‘आप’चे पाप आणि पापाला अंत असतोच!

    05-Nov-2022   
Total Views |
arvind
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीचा विचार गंभीरतेने करायलाच हवा. आम आदमी पार्टी सत्तेत येऊ शकतो म्हणून नाही, तर सत्तेसाठी आम आदमी पार्टी अर्थोअर्थी अरविंद केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात म्हणून! हा कोणताही थर वैयक्तिक नसून राष्ट्र अस्थिरतेशी संबंधित आहे असे मला वाटते. आम आदमी पार्टीशी संबंधित अनेक घटनाक्रमातून आणि पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांच्या विचारकृत्यांतून हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्या सगळ्या व्यक्तींचा आणि घटनांचा इथे धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून एकच जाणवत राहते ते म्हणजे ‘आपचे पाप!’
2020 साली दिल्लीत अतिशय हिंसक दंगल. याच दंगलीमध्ये अंकित शर्मा या अधिकार्‍याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. 53 लोकांचा खून झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. तेव्हा ‘आप’चा नेता ताहिर हुसेनच्या घरावरून हिंदू वस्त्यांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. नुकतीच न्यायालयात केस उभी राहिली. त्यानुसार ताहिर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ‘एसई-पीएल’, ‘इसीपीएल’आणि ‘इजीएसपीएल’ या तीन कंपन्यांच्या मार्फत पैशाची लेनदेन केली. वेगवेगळ्या बोगस कंपन्यांच्याद्वारे 1.5943 कोटी रुपये ताहिर हुसेनपर्यंत पोहोचले. ताहिरने या पैशाचा वापर दंगे भडकवण्यासाठी केला.
 
 
 
 
 
 
 
उत्तर पूर्व दिल्लीतील हिंदूंवर हल्ला करणे त्यांना घाबरवून तिथून पळवून लावण्यासाठी केला असा आरोप आहे. त्यासाठी त्याला अटकही झाली होती. घटना दुसरी - दिल्लीमध्ये शाहीनबाग आंदोलनही वाईट अर्थाने गाजले. देशाला अस्थिर करण्याचे, देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम या आंदोलनाने केले. या आंदोलनाचे संबंध देशविघातक शक्तींशी जोडलेले होते, हेसुद्धा सिद्ध झाले. पण, या आंदोलनात जाऊन तिथे लोकांना आणखीन उकसवण्यासाठी अमानतुल्ला खान नावाचा व्यक्ती गेला. त्याने या आंदोलनात सहभाग घेतला. इतकेच काय, मोहसिन नावाचा तरुण बिहारहून दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये राहायला आला. त्याला ‘राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी’ने अटक केली. यावर अमानतुल्लाने तिथल्या मुसलमान समाजाला भडकवायला सुरुवात केली की, मुससलमानांना बदनाम करण्यासाठी भाजप आणि रा. स्व. संघ असे करत आहे.
 
 
 
 
 
 
 
खरे तर ही कारवाई भाजप किंवा रा. स्व. संघाने केली नव्हती, तर त्याचे आणि ‘इसिस’शी लागेबांधे असून तो ‘इसिस’साठी काम करतो, असे ‘राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी’ला पुरावे मिळाले. तेव्हा त्याला अटक करण्यात आली. याच अमानतुल्लावर ‘वक्फ बोर्डा’च्या पैशाची अफरातफरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगले म्हणून सध्या कारवाई झाली आहे.अशीच एक घटना हरियाणामधील गुरूग्राम परिसराची. दि. 15 मे, 2015 रोजी अतिक्रमण विरोधी कारवाई प्रशासनाने केली, तर तिथे बेकायदेशीर राहणार्‍या लोकांनी कारवाई करण्यास आलेल्या ‘ड्युटी मॅजिस्टे्रट’वर आणि पोलिसांवर हल्ला केला.
 
