभक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने पालिकेच्या शाळांमध्ये ’वास्तविक इतिहास’ या अभ्यासक्रमात महापराक्रमी भारतीय योद्ध्यांच्या शौर्यगाथेचा समावेश करत असल्याचे जाहीर केले होते. कर्नाटकातही गीता शिकविण्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हरियाणातही शालेय अभ्यासक्रमात गीतेच्या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने ‘हिंदू धर्म’ या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुघलांनी काय केले याचे धडे अभ्यासक्रमात असतात. मात्र, जगण्याचे सार सांगणारी गीता विद्यार्थ्यांना शिकता येत नाही. देशभरातील अनेक राज्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमांमध्ये गीतेचा समावेश केला जात असताना महाराष्ट्रातही भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेमध्ये यावर आवाज उठवला. मात्र, महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे या मागणीला धुडकावून लावले. सेनेने अनुकूलता दर्शवली, पण सत्तेत सोबती असलेल्या दोन मित्रांमुळे वेळ मारून न्यावी लागली. करणार तरी काय, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा प्रश्न आहे ना.... प्रचंड मेहनतीने सत्ता प्राप्त झाली आहे. त्यामुळे मित्रांना नाराज करून चालणार नाही. त्यामुळे हिंदुत्व फक्त सभेतील भाषणात बोलून दाखवायचं आणि कृती करून दाखविण्याची वेळ आली की, मग तोंड लपवून वेळ मारून न्यायची. काँग्रेसला गीतेचे नाव काढले की, बेरोजगारी आणि महागाईची आठवण झालीच म्हणून समजा. हिंदुत्वाच्या गमजा मारणार्‍या सेनेला शालेय अभ्याक्रमात गीतेचे वावडे नेमके कशासाठी आहे, हा यक्ष प्रश्न आहे. मात्र, त्यामागील कारण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हे तर नाही ना?
दिग्गीराजाला आवरा, अन्यथा...
सगळी काँग्रेस एकीकडे आणि तिकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह एकीकडे. वाचाळवीरांची जागतिक यादी काढली, तर महाराष्ट्राच्या विश्वप्रवक्त्यांआधीही मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या या प्रवक्त्याचे नाव घेणे क्रमप्राप्त ठरते. दिग्विजय सिंह यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची तुलना हिटलरच्या आर्मीसोबत केली. तसेच, हिटलर आणि संघ स्वयंसेवकांची वेशभूषा सारखी असल्याची मुक्ताफळेही उधळली. विशेष म्हणजे, दिग्विजय यांचा संघद्वेष लपून राहिलेला नाही. मोदींशी पंगा घेणार्‍या दिग्विजय यांनी ‘कलम ३७० ’ रद्द करण्याच्या निर्णयालाही विरोध केला होता. तसेच, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ३७० पुन्हा लागू करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील विश्वप्रवक्त्यांना दिग्विजय सिंह यांच्याकडून तुल्यबळ लढत मिळते यात तिळमात्रही शंका नाही. नुकतीच राऊत यांची खासदारकी संपली आणि त्याचं दुःख कमी म्हणून की, काय आता ‘ईडी’ने संपत्तीही ताब्यात घेतली. तिकडे दिग्विजय यांनाही हिंसाचाराच्या एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. २०११ साली भाजयुमो कार्यकर्ते जयंत राव यांनी दिग्विजय सिंह यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतप्त दिग्विजय समर्थक आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नुकताच इंदूर जिल्हा न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देत दिग्विजय यांसह सहा जणांना दोषी ठरवले. तसेच, एक वार्षांच्या शिक्षेसह प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठावला. वाचाळपणामुळे आता दिल्लीतही वजन उरलेले नाही. मुळात दिल्लीश्वरांनीही आता मोदी अस्त्रामुळे आपल्या राजकीय वजनाची चिंता सतावत असताना ही दिग्गी नावाची अगरबत्ती तरी कुठे लावणार म्हणा. संघ कुणाला मारत नाही, डिवचत नाही. वायफळ ज्ञान, तर दूरच राहिले. मात्र, संघावर दिग्गींसारखे नमुने प्रसिद्धीच्या लोलकासाठी तुडून पडतात. संघ समजण्यासाठी आधी मनात देशप्रेम आणि देशभक्तीचे स्फुरण असावे लागते. संघ समजून घेणे कोण्या येरागबाळ्याचे काम नव्हे. दिग्गीसारख्यांचे तर नाहीच नाही. गांधी कुटुंबीयांची लोकशाही अख्ख्या देशाने पाहिली आणि प्रत्येक राज्यातून त्यांची बोळवण सुरू झाली. संघावर टीका करण्यापेक्षा दिग्गींनी राहुल गांधींना चांगले उपदेश करावेत. त्यांच्याकरिता तेच सोईचे आहे. दिग्गीराजाला आवरा अन्यथा देशभरातून काँग्रेसची बोळवण व्हायला वेळ लागणार नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@