‘२६/११’च्या हल्ल्यातून बचावलेला कलाशिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2022   
Total Views |
 mansa
 
 
 
गरिबीवर मात करत चित्रकलेबरोबरच खडूशिल्पकलेची आवड त्यांनी जपली. मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यातून ते सुदैवाने बचावले. जाणून घेऊया संजय जगताप यांच्याविषयी...
 
 
 
कळवण तालुक्यातील रवळजी गावी जन्मलेल्या संजय मुरलीधर जगताप यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे वडील मुंबईतील एका महाविद्यालयात शिपाई असल्याने ते घाटकोपरमध्ये एका झोपडपट्टीत भाड्याने राहात. इयत्ता दुसरीनंतर त्यांच्या वडिलांना नाशिकमध्ये एका कंपनीत नोकरी लागल्याने ते नाशिकमध्ये भाड्याच्या खोलीत राहू लागले. शाळेतील चित्रकला शिक्षक बच्छाव गुरूजींच्या प्रभावाने त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. संजय यांच्या कुटुंबीयांना ‘कला’ नावाचा प्रकारच गावी नव्हता. त्यामुळे त्याकडे नकारात्मक भावनेने पाहिले जायचे. घरच्यांचा विरोध सहन करूनही त्यांनी चित्रकलेची आवड कायम ठेवली. दहावीनंतर कुटुंबीयांनी संजय यांना चित्रकलेऐवजी ‘आयटीआय’चे शिक्षण घेण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे आवड नसतानाही ‘आयटीआय’चे शिक्षण पूर्ण करून नंतर एक वर्ष ‘आर्किटेक्ट’कडे त्यांनी सराव केला. मात्र, तिथे मन रमत नसल्याने त्यांनी पुन्हा चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवले. पुन्हा कुटुंबीयांची नाराजी पत्करून त्यांनी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘एटीडी फाऊंडेशन’चा कोर्स पूर्ण करून नंतर ‘जेडीआर्ट’ आणि कोपरगावला ‘एएम’चा कोर्स पूर्ण केला. याचदरम्यान जगताप कुटुंबीय भाड्याच्या खोलीतून स्वतःच्या हक्काच्या नव्या घरी स्थलांतरीत झाले. दोन शाळांमध्ये आधी संजय यांनी विनावेतन नोकरी केली. यानंतर ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये सात वषेर्र् नोकरी केली. यावेळी त्यांनी काढलेली देव-देवतांची चित्रे शाळेतील प्रत्येकाला आवडायची. “तुमच्यामुळे देव पाहायला मिळतो,” असे गौरवोद्गार शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक काढत. त्यातच महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेत त्यांनी कलाशिक्षकाच्या नोकरीसाठी मुलाखत दिली. यात त्यांची निवड झाली आणि ते कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. चित्रकलेची आवड जोपासताना त्यांनी अनेक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. जवळपास ३० ते ४० काढून त्यांनी दोनदा प्रदर्शन भरवले. यातून त्यांनी चिमणी वाचवण्याचा संदेश दिला. ‘व्याघ्र बचाव’ विषयावरील चित्रांचेही त्यांनी शाळेत प्रदर्शन भरवले. जवळपास १५०पुरूषांची व्यक्तिचित्रे रेखाटली. दरम्यान, कोरोना काळात त्यांना चित्रकलेसाठी निवांत वेळ मिळाला. युट्यूबवर त्यांनी खडूशिल्पे कशी बनवतात, यांचे व्हिडिओ बघून भगवान बुद्धांची ५० ते ६० शिल्पे साकारली. यामध्ये बुद्धाच्या विविध भावमुद्रा असलेल्या खडूशिल्पांचा समावेश आहे. या अनोख्या उपक्रमाची ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही नोंद झाली. आकाशकंदील बनविणे, शाडू मातीचे गणपती तयार करणे, अशा विविध कार्यशाळांचे विद्यार्थ्यांसाठी ते आयोजन करतात. सध्या त्यांनी युट्यूब चॅनलही सुरू केले असून, दर रविवारी ते चित्र काढतानाचा व्हिडिओ अपलोड करतात. ‘अ‍ॅक्रिलीक’ रंगाचा वापर करून चित्रे काढणे संजय यांना विशेष आवडते. हा प्रकार अत्यंत अवघड समजला जातो.
 
 
 
कारण, हे रंग २० ते २५ मिनिटांनंतरकोरडे पडतात. त्यामुळे चित्र कमी वेळेत काढावे लागते. चित्रकला आणि खडूशिल्पकलेची आवड जोपासणार्‍या संजय यांनी 2008 साली ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू अगदी जवळून अनुभवला. मुंबईत ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये पेपर तपासणीसाठी पाच ते सहा कलाशिक्षक आले होते. पेपर तपासल्यानंतर हे सर्वजण छशिमट रेल्वे स्टेशनवरून खोलीवर जाण्यास निघाले आणि अवघ्या पाच मिनिटांनंतर स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला. यातून बचावल्यानंतर ते खोलीवर पोहोचले. मात्र, बाजूलाच कामा हॉस्पिटलमध्येही दहशतवादी घुसले. यादरम्यान कंपाऊंडमधून अतिरेकी येण्याची भीतीही निर्माण झाली. जवळपास एक तासांच्या गोळीबारानंतर याठिकाणी पोलीस दाखल झाले. पुढे दोन दिवसानंतर हे सर्वजण नाशिकला पोहोचले. दरम्यान, आजही पक्ष्यांचा आवाज आणि गोळीबाराचा आवाज आजही विसरलो नाही, असे संजय सांगतात.
चित्रकला शिकण्यासाठी आधी चित्रे पाहावी लागतात. मुलांच्या कलेने चित्रकलेचा विषय हाताळणे आवश्यक आहे. चित्रकलेतून सामाजिक विषयसुद्धा हाताळले जाऊ शकतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारची चित्रे आवडतात. स्वतःच्या मनाजोगती चित्रे न काढल्यास लोक नाराजी व्यक्त करतात. चित्रकलेचा गंध नसणार्‍या लोकांच्या वर्तनावर संजय खंत व्यक्त करतात. आतापर्यंत एक हजारांहून अधिक चित्रे त्यांनी रेखाटली असून निसर्गचित्रण त्यांना विशेष आवडते. मुलगी सृष्टी आणि मुलगा सम्यक यापैकी एकाने तरी या चित्रकला क्षेत्रात यावे, अशी इच्छा संजय व्यक्त करतात. काही दिवस संजय यांनी अंबड पोलीस स्थानकात पोलिसांना गुन्हेगारांची रेखाचित्रेही मोफत काढून दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर संजय यांनी रेखाटलेले त्यांचे चित्र एका नामांकित वृत्तपत्राने पहिल्या पानावर प्रसिद्ध केले होते. संजय हे चित्र पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांना दाखवतात. यावेळी ते त्यातील चुका विचारतात. पत्नी अनिता यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. आई-वडिलांशिवाय स्वतःची ओळख निर्माण करणे अशक्य होते. शेवटच्या श्वासापर्यंत कलेचे काम सुरू राहावे, अशी इच्छादेखील संजय व्यक्त करतात. झोपडीत बालपण गेलेल्या संजय यांनी आज नाशिक जिल्ह्यातील नामांकित चित्रकारांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@