डोंबिवलीतील समाज‘प्रवीण’ व्यक्तिमत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2022   
Total Views |

Pravin Dudhe
 
 
आई-वडिलांकडून लाभलेला सामाजिक कार्याचा वारसा जपत डोंबिवलीतील प्रवीण दुधे हे निरपेक्ष भावनेने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
प्रवीण दुधे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईचा. त्यांचे वडील वसंतराव हे एका खासगी कंपनीत कार्यरत असून सुरुवातीला मुंबईतील कॉटन ग्रीनमध्ये वास्तव्यास होते. मात्र, १९६२च्या सुमारास ते डोंबिवलीला स्थायिक झाले. त्यामुळे प्रवीण यांचे संपूर्ण बालपण डोंबिवलीतच गेले. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्या ‘डी. एन. सी. स्कूल’मध्ये झाले. दहावीनंतर त्यांनी ‘डिप्लोमा इन इंजिनिअरिंग’ला प्रवेश घेतला. ‘सोमय्या महाविद्यालया’तून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना फटाके आणि ‘वुडन फ्लोरिंग’ असे छोटे-मोठे व्यवसायदेखील त्यांनी करुन पाहिले. पुढे प्रवीण यांनी ‘मॅकेनिकल’ आणि ‘इलेक्ट्रिकल’ या दोन्ही शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. प्रथम ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’चे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी धडपड करीत होते. पण, त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. दोनदा प्रयत्न करूनही मुळात जागाच कमी असल्याने त्यांची प्रवेशाची संधी हुकली. शेवटी त्यांनी नोकरीचा मार्ग पत्करला. नोकरी करीत असतानाच त्यांनी पार्टटाईम ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ केले. आठ वर्षे नोकरी केल्यानंतर १९८८ साली त्यांनी भागीदारीत व्यवसायही सुरू केला. चार मित्रांसह एक तप त्यांनी एकत्रित व्यवसाय केला. पण, मिलचा संप झाला आणि त्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला. सन २००० पासून ‘प्रोप्रायटरशिप’ त्यांनी सुरू केली. सध्या ठाण्याला वागळे इस्टेट येथे त्यांचे कार्यालय आहे.
 
 
 
प्रवीण यांना एक भाऊ आणि बहीण. प्रवीण यांचे वडील काम करीत असलेली कंपनी १९७८ सालीच बंद पडली. प्रवीण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असले, तरी वडिलांची कंपनी बंद पडल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडायचे नाही, असा त्यांनी निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ नामक सामाजिक संस्था इंजिनिअरिंग’च्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवित होती. प्रवीण यांना वडिलांच्या हाताचे काम गेल्याने पुस्तके विकत घेणे शक्यही नव्हते. त्यामुळे प्रवीण यांनी या संस्थेकडून पुस्तक घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या गुणांवर प्रवीण यांना शिष्यवृत्ती मिळाल्याने, पहिल्या वर्षी शैक्षणिक शुल्कही त्यांना भरावे लागले नाही. प्रवीण यांच्या आई कांचनमाला यांनाही सामाजिक कार्याची आवड होती. पण, सामाजिक कार्य करीत असताना त्यांनी प्रसिद्धीपराड्.मुख राहणे पसंत केले. तळागाळातील समाजाचे दु:ख समजून त्यांना मदत करणे, त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याकामी त्या पुढाकार घेत. तसेच व्यसनाधीन नवर्‍यांपासून पैसे वाचविण्यासाठी काही महिला प्रवीण यांच्या आईकडे मदतीच्या आशेनेही येत. मग त्या महिलांसाठी बचतगट स्थापन करण्यापासून ते वैयक्तिक पातळीवरही मदतीसाठी त्यांच्या आई प्रयत्नशील होत्या. प्रवीण यांचे वडीलदेखील गरजूंना नोकरी मिळवून देण्याकामी पुढाकार घेत. प्रवीण यांच्या आईवडिलांचे शिक्षण कमी असले, तरी त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांचे शिक्षण मात्र अगदी निष्ठेने पूर्ण केले.
 
 
 
अशा या समाजशील कुटुंबात लोकांची साहजिकच ये-जा असायची. सर्वांना समान वागणूक प्रवीण यांच्या घरात मिळत होती. घरी येणार्‍या गरजू मंडळींचे दु:ख ऐकून समाजकार्याची प्रेरणा आणि ऊर्जा प्रवीण यांनी मिळत गेली. आपले शिक्षणही असेच कोणाच्या तरी मदतीने पूर्ण झाले, याचा याचा अजिबात विसर पडू न देता, नोकरीला लागल्यानंतर प्रवीणदेखील सामाजिक कार्याकडे वळले. १९८८ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे, तर दुसरा मुलगा आज अमेरिकेत नोकरी करतो. प्रवीण यांनी शिवाई बालक मंदिर या शाळेसाठी जोशी शाळेच्या हायस्कूलवर एक कार्यक्रम आयोजित करुन त्याचे यशस्वी व्यवस्थापनही करुन दाखविले. ‘भारत विकास परिषदे’शी प्रवीण गेल्या २० वर्षांपासून संबंधित असून सध्या माजी अध्यक्ष म्हणून ते संस्थेत आजही कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित करणे, गरिबांना शैक्षणिक-आर्थिक मदत करणे, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील युवा तरुण कलाकरांना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी व्यासपीठ आणि शिष्यवृत्ती मिळवून देणे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डोंबिवलीत सामाजिक संस्थांचा एक भक्कम पाया निर्माण व्हावा, याकरिता ‘नागरी अभिवादन समिती’ची प्रवीण यांनी स्थापना केली. या संस्थेत डोंबिवलीतील एकूण ४६ संस्थांचा सहभाग आहे. या संस्थांच्या माध्यमातून विविध पातळीवर समाजकार्य सुरू आहे.
 
 
 
‘कोविड’ काळात गरजूंना मदत करणे, डोंबिवलीतील दीड हजार मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा उपक्रमही प्रवीण यांनी हाती घेतला होता. मात्र, थेट विद्यार्थ्यांकडे हे शुल्क न देता, संबंधित संस्थेला तेवढ्या रकमेच्या गरजेच्या वस्तू पुरविल्या जातात. सध्या या उपक्रमासाठी एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. एका शाळेला पंखे देऊन, तर एका शाळेचे संपूर्ण ‘इलेक्ट्रिकल’ काम करून प्रवीण यांनी या शाळांना मदतीचा हात दिला. तसेत मराठी शाळा टिकविण्यासाठी सुद्धा ते संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. गणेश मंदिर संस्थानात ते विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत. डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेचे प्रवीण हे साक्षीदार असून आयोजनातही त्यांचा सक्रिय सहभाभ असतो. राजकारणापासून लांब राहून त्यांचे अविरतपणे समाजकार्य सुरु आहे. त्यांच्या या समाजकार्यात त्यांना डोंबिवलीकर असलेले सुधीर जोगळेकर, शरद माडीवाले, संदीप घरत, दीपक नामजोशी या सगळ्यांची साथ लाभली. शहरासाठी चांगले काम व्हावे व त्यात खारीचा वाटा असावा, एवढाच हेतू असल्याचे ते सांगतात. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
 
 
@@AUTHORINFO_V1@@