मना चंदनाचे परी त्वा झिजावे...

    24-Feb-2022
Total Views | 523
 
swami
 
 
आपल्या गोड बोलण्याने ‘नम्रवाचे’ने समोरच्या माणसावर थोडा तरी चांगला परिणाम होतो. अशा वागण्याने सर्व प्रकारच्या लोकांना शांत करता येते. अर्थात, नुसते गोड बोलून नम्रता दाखवून समाजात लोक आपल्याला ओळखणार नाहीत. त्यासाठी आपल्या नम्रतेने वागण्याबरोबर लोकांच्या अडीअडचणीत निरपेक्षपणे मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे.
 
मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. ६ मध्ये समर्थांनी क्रोध, काम, मद, मत्सर आणि दंभ या विकारांना दूर ठेव, असा मनाला उपदेश केल्याचे आपण मागील लेखात पाहिले. या विकारांना दूर सारण्याचे कारण म्हणजे हे विकार अंतिमत: दु:ख आणि मनस्ताप देणारे आहेत. या विकारांवर स्वामित्व मिळवले नाही, तर त्यामुळे आपले मन:स्वास्थ्य खंडित होणार आहे. त्यात जीवाची परमहानी आहे. या विकारांना आवर घालण्यासाठी एक वेगळ्या प्रकाराचे धारिष्ट मनात असावे लागते. म्हणून समर्थ पुढील श्लोकात सांगतात की,
 
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें।
मना बोलणे नीच सोसीत जावें।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥७॥
 
