अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

    08-Dec-2022   
Total Views |
 
AAP
 
 
 
अखेर गुजरात विधानसभाचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपने सर्व विक्रम मोडीत काढत सत्ता पुन्हा मिळवली. भाजपने सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक वेळा सत्तेत येण्याचा कम्युनिस्ट पार्टीचा विक्रमही भाजपने मोडीत काढला. या ऐतिहासिक विजयामुळे काँग्रेसची दाणादाण उडाली असून, आता विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदासाठी आवश्यक 20 जागाही काँग्रेसला जिंकता आल्या नाही. परंतु, याहीपेक्षा सर्वाधिक गोची ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची झाली आहे. केजरीवालांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत आहे. यात त्यांनी आपला पक्ष गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल, असा लेखी दावा केला होता. एवढेच नाही, तर त्या कागदावर सत्तास्थापनेचा लेखी दावा करत स्वाक्षरी करून तारीखही लिहिली होती. विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते पंजाब निवडणुकीप्रमाणे यंदाही आपल्या लेखी दाव्यावर कायम राहिले. सत्ताविरोधी लाटेचा आणि काँग्रेसच्या उदासीनतेचा फायदा पक्षाला होईल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, निकालानंतर हा दावा साफ खोटा ठरला असून केजरीवाल पुन्हा एकदा तोंडावर आपटले. ‘आप’चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशुदान गढवी आणि पाटीदार आंदोलनातील प्रमुख चेहरे अल्पेश कथिरिया आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. 182 पैकी केवळ पाच जागा आपला जिंकता आल्या, तर भाजपने 156 जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले. हिमाचल प्रदेशात तर ‘आप’ला भोपळाही फोडता आला नाही. आत्मविश्वास असावा, पण अतिआत्मविश्वास घातक असतो असे म्हणतात आणि तेच गुजरातच्या निकालांवरून दिसून येते. केजरीवालांचा खोडसाळपणा हा नवा नाही. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीतही भाजप फक्त 20 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला. परंतु, हादेखील दावा खोटा ठरवत भाजपने तिथे 104 जागा जिंकल्या. मोफत वाटप योजनेचे शिल्पकार असलेल्या केजरीवालांनी घोषणांची राळ उठवली. परंतु, केजरीवालांच्या भ्रमाचा भोपळा जनतेने फोडलाच! मराठीत अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण आहे आणि केजरीवालांच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. लिहून देऊन अतिशहाणपणा केला खरा, पण हाती मात्र काहीही लागलं नाही.
 
 
रामपूरचा पहिला हिंदू आमदार
 
 
आतापर्यंत समाजवादी पक्षाच्या आझम खान यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशातील रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, 70 वर्षांत झालेल्या 20 विधानसभा निवडणुकांनंतर या मतदारसंघाला प्रथमच हिंदू आमदार मिळाला आहे. रामपूरमध्ये भाजपचे उमेदवार आकाश सक्सेना यांनी 80 हजार, 964 मते मिळवत 34 हजारांहून अधिकच्या फरकाने सपाचे मोहम्मद आसीम रजा यांना पराभूत केले. स्वातंत्र्यानंतर रामपूरमध्ये पहिल्यांदाच आकाश सक्सेना यांच्या रूपाने एक हिंदू आमदार निवडून आला आहे. परंतु, आझम खान यांच्या बलाढ्य साम्राज्याला आव्हान देणे सोपे नव्हते. भाजपचे विजयी उमेदवार आकाश सक्सेना यांनी आधी आझम खान यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढली आणि जिंकली. त्यानंतर राजकीय लढाईतही त्यांनी आझम यांना धूळ चारली. आकाश सक्सेना यांचे वडील शिव बहादूर सक्सेना हे स्वार विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहे. कल्याण सिंह सरकारमध्ये ते मंत्रीही होते. 2017 साली निवडणुकीत त्यांनी आझम यांच्याविरोधात रामपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. यानंतर 2022 मध्ये आकाश सक्सेना यांचाही आझम यांच्याकडून पराभव झाला. मात्र, आकाश यांनी निवडणूक लढण्यापूर्वीच आझम यांच्याविरोधात कायदेशीर लढाई पुकारली होती. 2019 मध्ये त्यांनी आझम खानसह त्यांच्या पत्नी, माजी खा. ताजीन फातमा आणि मुलगा आ. अब्दुल्ला आझम यांच्याविरुद्ध बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आझम खान आणि त्यांच्या पत्नीने मुलगा अब्दुल्लाचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप सक्सेना यांनी केला होता. नंतर या प्रकरणात अब्दुल्लाची आमदारकी उच्च न्यायालयाने रद्द केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, आझम यांना भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली आणि आमदारकीही गेली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या रामपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सपाने आझम यांचे निकटवर्तीय आसिम रजा यांना उमेदवारी दिली, तर भाजपने आकाश सक्सेना यांना तिकीट दिले. अखेर कायदेशीर लढाईनंतर राजकीय लढाईतही आकाश यांनी आझम यांचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करत पहिला हिंदू आमदार होण्याचा मान मिळवला.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.