काँग्रेसला घरचा आहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2022   
Total Views |
 
congress
 
 
 
देशातील महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सध्या पूर्णवेळ अध्यक्षच नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून नाराजीनाट्य रंगले आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नरसिंह राव सरकारमध्ये मंत्री राहिलेले पी. जे. कुरियन यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. “पक्षाला सर्वाधिक गरज असताना राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडले. त्यामुळे आता पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज असून त्यांना पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देता येणार नाही,” असे कुरियन यांनी केरळमधील एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्याचबरोबर गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कुणीतरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हातात घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कुरियन हे लोकसभेवर पाच वेळा निवडून गेले असून एकदा राज्यसभेचे उपसभापतीपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किमान काँग्रेसने तरी दुर्लक्षून चालणार नाही. मात्र, काँग्रेसच्या सवयीप्रमाणे आता त्यांना त्यांच्या गांधी कुटुंबाविरोधात घेतलेल्या या भूमिकेची किंमतही मोजावी लागू शकते. कुरियन इथेच थांबले नाहीत, त्यांनी राहुल गांधींच्या आसपास असलेल्या गोतावळ्यालाही लक्ष्य करत पक्ष जीवंत ठेवण्यासाठी सूचना करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेले, असे बोलून दाखवले. मुळात देशात काँग्रेसची इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती. मात्र, ‘राष्ट्र प्रथम’ व्याख्येला पद्धतशीरपणे बगल देऊन मतांची गोळाबेरीज करण्याच्या नादात काँग्रेसने स्वतःच्या पराभवाचे धडे गिरवायला सुरुवात केली. ‘लांगूलचालन’ हा शब्द अनेक पद्धतीने काँग्रेसमुळेच प्रचलित झाला. मात्र, हाच मुद्दा काँग्रेसला त्यांनी केलेल्या पापाची फळे देत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा स्पेशल ‘जी-23’ नावाचा समूह कधीकधी खडबडून जागा होतो आणि पक्षश्रेष्ठी दखल घेणार नाही, असे नको नको ते मुद्दे मांडत बसतो. अनेकदा यातीलच नेत्यांचे एकमेकांशी पटत नाही. सोनिया गांधी अजूनही हंगामी अध्यक्ष म्हणून वावरत आहेत. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला स्वतःचाअध्यक्षच नाही आणि याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे, तो गेल्या कित्येक महिन्यांपासून निवडताही येत नाही. कुरियन यांना सत्तेची फळे चाखून झाल्यानंतर हा मोठेपणा सुचला, हा भाग वेगळा. मात्र, त्यांनी केलेल्या सूचनाही तितक्याच गंभीर व महत्त्वपूर्ण आहेत. मंथन करून करून चोथा झाला, मात्र काँग्रेसला अध्यक्षपदाचे उत्तर सापडत नाही. त्यामुळे कुरियन यांना कुणी गांभीर्याने घेईल, असे तूर्त तरी वाटत नाही.
 
 
मुंबईत ताकद कुणाची?
 
 
मुंबईत भाजपची ताकद नाही, याचा साक्षात्कार नुकताच विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना झाला आहे. इकडे मनसेने मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, राऊत यांना यातही भाजपचा हात दिसत आहे. असो, मुळात मुंबईसह महाराष्ट्रात कुणाची किती ताकद आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. मात्र, राऊत यांची टीका म्हणजे ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ असा प्रकार अधिक वाटतो. मुंबईत विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत. त्यातील ३० जागी २०१९ साली महायुतीने विजय प्राप्त केला. यामध्ये शिवसेनेने १४, तर भाजपने १६ जागांवर विजय प्राप्त केला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा सेनेलाही झाला. एवढेच काय, सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या बॅनरवरही मोदींचे फोटो झळकत होते. मोदींच्या नावाने मते मागून शिवसेनेने १४ जागा जिंकल्या. त्याचबरोबर २०१७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही २२७ पैकी शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसवेक निवडून आले. याआधीच्या महापालिका निवडणुकीत भाजपने युती असताना ३१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०१७ साली भाजपने स्वतंत्र लढून अभूतपूर्व यश मिळवले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील एकूण सहा जागांपैकी भाजपचे तीन आणि शिवसेनेचे तीन खासदार निवडून आले. सेनेेचे हे तीन खासदार तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानेच निवडून आले. हे सगळे संख्याबळ लक्षात घेता मुंबईत नेमकी कुणाची किती ताकद आहे, हे स्पष्ट होते. विधानसभेतही भाजपचे सध्या १०६ आमदार असून शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. नगरसेवक असोत वा आमदार आणि खासदार, भाजपची ताकद कुठेही शिवसेनेपेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उपयोग करून निवडून येत नंतर भाजपच्या ताकदीवर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे संजय राऊत यांना मुंबईत भाजपची ताकद नाही, याचा साक्षात्कार आताच का झाला, याचे उत्तर खुद्द तेच देऊ शकतात. भाजपची ताकद नव्हती, तर भाजपशी युती तरी कशाला केली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@