घेई छंद मकरंद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2022   
Total Views |
 

maans 
 
 
दीड हजारांहून अधिक दुर्मीळ दिव्यांसह अनेक पारंपरिक पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याबरोबरच देशातील सर्वाधिक दिवे संग्रहित करण्याचा विक्रमही ज्यांच्या नावावर आहे, त्या दादरच्या मकरंद करंदीकर यांच्याविषयी...
 
अलिबाग येथील आवास गावी जन्मलेल्या मकरंद शांताराम करंदीकर यांचे बालपण मुंबईच्या दादरमध्ये गेले. बालपणी त्यांना टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड लागली. अकरावीपर्यंत त्यांनी जवळपास दीडशेहून अधिक टपाल तिकिटे जमवली. याव्यतिरिक्त आगपेट्यांचे लेबल आणि रंगीत दगडांचाही त्यांनी संग्रह केला. तत्काळ नोकरी मिळावी या हेतूने त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. याचदरम्यान आषाढी अर्थात दीप अमावस्येला मकरंद यांची आजी घरातील पाच ते सहा दिव्यांची पूजा करताना त्यांना त्याविषयी कुतूहल निर्माण झाले. दिवे ही आपली संस्कृती असून त्यात साधेपणा व कलेचा अंश असल्याने त्यांना दिवे जमवण्याची आवड लागली. वयाच्या १८व्या वर्षी निबंध स्पर्धेत पाच रुपयांचे पहिले बक्षीस मिळवल्यानंतर त्यांनी वडिलांच्या परवानगीनंतर त्यातल्या तीन रुपयांतून निरंजन खरेदी केले. त्याची पूजा करून त्यांनी तो देवासमोर लावला. त्यांच्या संग्रहातील हा त्यांचा पहिला दिवा ठरला आणि इथूनच सुरू झाला त्यांचा अनोखा संग्रह संकल्प.
बँकेत नोकरी लागल्यानंतर बढतीच्या हिशोबाने त्यांनी ‘एललबी’ करत ‘सीआयबी’ ही पदवीही प्राप्त केली. आपला छंद जोपासण्यासाठी ते पगारातील पाच ते दहा रुपये बाजूला काढून ठेवत. हळूहळू मकरंद यांची दिवे जमवण्याची आवड सर्वदूर पसरली. एकदा त्यांच्याच ओळखीतील एका महोदयांनी त्यांना घरी बोलवून एक दिवा दिला. हा त्यांच्या संग्रहातील दुसरा दिवा ठरला. पुण्यातील राजा केळकर संग्रहालयाला भेट दिल्यानंतर त्यांना दिवे जमवणे सोपे नसल्याची जाणीव झाली आणि एक वेगळी दृष्टीदेखील मिळाली. मकरंद कुठेही फिरायला गेल्यानंतर जुन्या बाजारांमध्ये आवर्जून फेरफटका मारत आणि दिवा वैशिष्ट्यपूर्ण दिसला किंवा आवडला की तो लगेच विकत घेत. दीप अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ म्हणतात, हा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी त्याच दिवशी घरातील एका खोलीत त्यांच्याकडे असलेल्या ६० ते ७० दिव्यांचे प्रदर्शन भरवले. यावेळी घर तोकडे असल्याने तीन दिवस ते गॅलरीत झोपले. या प्रदर्शनानंतर ते परिसरात परिचित झाले.
अंधेरीत भरवलेले प्रदर्शन संपल्यानंतर त्यांना एक महोदयांनी दिवा देण्यासंदर्भात फोन केला. त्यावेळी मकरंद पाच हजार रुपये घेऊन त्या महाशयांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी मकरंद यांना तो पंजोबांचा मुस्लीम काळातील जंजिर्‍याचा दुर्मीळ दिवा मोफत दिला. यावेळी त्या गृहस्थांनी “हा दिवा म्हणजे माझी मुलगी असून ती तुम्हाला सुपूर्द करतो,” असे सांगितले. मकरंद यांनीही, “मलाही मुलगी नाही हो, मी या दिव्याचा उत्तम सांभाळ करेन,” असा विश्वास दिला.
