खिचडीवर बहिष्कार घालू...

    20-Dec-2022   
Total Views |

NCP




बाबा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्याच्या पदाधिकार्‍यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा किती राग आला. काय सांगू? बघा ना राष्ट्रवादीवाल्यांनी कर्नाटकला चांगलाच धडा शिकवला. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी इडली, डोसा न खाण्याचे ठरवले. आपण काय करूया बाबा, त्यांनी इडली, डोसा न खायचे ठरवले, आपण मेदूवडा आणि उत्तपा खाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करूया का? आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करून लगेचच जाहीर करूया की, आम्हीसुद्धा कर्नाटकचा मेदूवडा आणि उत्तपा आजपासून खाणार नाही! किती मस्त ‘आयडिया’ आहे ही! पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी लढा द्यायचा छान मार्ग काढला आहे. ते लोक इडली, डोसा खाणार नाही आणि आपण लोक मेदूवडा, उत्तपा खाणार नाही म्हटल्यावर कर्नाटकची अर्थव्यवस्था पार कोलमडेल हो ना? बाबा...बाबा ऐकता ना? आपण की नाही असाच पाकिस्तानला, चीनला पण धडा शिकवू. आपण असे करू ना की, ते पाकिस्तानी नाक घासत येतील. आपण आजपासून मटन बिर्याणी, सीख कबाब खाणार नाही, अशी शपथ घेऊ. मग चीनला तरी का सोडूया. बाबा, चीनचे नुडल्स, सूप, फ्राईड राईस, शेजवान चटणी आणखी काय काय आहे, यापैकी आपण कोणत्या खाद्यपदार्थावर बंदी टाकायची? हं... इतक्या सगळ्या पदार्थांवर बंदी टाकायची आहे. मग त्याऐवजी काय खायचे याबद्दल संशोधन करायला हवे बाबा. किती दिवस झाले तुमचा कॅमेरा बाहेर काढला नाही, तुमचा कॅमेरा, तुम्ही, मी आणि हो तुम्ही स्वतः ‘ड्राईव्ह’ केलेली ती कार. त्या कारमध्ये बसू आणि शोध घेऊ की या सगळ्या पदार्थांवर बंदी आणली, तर मग त्याऐवजी खायचे काय? बाबा, काही तरी बोला? काय म्हणता बाबा, कर्नाटक पाकिस्तान चीनपेक्षा आसामच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू या? हो, ते ४० जण आसामला होते नाही का? आसाम होशियार...तैयार.... आम्ही तुमच्या विरोधात आहोत. तुमच्या पदार्थांवर, चहावर आम्ही आजपासून बहिष्कार करतोय. बाबा, हे सगळे ठीक आहे, पण आपण एक तर विसरलो, गुजरातचा ढोकळा आणि पापडी; जमलच तर ठेपला यांच्यावर तर पहिला बहिष्कार घालू. हो, मोदींना मुगाची खिचडी आवडते. आपण खिचडीवरच बहिष्कार घालू. मोदीजी तयार राहा, आम्ही आता तुमच्या आवडत्या खिचडीवर बहिष्कार घालणार आहोत. विरोधकांना आम्ही पुरून उरतो. होशियार.. तैयार...!

आरक्षणाच्या नावाखाली...



“धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. देशभरात सर्वत्र समान तत्वावर धनगरांना आरक्षण मिळालेच पाहिजे,” अशी मागणी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. एक एकरात कोटी रुपयाची वांगी पिकवण्याइतकेच धनगर समाजाला आरक्षण देणे सोपे असावे, असे कदाचित सुप्रियाताईंना वाटले असेल. बाकी काहीही म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते हाडाचे शेतकरीच आहेत.त्याशिवाय का सुप्रिया यांनी कोटी रुपयाची वांगी पिकवली, तर छगन भुजबळ सकाळी भाजी विकून कोट्यधीश झाले? आता छगन भुजबळ भाजीमंडईत जी भाजी विकायचे, त्यातही सुप्रियाताईंच्या मळ्यातली वांगी होती की नाही, याचा तपास करावा लागेल. असो. विषयांतर झाले, तर धनगर समाजासाठी आरक्षण हवे आहे, असे ताई म्हणाल्या. पण, स्वत: राज्यात सत्तेवर असताना मराठा आरक्षणाचे तीनतेरा वाजले होते, पुन्हा भाजप आणि शिंदेगट एकत्र आल्यावर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले, हे सुप्रियाताईंना आठवत नाही का? सुप्रियाताईंचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही धक्का पेाहोचला होता, हे तरी सुप्रियाताईंना आठवते का? स्वतः सत्तेत असताना आरक्षण वगैरे सगळ्याच हक्कांना बासनात बांधून ठेवायचे किंवा नाकारायचे आणि विरोधी पक्षात गेले की पुन्हा आरक्षण.... आरक्षण करत गदारोळ करायचा. हेच आजपर्यंत या लोकांनी केले. सध्या सुप्रियाताई या लोकांचे नेतृत्व करतात इतकेच. आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. मात्र, आरक्षण मिळण्यासाठीचेही काही नियम आहेत, प्रणाली आहे. त्याबाबत कसलाही विचार न करता, एखाद्या समाजाला उगीचच आरक्षणाच्या नावानेगाजर दाखवायचे, चिथवायचे हे धंदे बंद झालेच पाहिजेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वाटते की, खरेच सुप्रिया सुळे आणि त्यांच्या नेत्यांना धनगर समाजाबद्दल काय वाटत असेल? महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला, प्रतिमेला हार घालणे आणि पिवळा भंडारा उधळणे यापलीकडे सहसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धनगर समाजाचे काही चांगभले केले का? धनगर समाजाने समर्थन द्यावे म्हणून सुप्रियाताईंनी आता आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला यात शंकाच नाही.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.