‘तू मैं एक रक्त’ जगताना...

    26-Nov-2022   
Total Views |
 Laxman Tople
 
 
‘वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्रा’चे माजी अध्यक्ष लक्ष्मण टोपले. वनवासी समाजाची संस्कृती, साहित्य यावर त्यांचा गाढा अभ्यास. त्यांच्या जीवनविचारांचा घेतलेला मागोवा...
 
ठाणे-पालघर जिल्ह्यातील कोकणा वनवासी लोकसाहित्याचा भाषिक आणि सांस्कृतिक अभ्यास’ या विषयाचा प्रबंध त्यांनी सध्या पुणे विद्यापीठात सादर केला आहे. हा विषय त्यांचा नुसता अभ्यासाचा विषय नाही, तर जगण्याचा विषय आहे. विद्यापीठात प्रबंध सादर करणार्या व्यक्तीचे वय आहे केवळ 74 वर्षे! त्यांचे नाव लक्ष्मण टोपले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले आणि 1978 नंतर संघाच्या विविध जबाबदार्या पार पाडलेले लक्ष्मण.
 
 
त्यांच्या स्मरणात आजही तळजाईचे रा. स्व. संघाचे शिबीर आहे. टोपलेवाडी विक्रमगडच्या पाड्यावर वसंतराव काणे यायचे. त्यावेळी त्यांचा मुक्काम लक्ष्मण यांच्याच घरी असायचा. वनवासी पाड्यावर मूलभूत सुविधांचीही वानवाच. पण, वसंतराव काणे म्हणा किंवा संघाचे अन्य मान्यवर पदाधिकारी स्वयंसवेक म्हणा, लक्ष्मण यांच्या घरी आनंदाने भेट देत, प्रसंगी मुक्कामही करत. या आपलेपणा, स्नेहामुळे लक्ष्मण रा. स्व. संघाशी जोडले गेले.
 
 
त्यावेळी ते शाळेत प्राचार्य होते. त्याचवेळी त्यांच्यावर तालुका कार्यवाहची जबाबदारीही आली. त्यांनी वसंतराव काणेकर, नाना जोशी, मधुसूदन बापट, प्र. अ. संत या सगळ्या स्वयंसेवकांना नि:स्वार्थीपणे समाजासाठी काम करताना पाहिले होते. या सगळ्यांच्या परिसस्पर्शाने लक्ष्मण घडत गेले. संघाचे स्वयंसेवक असलेलेलक्ष्मण समाजाच्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत गेले.
 
 
लक्ष्मण हे ‘लोकनायक जयप्रकाश नारायण अमृत महोत्सव समिती’चे अध्यक्ष होते. ग्रामपंचायत विक्रमगडचे माजी सदस्य, ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया, वाडा’चे माजी सदस्य, ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे माजी उपाध्यक्ष, ‘सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ, देवबांध केंद्रा’चे सदस्य, ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष अशा विविध संस्थांवर ते कार्यरत होते. मराठी भाषा घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लक्ष्मण यांचा फलज्योतिषशास्त्रामध्येही अभ्यास.
 
 
शिक्षक, पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत. त्यांचे ‘होय! आम्ही हिंदू आहोत’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘आरड गे कुहूबाय’, ‘जीवनं मधुरम्’, ‘वनयोगी बाळासाहेब देशपांडे : व्यक्ती व कार्य’, ‘कोकणा जनजातीच्या लोककथा’ ही पुस्तकसुद्धा वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. ते अनेक परिसंवादांमध्ये सहभागी झाले आहेत. दूरदर्शन तसेच आकाशवाणीमधील कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. असे विविध स्तरांवर कार्य करणारे आणि रूची असणारे लक्ष्मण टोपले यांचे जीवन पाहिले की वाटते, एक व्यक्ती इतक्या विविध पातळ्यांवर कसे काय कार्य करू शकते?
 
 
तसे पाहायला गेले, तर लक्ष्मण हे विक्रमगड तालुक्याच्या कोकणा समाजातील ढवळू आणि पार्वती टोपले यांचे सुपुत्र. दोघांना पाच अपत्ये. त्यापैकी एक लक्ष्मण. 1948 साली विक्रमगडच्या वनवासी पाड्यावर काय दृश्य असेल? ढवळू हे पाड्याचे अधिकारीच म्हणा. पाड्यात सगळेच त्यांचे ऐकत. पार्वती यांना तर सगळा पाडा ‘मोठी आय’ म्हणे. दोघेही समाजशील. लक्ष्मण पहिली ते तिसरी ज्या शाळेत जायचे, त्या शाळेत जाताना दोन ओढे पार करून जावे लागे. त्यानंतर ते जव्हारला निवासी शाळेत जाऊ लागले.
 
 
जव्हारहून विक्रमगडला ते पायी ये-जा करत. पुढे शिक्षणासाठी ते वाड्याला आले. याच दरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी आईने खूपच समजावले. “लेका, खूप शिकायचे. रडायचे नाही,” म्हणाली. पुढे लक्ष्मण पालघरला आले. शिक्षण पूर्ण केले. विक्रमगडला परतले आणि शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. या काळात संघाच्या स्वयंसेवकांशी त्यांचा संपर्क होताच. संघशिक्षा आणि स्वयंसेवकांचा सहवास यामुळे मनात इच्छा निर्माण झाली की, काहीतरी केले पाहिजे. त्यातूनच ते मग उल्हासनगरला बी.एड करण्यासाठी आले.
 
 
त्याकाळात प्र. अ. संत यांनी खूपच मदत केली. इथे कालिंदी जोशी यांच्या शाळेत ते रात्री राहायचे. राजाभाऊ सावरकर यांच्या घरी दोन वेळचे जेवण असे. सकाळी बी.एड् महाविद्यालयात जायचे. दुपारी अभ्यास करायचा आणि संध्याकाळी ठाण्यामध्ये एका शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून जायचे. हा काळ धकाधकीचा होता, पण सामाजिक समरसता शिकवणारा होता. ‘तू मैं एक रक्त’ची जाणीव करून देणारा होता.
 
 
असो. आपल्या पाड्यातही शाळा असावी, जीवनाबाबत जागृती असावी, असे लक्ष्मण यांना वाटू लागले. ते पुन्हा विक्रमगडला आले. आता ते मुख्याध्यापक झाले. या सगळ्या काळात ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून वनवासी पाड्यातील समाजबांधवांच्या हितासाठी त्यांनी अविरत कार्य सुरू ठेवले. लक्ष्मण टोपले म्हणतात, “ ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्य हे ईश्वरी कार्य आहे. त्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले. यापुढेही समाजाच्या हितासाठी जमेल, तसे काम करणार.” लक्ष्मण टोपले यांच्यासारखे कर्मवीर समाजाला नेहमीच दिशा देतात, हे नक्की!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.