 
 
 
 
 
पेट्रोल बॉम्ब आणि ‘एलपीजी’ सिलिंडर फेकले. ‘ड्युटी मॅजिस्ट्रेट’ आणि 15 पोलीस जखमी झाले. या जमावाला चिथावणी देणारी आणि नेतृत्व करणारी निशा सिंग होती. या तिन्ही घटना वेगवेगळ्या वाटतात. पण, यातले आंतरिक साम्य हेच आहे की, तिन्ही घटना देशाच्या कायदा-सुरक्षा आणि प्रशासनविरोधातल्या आहेत. दिल्ली दंगलीतला ताहिर किंवा दिल्लीमधील ‘वक्फ बोर्ड’च्या पेशाचा भ्रष्टाचार करून वर अतिरेक्यांची वकिली करणारा शाहीनबागसारख्या निव्वळ देशविघातक आंदोलनाला समर्थन करणारा अमानतुल्ला किंवा हरियाणात पोलीस आणि मॅजिस्ट्रेटवर हल्ला करणार्‍यांचे नेतृत्व करणारी निशा सिंग हे तिघेही जण कोण आहेत? तर ताहिर हा आम आदमी पार्टीचा नगरसेवक, अमानतुल्ला खान हा आम आदमी पार्टीचा आमदार, तर निशा सिंग हीसुद्धा आम आदमी पार्टीची नगरसेविका. आम आदमी पार्टीचे पंजाबमधील खासदार धरमवीर गांधी, साधु सिंह आणि अन्य नेता बलबीर सिंह प्रतिबंधित असलेल्या ‘सीपीआय’मध्ये सक्रिय पद्धतीने सहभागी होते, असा आरोप पंजाबच्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आरोप केला होता.
 
 
 
 
 
 
 
झारखंडमध्ये आम आदमी पार्टीची महिला अध्यक्ष सोनी सुरी होती. तिच्यावर नक्षल सक्रियेतेसह खून, अपहरण, हिंसा असे डझनभर गुन्हे दाखल होते. त्यासाठी ती तुरूंगातही होती. सध्या ती तुरूंगातून सुटली आहे. काल-परवाच असाममधील आम आदमी पार्टीचा नेता तनु धुमालियाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहे, असे सिद्ध झाले. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये आम आदमी पार्टी हा पक्ष आणि त्याचे नेते गुंतलेले असणे हा काही योगायोग नाही, तर या सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या कारवायांमधून सत्ता मिळवावी, असे षड्यंत्रही असू शकते. आजपर्यंत भारतीय राजकारणात भ्रष्टाचार करणारे राजकारणी आपण पाहिलेले आहेत. मात्र, देशाला अस्थिर करणार्‍या, देशाची बदनामी करणार्‍या देशात जातीय, धार्मिक दंगली माजवताना सहभागी होणारे नेते आणि कार्यकर्ते आम आदमी पार्टीचा रूपाने जगासमोर आले. जनतेच्या भावनांशी खेळत त्यावर सत्तेची पोळी लाटायची.
 
 
 
 
एकदा सत्ता मिळाली की, मग आपले उखळ पांढरे करायचे. पुढे आणखीन सत्ता मिळवण्यासाठी सामदाम दंडभेद ज्यात अगदी खालच्या स्तरावरचेही कृत्य करायचे यामध्ये आम आदमी पार्टीचा हात कुणी धरू शकत नाही.उदाहरणच द्यायचे झाले तर दिल्लीच्या लोकांना फुकट वीज, पाणी शिक्षण वगैरेचे गाजर दाखवत ‘आप’ने दिल्लीत सत्ता काबीज केली. सध्या गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण तापलेआहे. राष्ट्रीय राजकारणात यायचे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याविरोधात उतरले पाहिजे, इतकी समज केजरीवाल यांना आहे.
 
 
 
 
 
 
 
गुजरातमध्ये सत्ताकारणात मुसंडी मारली, तर देशाचे नव्हे जगाचे लक्ष आपण वेधून घेऊ, हेसुद्धा केजरीवाल यांना समजते. देश, देव, धर्माबाबत कार्य करत नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकला आणि पुढे देश जिंकला, आपणही असेच काहीतरी केले पाहिजे, हेसुद्धा केजरीवाल यांना चांगलेच समजते. केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला काय आश्वासन द्यावे? तर “मला गुजरातने निवडून दिले, तर मी इथल्या लोकांना विनामूल्य अयोध्येच्या राममंदिराचे दर्शन घडवणार, त्या दरम्यान प्रवास, निवास, खाणेपिणे सगळे सत्ताधारी‘आप’ पक्ष करेल. इतकेच काय भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशांचे चित्र असावे, अशीही मागणी केजरीवाल यांनी केली. ‘सत्तेसाठी काहीही’ अशी धारणा असलेल्या आणि जनतेलाभिकारी आणि मूर्ख समजणार्‍या केजरीवाल यांची ही आश्वासनं आणि मागणी. हे पाहिले की, खरंच चीड येते. कारण, हेच अरविंद केजरीवाल आहेत, ज्यांनी अत्यंत संतापजनक टिट्वस यापूर्वी केले आहेत. एका टिट्वमध्ये अरविंद केजरीवाल यांनी ’झाडू घेतलेली एक व्यक्ती स्वस्तिक चिन्हाला पळवून लावते’ असे दाखवले तर दुसर्‍या टिट्वमध्ये पवनपुत्र हनुमानसदृश्य एका व्यक्तिरेखेच्या शेपटीला आग लागली आहे आणि ती नरेंद्र मोदींना सांगते की, काम झाले. आता सगळ्यांचे लक्ष्य जेएनयु आहे.
 
