सामाजिक बौद्धधम्मासाठी धम्म सोल्जर निर्माण : वेन. सुमेधा बोधी

    09-Feb-2022   
Total Views |

dhamma
 
 
म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडीया, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि इतर दक्षिण आशियाई देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करून नुकतेच भारतात परतलेले वेन. सुमेधा बोधी. भंते सुमेधा यांनी नुकतीच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांनी वर्तमानकाळ आणि बौद्ध धर्म प्रचार-प्रसाराबद्दल वेन. सुमेधा बोधी यांच्याशी संवाद साधला.
 
 
म्यानमारमध्ये बौद्ध धर्मिय नागरिक आणि रोहिंग्या मुसलमान यांसदर्भातल्या अनेक घटनांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. म्यानमारच्या नागरिकांचा बौद्ध धर्म अहिंसा सांगणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्मापेक्षा वेगळा आहे का?
 
 
तथागत गौतम बुद्धांनी अहिंसा सांगितली आहे. मात्र, कुणी जीव घ्यायला आला किंवा कुणी अत्याचार केला तर त्याला विरोध करू नको, असे सांगितलेले नाही. स्वसंरक्षण हा मुद्दा धम्मात आहेच. जगभरात बौद्ध धम्माचा प्रसार करताना धम्म उपासक प्रवास करत. त्यावेळी चोर, दरोडेखोर किंवा वाईट प्रवृत्तीच्या माणसांपासून त्यांना स्वसंरक्षण करावे लागे. त्यातूनच तर ज्युडो हा आत्मरक्षणाचा प्रकार अस्तित्वात आला. वाईट प्रवृत्तींना विरोध करायलाच हवा. कधी तो विरोध वैचारीक असतो, कधी शाब्दिक असतो तर कधी जशास तसेही असू शकतो. वाईट प्रवृत्तीला चांगल्या प्रवृत्तीने आणि द्वेषाला प्रेमाने, मैत्रीने जिंका असे तथागतांनी सांगितलेले आहेच. याचाच अर्थ वाईटावर विजय मिळवा सांगितलेले आहे. पण बौद्धधर्मात हिंसा नाकारलेली आहे, मग?
 
 
अंगुलीमाल आणि तथागतांची गोष्ट आहे ना? अंगुलीमाल हा तथागतांच्या उपदेशाने सुधारला. पण उपदेश देणारे तथागत होते त्यामुळे अंगुलीमाल त्यांचे विचार समजू शकाला. आज जर माझ्या शिष्याला कुणी मारत असेल, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर गुरू म्हणून मी शिष्यांना असे सांगूच शकत नाही की, जा बाळ तू मार खाऊन ये. मी हेच सांगेन की, तू तुझे संरक्षण कर. माणसाचा अनुभव आणि त्यावरची उमटणारी वास्तविक तर्कशुद्ध प्रतिक्रिया ही महत्त्वाची असते. त्यामुळे म्यानमारमधला जो रोहिंग्या मुसलमानांचा विषय आहे तो तिथल्या स्थानिक बौद्ध धर्मिय नागरिकांच्या अनुभवाची प्रतिक्रिया होती. त्याहीपेक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय पार्श्वभूमीही आहे हे विचारात घेतले पाहिजे. भंते किंवा बौद्ध साधुंनी म्यानमारमध्ये कुणालाही शस्त्रे उचला किंवा हिंसा करा असे सांगितले नाही. कारण, ध्यानधारणा करणे, बौद्ध धर्माचा प्रसार, प्रचार आणि संरक्षण, उन्नतीसाठी कार्य करणे, समाजात चांगले धार्मिक नागरिक कसे निर्माण होतील, हे पाहणे यापलिकडे त्यांचे काही काम नसते आणि ध्येयही नसते.
 
तुम्ही धर्म प्रचार-प्रसारासाठी ३५ देशात भ्रमंती केली आहे. या सगळ्या देशात बौद्ध धर्माचे स्वरुप काय आहे?
 