एका माणसाने त्यांना घरी दिवा पाहण्यासाठी बोलावले. मकरंद तिथे गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्या व्यक्तीला तो दिवा प्राणप्रिय होता. मात्र, औषधांसाठीही पैसे नसल्याने त्यांनी त्या दिव्याची किंमत ८०० रुपये सांगितली. मात्र, मकरंद यांनी त्याला १२०० रूपये दिले आणि घरी रंगकाम सुरू असल्याचे सांगत दिवा नंतर येऊन घेऊन जाईन असे सांगितले. मात्र, त्या माणसाचा जीव दिव्यात गुंतला आहे आणि केवळ हतबलतेमुळे ते दिवा विकत असल्याचे मकरंद यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी तो दिवा विकत घेतला नाही. त्यानंतर १५ दिवसांत त्यांचे निधन झाले आणि अडवणूक करून मी दिवा घेतला नाही, याचे समाधान त्यांना मिळाले. एकदा एका देवदासी असलेल्या महिलेनेही त्यांना अत्यंत दुर्मीळ दिवा दिला. दिव्यांबरोबरच दौत, टाक, पेन्सिल, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक पारंपरिक वस्तूदेखील मकरंद संग्रहित करू लागले.
सध्या मकरंद यांच्या संग्रही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ असे सर्व धातूंचे दीड हजारांहून अधिक दिवे आहेत. यात कागद्याच्या लगद्याचासुद्धा दिवा आहे. त्याचबरोबर ३५ अडकित्ते, आठ चुनाळी, सहा चुनपट्ट्या, सहा कातगोळीच्या डब्या, विड्याच्या पानाचे २२ डबे, (काही मोर, जीप, बोटीच्या आकाराचे), एक चंची, एक तांबोळा, ३५ दौत, १२ टाक, दोन बोरू, २२ पेन्सिल, वेगवेगळे ४० प्रकारचे पत्ते,(गोल, चौकोनी, सव्वा फूट आकाराचे), अंधांसाठीचे ‘ब्रेल’ लिपितील पत्ते, गंजीफा पत्त्यांचे चार सेट आहेत. तसेच, बैठे खेळांमध्ये बुद्धिबळाचे पाच सेट, चौसर, २० प्रकारच्या सापशिड्या आहेत. ५००हून अधिक टपाल तिकीटे, ४० प्रकारच्या वाती, तेल घालण्यासाठीच्या २२ पळ्यादेखील त्यांच्या संग्रही आहे. हे सगळे साहित्य मकरंद घरातील एका खोलीत ठेवतात. यासाठी दोन ट्रंका, चार स्टीलचे पिंप, सात कपाटे, दोन गोण्या, एक जुना बेडही वापरला जातो.
याकामी त्यांना पत्नी अर्चना यांचीही मोठी मदत मिळते. ‘लिम्का बुक’, ‘एशिया बुक’, ‘इंडिया बुक’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’मध्येही त्यांच्या विक्रमाची नोंद आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्यांची नोंद होऊ शकते. मात्र, त्यासाठी जवळपास दहा लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. सत्तरी पार केलेले मकरंद या सर्व वस्तूंचे ‘डॉक्युमेंटेशन’ करत असून,भविष्यात त्यांचा संग्रहालय निर्मितीचा मानस आहे. नव्या गोष्टींच्या नादी लागून लोक जुन्या गोष्टी विकतात आणि त्याच वस्तू परदेशी लोक विकत घेतात. पारंंपरिक वस्तूंचा संग्रह करून संस्कृती संवर्धनात आपला हातभार लावणार्‍या मकरंद यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
@@AUTHORINFO_V1@@