 
 
 
 
 
हनुमान आणि स्वस्तिक या दोन्हीप्रती हिंदू समाजाच्या श्रद्धा-भावना असिम आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा अपमान केला होता. अरविंद केजरीवाल यांचा खूप खास आणि आम आदमी पार्टीचा संयोजक अकिल खान आहे. त्याने नुकतेच एका टीव्ही शोमध्ये म्हंटले की, ‘’ऐतिहासिक सत्य आहे आणि याबद्दल कुणाला शंका नाही की, सनातनधर्म भारताबाहेरून आला. या लोकांनी भारताचेनुकसान केले,” तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचा दिल्लीच्या माजी मंत्री राजेंद्र पाल गौतमने श्री राम आणि कृष्णाचा अपमान करत लोकांना शपथ घ्यायला लावली होती. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात प्रमुख पदी अशी हिंदू मान्यतेविरोधी लोक सत्तास्थानी आहेत. त्या अरविंद केजरीवालांना आता हिंदू धर्म, देव आणि हिंदू जनता दिसू लागली. कारण, त्यांच्या मते जनता केवळ मतदानाचे साधन आहे.
 
 
 
 
 
 
 
असो. दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एकही खात्याचे मंत्रिपद स्वत:कडे ठेवले नाही. कारण, अरविंद केजरीवाल प्रशासकीय अधिकारी होते. त्यामुळे एखाद्या खात्यात भ्रष्टाचार झाला किंवा त्या त्या विषयाच्या खात्याने काही कामच केले नाही, तर या सगळ्या गोष्टीचे उत्तरदायित्व खात्याच्या मंत्र्याकडे जाते, हे त्यांना चांगलेच ठाऊक. सध्या दिल्लीत भ्रष्टाचाराने लिप्त असलेल्या आम आदमी पार्टीचे घाणेरडे रूप बाहेर आले. मात्र, अरविंद केजरीवाल या सगळ्याबाबत ‘आपण त्या गावचेच नाही’ असा पवित्रा घेत आहेत. कारण, त्यांच्याकडे एकाही खात्याचे दायित्व नाही. त्यामुळे त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराविरोधात जबाबदार ठरवण्यात आले.
 
 
 
 
 
 
 
ज्यांना राजकारण आणि प्रशासकीय कामाचा थोडा जरी अनुभव आहे ते सांगू शकतील की, कोणत्या खात्यात काय चालले आहे, या तपशीलाची माहिती मुख्यमंत्र्यांना नको असेल तरीसुद्धा त्याला प्रशासकीय अधिकारी देतच असतात. मग दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात ‘आप’चे मंत्री घोटाळे करत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अरविंद केजरीवाल यांना जराही माहिती नसणे हे कितपत शक्य आहे? अर्थात, शक्यच नाही. हे सर्व कमी की काय? तर तिहार तुरूंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने जाहीर केले की त्याने अरविंद केजरीवाल यांना 50 कोटी रूपये दिले. असोला येथील फार्महाऊसमध्ये सत्येंद्र जैन आणि कैलाश गहलोत यांना ते पैसे दिले. केजरीवाल यांनी त्याला सांगितले म्हणे की, अशा 30 व्यक्तींना गोळा कर, जे 500 कोटी रुपये देऊ शकतील. त्या पैशातून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आप पक्ष मजबूत करू. त्याबदल्यात सुकेश याला दक्षिण भारतात आम आदमी पार्टीचे मोठे पद देणार. इतकेच काय त्याला तुरूंगात सुरक्षित राहण्यासाठी त्याच तुरूंगात कैदी असलेले ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन याने चंद्रशेखर यांच्याकडून दहा कोटी रुपये खंडणीही मागितली.
 