मूळ बौद्ध धम्म भारताच्या मातीतून रुजला आहे. त्यामुळे भारतीय तत्वानुसार परिवर्तनवादाचे, समन्वयाचे जे मूल्य आहे ते धम्मात आहे. जगभरात धम्म ज्या देशात गेला त्या देशाच्या भौतिकतेशी, मानसिकतेशी जुळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न बौद्ध धर्मात झाला. उदा. चीनमध्ये बुद्धिझमचे स्वरूप झांग बुद्धिझम झाले तर जपानमध्ये बुद्धिझमला झेन बुद्धिझमचे रूप प्राप्त झाले. पण तुम्हाला माहिती आहे का? जगभरात बुद्धिझमचे अंतरंग हे इंडियानायेझशनच आहे. भारतीयत्व हे बुद्धिझममध्ये ओतप्रेत भरलेले आहे. भारतीय संस्कारात जी मानवी मूल्ये आहेत त्या संस्काराचे शुद्ध करुणादायी स्वरूप म्हणजे बुद्धांची तत्त्वे आहेत. त्यामुळे बौद्ध धम्म जगभरात कुठेही असेल तरी तो शांती, करुणा आणि मैत्रीचाच संदेश देतो व वहन करतो. श्रीलंका देशाचे उदाहरण धेऊ. तिथे ऑगस्ट महिन्यात एस्सेला परिहार नावाचा १२ दिवसांचा एक मोठा धार्मिक उत्सव असतो. या उत्सवाचे स्वरूप कुंभमेळ्यासारखेच असते. इतकेच काय? त्यावेळचे सर्व उपक्रम हे भारतातील हिंदू सण उत्ससवा सारखेच असते.
 
 
भारतात काही लोक सांगत असतात की, बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तिंनी हिंदू धर्माचे सण उत्सव साजरे करू नयेत, यावर तुम्ही काय म्हणाल?
 
 
बौद्ध धर्म निर्मळ आहे. तो निर्वाणाचा मार्ग सांगतो. संघर्षाचा मार्ग सांगत नाही. मैत्रीचा संदेश देतो. हिंदू धर्मामध्ये दिपावली का साजरी करतात? तर अंधारावर प्रकाशाचा विजय. राक्षसी प्रवृत्तीवर सद्प्रवृत्तीचा विजय म्हणून. बौद्ध धर्मातही प्रकाशमान व्हा, अत्तदिप भव सांगितले आहे. मध्यममार्ग सांगितला आहे. निसर्ग आणि भोवतालच्या परिसरातून जे चांगले आहे ते निवडण्याला प्रोत्साहित केले आहे. निर्माण झाल्यापासून बौद्ध धर्मात हे चांगले स्वीकारण्याची प्रक्रिया होती, म्हणून धम्माचाप्रसार जगभर झाला. हिंदू सण-उत्सव या सगळ्यांमध्ये काहीना काही प्रेरणा आहे. ती प्रेरणा मंगलतेची आणि सकारात्मकतेची आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती म्हणतात की, बौद्धांनी हिंदूंचे सण उत्सव साजरे करू नये ते एक तर राजकीय स्वार्थासाठी सांगत असावेत नाहीतर त्यांना देशातील बहुसंख्य हिंदूंपासून बौद्ध समाजाला तोडायचे असेल किंवा बौद्ध धम्माच्या प्रतिमेला कंलकीत करायचे असेल. आज थायलंड, मलेशियामधले बौद्ध मुस्लीम सण साजरे करतात. फ्रान्स, अमेरिका इतर पाश्चात्य देशातील बौद्ध ख्रिसमस साजरा करतात. सण-उत्सव साजरे केल्याने त्यांच्यातल्या बौद्धधर्मिय जाणिवेला त्रास होत नाही. कारण, धम्माशी त्यांची नाळ जुळली आहे. त्यामुळे खरी बौद्ध धर्मिय व्यक्ती कधीही दुसऱ्या धर्माच्या चांगल्या आनंददायी रितीरिवाज आणि सणउत्सवाचा द्वेष करूच शकत नाही.
 
 
तुम्हाला वाटते का की सगळे जग बौद्धमय होईल?
 
