आव्हाड, अहो सावित्रीची लेक ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2022   
Total Views |

Jitendra Awhad Daughter
 
 
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या उच्चतम नेत्यांपासून ते अगदी कार्यकर्त्यांपर्यंत ‘ईडी’ची इडापिडा कधी आपल्या दारात धडकेल म्हणून या सगळ्यांची झोप उडालेली दिसते. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर टाच येऊ शकते, तर मग आपण ‘किस झाड की पत्ती’ अशीच या मंडळींची भयगत. त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता आपला तर नंबर लागणार नाही ना, म्हणून महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सध्या प्रचंड धास्तावली आहेत. श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तांवरील धाडीनंतर तर या सर्व नेत्यांची बोबडीच वळली. परिणामी, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना एकाएकी महाराष्ट्र त्यांच्या कन्येसाठी असुरक्षित वाटू लागला. आव्हाड म्हणतात, “श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” म्हणजेच काय तर आज ना उद्या ठाण्यावरून वळून ‘ईडी’ची गाडी चुकूनमाकून मुंब्रा-कळव्याला वळलीच, तर मग आपले काय, हीच आव्हाडांची चिंता! पण, आता सगळ्यांसमोर ही मनातली खदखद व्यक्त करणार तरी कशी म्हणा! मग काय, आव्हाडांनी मुलीला ‘महाराष्ट्रात ठेवणार नाही’ म्हणत उगाच सहानुभूती लाटण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. पण, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, राजकारणात फक्त आव्हाड, त्यात ते राज्याचे मंत्री; ‘ईडी’च्या धाडी पडल्याच तर मंत्रिमहोदय आणि त्यांच्या संपत्तीवर पडतील. मग या सगळ्यांशी आव्हाडांच्या कन्येचा काय संबंध? की राजकारणातील अलिखित प्रथापरंपरेप्रमाणे मंत्रिमहोदयांनीही कुटुंबीयांच्या नावे कोटींचे ‘गृहनिर्माण’ केले? पण, म्हणतात ना, ‘कर नाही त्याला डर कशाला!’ मग आव्हाड साहेब, तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक, कार्यकर्ते-पोलीसबळ आणि हो, काकासाहेबांचा वरदहस्तही तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला मुळी घाबरायचे कारणच काय? पण, बिथरुन अशी वेडीवाकडी विधानं तुम्ही करून बसता, म्हणूनच ‘चोराच्या मनात चांदणं’ अशा चर्चांना मग उधाण येते बघा! त्यातच एकीकडे ‘ईडी’च्या दबावतंत्रापुढे ‘महाराष्ट्र झुकणार नाही, वाकणार नाही’ म्हणायचे आणि दुसरीकडे तुमच्याच कन्येला, महाराष्ट्राच्या सावित्रीच्या लेकीला, असे महाराष्ट्रातून चक्क बाहेर पाठविण्याच्या बाता मारायच्या... नाही नाही, हे महिला सक्षमीकरणासाठी झटणार्‍या तुमच्यासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला नक्कीच शोभणारे नाही आव्हाड साहेब!!!
 
 
 
आव्हाड, करमुसे आठवतो का?
 
महाराष्ट्रात आपली सत्ता, त्यात गृहमंत्रीही राष्ट्रवादीचाच, म्हणून महाराष्ट्रात राडेबाजी, गुंडगिरी आणि दमनशाही केली तरी आपल्या केसालाही कुणी धक्का पोहोचविणार नाही, या आविर्भावात ही मंडळी अगदी रममाण! मागील अडीच वर्षांच्या या तिघाडी सरकारच्या कार्यकाळात या तिन्ही पक्षांना आलेला सत्ताशक्तीचा माज अशाच कित्येक प्रकरणांतून वेळोवेळी जनतेसमोर आला. त्यापैकीच एक प्रकरण म्हणजे अनंत करमुसे, ज्यांना चक्क जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात, त्यांच्या समक्ष त्यांचेच कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. करमुसेंचा दोष तो काय, तर त्यांनी फेसबुकवर केलेली आव्हाड यांच्या विरोधातील एक पोस्ट! पण, या घटनेनंतर करमुसेंनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला नाही, उलट मंत्री असले तरी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ते दंड थोपटून उभे राहिले. प्रकरण न्यायालयातही गेले. आव्हाडांना सरकारने लाजेखातर गुपचूप अटक करून जामीनही मंजूर करण्यात आला. करमुसेंना विरोधी पक्षासह सर्वसामान्यांचेही समर्थन लाभले. ते पळाले नाहीत, तर त्यांनी आव्हाडांना पळता भुई थोडी केली. तेव्हा, अशाप्रकारे महाराष्ट्रात गुंडगिरी करून विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तो आव्हाडांसारख्या मंत्र्यांनी आणि आज त्याच आव्हाडांना, त्यांच्या कन्येला हाच महाराष्ट्र असुरक्षित भासतोय, हाच मोठा विरोधाभास! त्यामुळे अल्पसंख्याक मतपेढी कुरवाळणार्‍या, दहशतवादी इशरत जहाँच्या नावाखाली रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रताप करणार्‍या याच आव्हाडांना, गेल्या अडीच वर्षांतील ड्रग्ज, सरकारी भ्रष्टाचाराची प्रकरणे वगैरे बघितल्यानंतर महाराष्ट्र किचिंतही असुरक्षित वाटला नाही का? म्हणूनच आव्हाड आणि इतर मंत्र्यांनीही ‘ईडी’च्या कारवाया म्हणजे ‘महाराष्ट्रावर दिल्लीचे आक्रमण’ वगैरे असत्य चित्र उभे करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. कारण, महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. ‘ईडी’ सर्वसामान्यांचा नाही, तर भ्रष्टाचार्‍यांचा कर्दनकाळ ठरते आहे. महाराष्ट्रच काय, देशाच्या आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात ‘ईडी’ भ्रष्टाचार्‍यांचा ठावठिकाणा शोधून काढेलच. तेव्हा आव्हाड साहेब, महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून कुणी राज्याबाहेर पळाले म्हणजे ‘ईडी’च्या छायेतून मुक्त झाले, हा तुमचा गैरसमज लवकरच दूर होवो, हीच इच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@