 
 
 
 
 
 
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या कथा याआधीही घडल्या आहेतच. पण, याबाबतीत आम आदमी पार्टी ‘सीपीआयएम’शी बरोबरी करू शकतो, हे निश्चित. बरं आम आदमी पार्टीचे काही छुपे अजेंडाही आहेत, असे मला वाटते. हेच पाहा ना, पंजाबचे मुख्यमंत्री कोण तर भगवत सिंग मान. दारू पिऊन काहीही करण्याचे प्रताप त्यांच्या नावावर आहे. ‘वाहे गुरू दा खालसा वाहे गुरू दी पत्ते’ असे ज्या पंजाबची ख्याती आहे, त्या पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून दारूबाज व्यक्तीची का निवड केली असेल? सीमेलगतच्या संवेदनशील राज्यात असा मुख्यमंत्री देऊन पंजाबच्या युवकांसमोर मुद्दाम काही कुविचार तर रुजवायचे नाहीत ना? तुमचा मुख्यमंत्री दारू पितो, पण तो झाला ना मुख्यमंत्री! नशा करणे काही वाईट नाही वगैरे वगैरे. दुसरे असे की, नुकताच अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांना जाहीर केले.
 
 
 
 
 
 
 
 
इसुदान याच्यावरही दारू पिऊन महिलेला त्रास देण्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यासाठी त्यानेही तुरूंगाची हवा खाल्ली आहे. ज्या गुजरातने नरेंद्र मोदींसारखापंतप्रधान देशाला दिला, त्या गुजरातचा मुख्यमंत्रिपदाचा ‘आप’चा चेहरा महिलेला त्रास देणारा देऊन आम आदमी पार्टी काय सिद्ध करू इच्छिते? तर मला वाटते की, संस्कृती, धर्म-परंपरा जपणार्‍या गुजरातला अरविंद केजरीवाल सांगू इच्छितात, ”दारू पिऊन महिलेला त्रास द्या. तुम्ही असे काहीही केले तरीसुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार राहू शकता.” भारतीय जनतेच्या मनात असे वाईट संकेत अरविंद केजरीवाल मुद्दाम उमटवत असतील असे वाटत राहते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे सर्वेसर्वाविवेक अग्निहेात्री काय म्हणाले हे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ”मी आश्वस्त आहे की, अरविंद केजरीवाल भारतातील सर्वांत धोकादायक ‘शहरी नक्षलवादी’ आहे. व्यक्ती जी त्याला कुणीतरी कानाखाली मारण्याची खोटी बातमी फसरवू शकतो आणि काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराला खोटे म्हणू शकतो ती व्यक्ती काहीही करू शकते.” गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. छटपूजेच्या दिवशी मच्छू नदीवरचा झुलता पूल कोसळला आणि 141 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे विधान विवेक यांनी टिट्व केले. त्या टिट्वमध्ये त्यांनी काही ‘स्क्रिनशॉट’ही टाकले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
ज्यात आम आदमी पार्टीशी येनकेन प्रकारे संबंधित असलेले लोक पूल कोसळण्याच्या आदल्या दिवशी म्हणाले आहेत, ‘गुजरात में कुछ बडा होगा!’ अर्थात, काही लोक म्हणतील की, हा योगायोग असू शकतो. पण, योगायोग नेमका इतका तत्काळ आणि प्रांसंगिक कसा? आता विवेक म्हणालेत म्हणून त्याला डोळे झाकून सत्यच मानायचे, असे काही नसले तरीसुद्धा काही घटनांचा मागोवा घ्यायला हवाच. तो मागोवा घेताना आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचा धूर्तपणा पदोपदी जाणवतो. यावर कुणी म्हणेल की, मग राजकारणात साळसुदपणा चालतो का? तर तसेही नाही. पण, जनतेला भिकारी आणि मूर्ख समजत त्यांचा वापर करत देश आणि समाजाला अस्थिर करत केवळ सत्तास्वार्थ साधणे, हे खरच पाप आहे. ‘आप’ ते पाप करत आहे. गुजरात निवडणुकीतून धूर्त अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीचे भवितव्य समोर येणार आहे. पापाला अंत असतोच म्हणा...
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.