 
एखादा देश बौद्धमय होणे म्हणजे काय? तर त्या देशात मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या तत्त्वांचा विचार होत असेल, जिथे पंचशील साधना केली जाईल. पंचशीलमध्ये ज्या गोष्टींची अपेक्षा केली त्या सगळ्यांसाठीच मंगल आहेत. चोरी करू नये, खोटे बोलू नये, हिंसा करू नये, नशा करू नये या गोष्टी काय केवळ बौद्ध व्यक्तींसाठीच चांगल्या आहेत का? की इतर धर्मिय या गोष्टी चांगल्या आहेत असे मानतात? तसे नाही. वाईट प्रवृत्तीचा नाश करून किंवा त्याग करून सद्प्रवृत्तीची धारणा करणे, जीवसृष्टीतील प्रत्येकाबाबत करूणा आणि मैत्रीभाव बाळगणे ही वृत्ती जोपासणारा प्रत्येक धर्म, पंथ आणि देश हा बौद्धमयच आहे. बौद्धमय म्हणजे बौद्ध धर्मिय असणारी व्यक्ती राजसत्तेतमुख्य असणे किंवा बौद्ध धर्मियाची अध्यक्षता असलेला पक्ष सत्तेत असणे नव्हे. तर सद्गुणी, शिलवान, न्यायी व्यक्ती सत्तेत असेल आणि प्रजाही जर प्रज्ञावान म्हणजे चांगले-वाईट समजण्याच्या क्षमतेची असेल, तर तो देश बौद्धमय आहे, असे आपण म्हणू शकतो.
 
 
तुमची कोणत्याही देशाच्या राजसत्तेकडून काय अपेक्षा आहे?
 
 
मुळात भंते म्हणून मी कुणाकडून काहीही अपेक्षा करत नाही. कारण, माझ्या काय कोणत्याही भंतेंच्या गरजा खूप कमी असतात. मात्र, धम्माचे म्हणजे चांगल्या समाजजीवनाचे अस्तित्व जपण्यासाठी राजसत्तेने साधुतत्व जपणाऱ्या व्यक्ती आणि धर्मसंस्थांचे रक्षण केले पाहिजे. त्यांना अभय दिले पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही धर्माच्या गुरूकडून केवळ आणि केवळ धार्मिक बाबींची अपेक्षा करावी. त्यांच्याकडून राजकीय किंवा इतर कोणत्याही स्वार्थपुर्तीची अपेक्षा करू नये. जगभरात भ्रमण करताना मला जाणवले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सध्या भारतात धर्मसंस्थांना अभय मिळत आहे. धर्म स्वातंतत्र्याला पूर्वीपेक्षा चांगले दिवस आले आहेत.
 
 
राजसत्तेने धर्मगुरूंकडून केवळ धार्मिक अपेक्षा ठेवाव्यात असे का वाटते?
 
 
कारण धर्मभाव हा निस्वार्थी असतो. त्यात लोभ-लाभाची अपेक्षा नसते. जिथे राजकीय स्वार्थ किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा येतात तिथे धर्मभाव उरत नाही. अर्थात राजकीय माणसाने राजकारण करावे हा त्याचा भाव आहे. मात्र, धर्मगुरूंनी राजकारण करायला घेतले की, धम्माच्या मूळ तत्त्वांशी त्याला प्रामाणिक राहता येत नाही. धम्माचे काम निर्भिड राहून त्यांना करता येत नाही. राजकारण्यांचा दबाव सहन करावा लागतो. तसाही धम्म हा कोणत्याही एका राजकीय पक्ष किंवा व्यक्तिशी निगडीत असू शकत नाही. धम्म सगळ्यांसाठी मुक्त असतो. त्याला राजकीय चौकट मिळाली की, त्याच्या मूळ मुक्ततेला बाधा येते.
 
 
वर्तमान परिप्रेक्षात बौद्ध धर्म किंवा त्याची मूळ तत्त्वे यांची स्वीकार्हता कशी वाढेल?
 
