नव्या जागतिक व्यवस्थेत भारत-अमेरिका

    15-Feb-2022   
Total Views |

india
आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील भारताची उदयोन्मुख भूमिका, जागतिक व्यवस्थेची ताकद आणि स्थैर्यासाठी भारताचे वाढते योगदान, भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय भूमिकेच्या विरोधात कोणते मुद्दे, आव्हाने उभी ठाकली आहेत आणि भारताने स्वतःला महत्त्वाच्या जागतिक भूमिकेत बदलत असताना कोणत्या संधींचा फायदा घ्यावा, हे मुद्दे सध्या केंद्रस्थानी आले आहेत. जागतिक व्यवस्थेमध्ये बदल होणे आता काळाची गरज आहे, हे भारताने विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून अनेकदा सांगितले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्या जागतिक व्यवस्थेचा विचार करता, त्यामध्ये भारत आणि अमेरिका यांचे परस्पर सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांची रुपरेषा पाहणे महत्त्वाचे आहे.
अमेरिकन हितसंबंधांसाठी भारताचे प्रादेशिक आणि जागतिक महत्त्व निर्विवाद असूनही, अनेक दशकांपासून अमेरिका द्विपक्षीय आणि प्रादेशिक सहकार्य आणखी वाढवण्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांचा विचार करण्यास तयार नव्हती. याचे प्रमुख कारण भारताकडे असलेली अण्वस्त्रे हे होते. परंतु, सन २००० नंतरच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेला अनेक मुद्द्यांवर पुढे जाण्यासाठी भारतासोबत सक्रिय आणि रचनात्मक भागीदारी आवश्यक वाटू लागली. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या जागतिक युद्धात भारताने संघटित दहशतवादाच्या धोक्याविरुद्ध लढा दिला होता; याने दोन्ही देशांना गुप्तचर, कायद्याची अंमलबजावणी आणि लष्करी संबंधांमध्ये अधिक सहकार्यासाठी एक व्यावहारिक व्यासपीठ दिले. दोन्ही देशांमधील ‘सायबर’ सुरक्षा सहकार्य अलीकडच्या वर्षांत सातत्याने वाढले आहे. याशिवाय, अमेरिकेला हे लक्षात आले आहे की, वाढत्या चीनचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबत सहकार्य वाढवणे आवश्यक आहे.
भारताने फार पूर्वीच ओळखले होते की, चीनचे मुख्य धोरणात्मक उद्दिष्ट हे अमेरिकेची जागा घेऊन आशियातील सर्वात महत्त्वाचे शक्ती बनवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेने स्थापन केलेली सध्याची आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था नष्ट करणे हे आहे. यासोबतच चीनच्या सामरिक महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेची मजबूत प्रादेशिक आणि जागतिक स्थिती महत्त्वाची आहे, हे भारतालाही व्यवस्थितपणे माहिती आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये, भारत-अमेरिका संबंध जवळजवळ प्रत्येक परिमाणांमध्ये विस्तारले आहेत. त्यामध्ये राजकीय, मुत्सद्दी, आर्थिक आणि लष्करी या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे २१व्या शतकातील भारत-अमेरिका यांची भक्कम भागीदारी हे एक व्यावहारिक वास्तव आहे. २०२० मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या वाढत्या सहकार्याची दोन प्रमुख कारणे होती. पहिले म्हणजे जागतिक कोरोना महामारी आणि दुसरे म्हणजे कोरोना साथीविषयी चीनची संशयास्पद भूमिका, हाँगकाँगविषयी चीनची भूमिका या कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. आशिया खंडातील घडामोडींसाठी अमेरिकेस भारताची साथ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, यात आता शंका राहिलेली नाही.
आज जागतिक समुदायास भेडसावणार्‍या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये भारतही निर्णायक भूमिका बजाविण्याच्या बेतात आहे. हवामान बदल, सर्वांगीण विकास, असमानता दूर करणे आणि वाढत्या जागतिक लोकसंख्येला आधार देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी, रोजगार देण्यासाठी मजबूत जागतिक अर्थव्यवस्थेची अपेक्षा यामध्ये भारत सातत्याने सकारात्मक भूमिका बजावित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारताने संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचावर एक स्थायी शक्ती म्हणून काम केले आहे. भारताने अमेरिका-रशिया संबंधांच्या अनेकदा तणावाच्या काळात कौशल्याने स्वत:ला सुरक्षित ठेवले आहे, विकसनशील जगाच्या अगणित आव्हानांचा सामना केला आहे आणि ‘सायबर’ युगातील खोटी आश्वासने आणि जोखमींविरुद्धच्या लढ्यात एक प्रमुख आवाज म्हणून उद्यास आला आहे. देशांतर्गत पातळीवर पाकिस्तान आणि चीनशी व्यवहार करण्यात भारत व्यस्त असताना या सर्व गोष्टी करत आहे. त्यामुळे भारताने आता एकाचवेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची कौशल्याने हाताळणी करण्याचे कौशल्य साध्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी भारतासारख्या भरवशाच्या साथीदाराची नितांत गरज असल्याचे स्पष्ट आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.