असे सात्त्विक धैर्य मनात साठवले, तर त्याने अविवेकी विकारांवर ताबा मिळवत येतो. मनातील धारिष्ट, सात्त्विकता, सोशिकता या गुणांची मनाच्या विकासासाठी आवश्यकता असते. आजकाल सभोवार पाहिले तर असे दिसून येते की, माणसांच्या ठिकाणी असलेली सोशिकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सोशिकता, सहनशक्ती कमी झाल्याने वृथाहंकार वाढीस लागतो. परिणामत: कुटुंबात समाजात क्षुल्लक कारणावरुन भांडणे होऊन हाणामारीपर्यंत प्रसंग येतात, अशा बातम्या वृत्तपत्रात रोज वाचायला मिळतात. यासाठी स्वामी सांगतात की, मनाने ‘श्रेष्ठ धारिष्ट’ जपून सोशिकता वाढवली पाहिजे, हे सात्विक धैर्य अनेक प्रकारे काम करीत असते. समाजात वावरत असताना अधम लोकांकडून शुद्र टीका ऐकाण्याचे प्रसंग वरचेवर येतात. अशावेळी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता ते नीच बोलणे सहन करायला शिकले पाहिजे.
भक्तिमार्गात अशा सहनशीलतेची जास्त आवश्यकता असते. यासाठी समर्थ वरील श्लोकात मनाला ‘नीच बोलणे’ सहन करायला सांगतात. त्यासाठीही एक वेगळे मनोधैर्य असावे लागते. विशेषत: भक्तिमार्गाचे आचरण कारणाने अशा निंदाखोर व्यक्तींना फार महत्त्व देऊ नये व त्यांच्या निंदेने निराश होऊन उत्तर देण्याची आवश्यकता नसते. आपण असल्या टीकेला प्रत्युत्तर देत बसलो, तर आपण निंदकाच्या पातळीला उरल्याने आपले स्वास्थ्य गमावून बसतो. निंदकांना नेमके हेच हवे असते म्हणून अधमाच्या क्षुल्लक निंदेला फारसे महत्त्व न देता, त्याकडे दुर्लक्ष केले, तर निंदकाचा कुटील हेतू साध्य होत नाही. समर्थांनी अशा निंदकांच्या निंदेची बरोबर जागा दाखवली आहे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात,
तया वाजटा मर्कटा कोण पुसे।
सदा सर्वदा भूंकती श्वान जैसे॥
जनांचे नीच बोलणे सहन करणे हे श्वानाच्या भुंकण्यासारखे आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या सत्य-विवेकी वागण्यापासून ढळू नये. नेहमी आपले सर्वांशी वागणे-बोलणे नम्रपणाचे असावे. भक्तिमार्गात अशा नम्र भाषेचा, वागण्याचा फार उपयोग होतो. संतांची चरित्रे पाहिली, तर असे दिसून येत की, त्यांची निंदा करताना, त्यांचा द्वेष करुन टीका करणार्‍यांना संतांनी नम्रपणे वागून त्यांची टीका बोथट करुन टाकली आहे. अखेरीस हे निंदक संतांना शरण आलेले दिसून येते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज या संतांनी त्यांच्या आयुष्यात सर्वदा ‘नम्रवाचे’चा वापर केला. त्यांच्या नम्र वाणीने व वागणुकीने त्यांच्याशी शत्रुत्व पत्करणारे निंदकही पश्चातापदग्ध होऊन त्यांना शरण आलेले आहेत. त्यांच्या कथा सर्वपरिचित असल्याने त्या पुन्हा सांगण्याचा मोह आवरतो. ‘श्रेष्ठ धारिष्ट’ धरणारी व ‘नम्रवाचे’ने लोकांचे अंत:करण शांत करणारी माणसे भक्तिमार्गात संत पदवीला पोहोचतात, यात नवल नाही. अशा सत्प्रवृत्त माणसांची कीर्ती ते गेल्यावरही वर्षानुवर्षे टिकून राहते. या जगात येऊन अशाश्वताचा संग्रह करुन मागे काहीही शिल्लक राहत नाही. पण, सत्प्रवृत्तांची कीर्ती त्यांच्यामागे लोक गात असतात. म्हणून स्वामींनी या पुढच्या श्लोकात मनाला या स्वरुपाचा उपदेश केला आहे. तो श्लोक असा-
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी।
मना चंदनाचे परी त्वां झिजावें।
परी अंतरी सज्जना नीववावें ॥८॥
आपल्या गोड बोलण्याने ‘नम्रवाचे’ने समोरच्या माणसावर थोडा तरी चांगला परिणाम होतो. अशा वागण्याने सर्व प्रकारच्या लोकांना शांत करता येते. अर्थात, नुसते गोड बोलून नम्रता दाखवून समाजात लोक आपल्याला ओळखणार नाहीत. त्यासाठी आपल्या नम्रतेने वागण्याबरोबर लोकांच्या अडीअडचणीत निरपेक्षपणे मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे. कारण, या देहाचा भरवसा नाही. प्राणी जन्माला येऊन परोपकाराशिवाय तसाच जग सोडून गेला, तर त्याची आठवण कोणालाही येणार नाही. देह गेल्यावर मागे काय उरणार आहे? जाणार्‍या माणसाच्या मागे फक्त त्याची सत्कृत्ये सत्कीर्ती, परोपकार याच गोष्टी उरतात. हा विवेक ज्याने सतत बाळगला, ती व्यक्ती आयुष्यभर चारित्र्यसंपन्न जीवन जगून परोपकार व सत्कृत्ये करण्यात आपले जीवन व्यतित करते. गरजूंना मदत करते. अशारीतीने लोकोपयोगी कामे नि:स्वार्थ बुद्धीने करणार्‍याची कीर्ती तो गेल्यावरही मागे उरते. हे स्पष्ट होण्यासाठी स्वामी या श्लोकात चंदनाचे उदाहरण देतात. चंदन लोकांना थंडावा व सुवास देण्यासाठी स्वतः झिजत असते. त्याप्रमाणे आपण कष्ट करून सज्जनांना आनंद द्यावा.
सत्कृत्ये केलेले सज्जनांना आवडते. त्यापासून सज्जनांना आनंद होतो. सज्जनांना परोपकार आवडतो. त्यामुळे परोपकार करणार्‍या व्यक्तीत त्यांना परमेश्वराचा अंश दिसतो. प्रा. के. वि. बेलसरे म्हणतात, “ज्या समाजात असे निःस्वार्थी परोपकारी भक्त पुष्कळ प्रमाणात असतात, तो समाज निरोगी असतो आणि असाच समाज सुखी असणार, यात शंका नाही. आज आपल्या समाजाला अशा लोकांची नितांत गरज आहे. फक्त टाळ मृदुंगाच्या गजरात देवाला आळवणे एवढाच भक्तिमार्गाचा अर्थ नाही, तर त्या आळवण्याबरोबर सज्जनांना आनंद मिळवून देणार्‍या गोड नम्र वागणार्‍यांची तसेच चंदनाप्रमाणे स्वतः झिजून नि:स्वार्थपणे लोकोपयोगी कामे करणार्‍यांची संख्या समाजात वाढवणे, हे भक्तिमार्गाला अपेक्षित आहे. राघवाच्या पंथातील भक्तिमार्ग शोधताना समर्थांनी या भक्तिमार्गाच्या खुणा लोकांना दाखवून निःस्वार्थ बुद्धीने वागून कीर्ती मागे उरवावी, हे लोकांना सांगून सर्व समाज सुसंस्कारित आनंदी कसा होईल, याचा पाया रचला आहे. हे सुविचार कितीही चांगले असले, तरी मनात असलेला अतिस्वार्थ त्या विचारांना जवळ येऊ देत नाही. हा अतिस्वार्थ आणि हाव याची चर्चा समर्थांनी या पुढील श्लोकातकेली आहे.
 
- सुरेश जाखडी
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121