 
बौद्ध धम्म हा धर्मांतरावर विश्वास ठेवत नाही. कोणत्याही व्यक्तिला मनापासून त्या त्या धर्माची तत्त्वे पटली पाहिजेत. लाभ, लोभ, दबाव, दडपण, अज्ञान यामुळे धर्मांतर झाले असेल तर ते धर्मांतर होऊच शकत नाही. त्यामुळे भंते म्हणून आम्ही कधीही कुणाला तुमच्या जन्मजात धर्माला सोडून बौद्ध धम्म स्वीकारा, असे सांगत नाही. तुम्ही तुमच्या धर्मात राहूनही बौद्ध धम्मातली सकारात्मक आणि तुमच्या जीवनशैलीला योग्य असलेली तत्त्वे स्वीकारू शकता. त्यासाठी तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षाच घ्यावी लागेल असे नाही. बौद्ध धर्माचे पंचशील जगा बस. धर्माला कट्टरता मान्य नाही. मात्र, सद्गुण जपण्याचे नियम धम्मात आहेत. ते जपणारा कुणीही माझ्यामते बौद्ध धर्माचा अनुयायीच आहे. महायान-हिनयान वगैरेबद्दल तुम्हाला माहिती आहेच. आता जगभरात सामाजिक बौद्ध धम्माचा विकास होत आहे. सामाजिक बौद्ध धम्म म्हणजे सध्याच्या समाजजीवनाला अनुसरून असणारा बौद्ध धम्म. बौद्ध धर्माचे पंचशील जगा बस. धर्माला कट्टरता मान्य नाही. मात्र, सद्गुण जपण्याचे नियम धम्मात आहेत. ते जपणारा कुणीही माझ्यामते बौद्ध धर्माचा अनुयायीच आहे. महायान-हिनयान वगैरेबद्दल तुम्हाला माहिती आहेच. आता जगभरात सामाजिक बौद्ध धम्माचा विकास होत आहे. सामाजिक बौद्ध धम्म म्हणजे सध्याच्या समाजजीवनाला अनुसरून असणारा बौद्ध धम्म.
 
 
बौद्ध धर्म प्रचार-प्रसारसाठी तुमचे पुढचे नियोजन काय आहे?
 
 
सामाजिक बौद्धधर्माच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही ‘धम्म सोल्जर असोसिएशन’ची निर्मिती केली आहे. जगभरातील देशातले धम्मज्ञानी या असोसिएशनचे सदस्य आहेत. भारत ही बुद्धांची भूमी आहे. सद्गुणांची भूमी आहे. इथे सध्या सद्प्रवृत्ती आणि संतांचा सन्मान केला जात आहे. मात्र, तरीही मुळ बौद्ध धम्माचे जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान इथे कमी प्रमाणात उरले आहे. वस्तीपातळीवर धम्मउपासक किंवा भंते यांना धम्माचे खरे विश्ाुद्ध ज्ञान प्राप्त व्हावे, त्यांच्यामार्फत हे द्वेषरहीत, मैत्रीयुक्त शिलवान ज्ञान भारतीय वस्तीपातळीवरील बौद्ध अनुयायांमध्ये पुन्हा रूजावे असा प्रयत्न आहे, म्हणूनच भारतात आम्हाला ‘धम्म सोल्जर असोसिएशन’चे मुख्य कार्यालय उभारायचे आहे. गेल्यावर्षी मी भारतात आलो. त्याआधी मी ‘नॅचरल मेडीटेशन सेंटर’ म्यानमारमध्ये होतो. तिथे सैनिकी उठाव झाला. भारतीय सैन्याने रेस्क्यू ऑपरेशन करत भारतीय भिक्खूंची-भंतेंची तिथून सुटका केली. त्या ऑपरेशनमुळे मी भारतात परतू शकलो. मातृभूमीच्या छायेत पुन्हा धम्माचा प्रसार करायचा आहे. विदेशामधील भंतेजी आणि भारतीय भंतेजी यांच्या जीवनमानात खूप फरक आहे. वृद्ध भंतेजी किंवा काही आरोग्याच्या समस्या असलेल्या धम्म उपासकांना समाज मदत करतो. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांनी निश्चितपणे धम्म उपासना करावी, यासाठी निश्चित अशी व्यवस्था आणि प्रणाली आपल्याकडे नाही. यासाठीही नियोजन करायचे आहे. समाज उदार आहे. सद्गुणांना, संतांना मानतो. त्यामुळे आपल्या या नियोजित कामात समाजातील सज्जनशक्ती नक्कीच सहकार्य करेल. नमो बुद्धाय!
 
 
अधिक संपर्कासाठी - 
धम्म सोल्जर असोसिएशन- [email protected]
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.