ट्रम्प, ट्विट आणि ट्विटर...

    20-Nov-2022   
Total Views |
trump


सध्या ट्विटरवरून जेवढं वाक्युद्ध रंगलेलं पाहायला मिळतं तेवढं अन्य कुठेही नाही. भल्याभल्या मातब्बरांनाही ट्विटरने आपला तोरा दाखवला आहे. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी सोशल मीडिया साईट ट्विटरला विकत घेतल्यानंतर तर ट्विटर आणि वाद असे नवे समीकरणच बनले. विकत घेतल्यानंतर एलन यांनी एकामागून एक मोठे निर्णय घेतले. हजारो कर्मचार्‍यांना त्यांनी कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वीदेखील ट्विटरने अनेक मातब्बरांचे अकाऊंट ‘ब्लॉक’ केले होते. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प.


अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनात मोठ्या प्रमाणावर ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घातला होता. त्यानंतर मात्र, निवडणुकीत पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ‘कॅपिटल हिल’मध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर ट्विटरच्या जुन्या मालकांनी जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या दंगलीसंदर्भात नको असलेला मजकूर ‘शेअर’ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, आता ट्विटरचे मालक बदलल्यानंतर परिस्थिती बदलली आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा ‘रिस्टोअर’ करण्यात आले आहे. परंतु, ट्रम्प यांनी या सर्वेक्षणानंतरही ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हॅण्डल ‘रिस्टोअर’ व्हावे अशी काही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे एलन मस्क यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक सर्वेक्षणदेखील केले होते. त्यांनी ट्विटरवर लोकांना याबद्दल प्रश्न विचारत ‘पोल’ घेतला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट ‘रिस्टोअर’ करावे की नाही, असा प्रश्न ट्विटरवरील ‘पोल’द्वारे विचारण्यात आला होता. ज्याला कोट्यवधी लोकांनी प्रतिसाद दिला. या ‘पोल’मध्ये तब्बल 1 कोटी, 50 लाख, 85 हजार, 498 लोकांनी मतदान केले. या ‘पोल’मध्ये 51.8 टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते बहाल करावे, असे म्हटले आहे.

 विरोधात 48.2 लोकांनी मतदान केले. या ‘पोल’मध्ये बहुसंख्य लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटरवरील अकाऊंटवरील बंदी उठवावी, या बाजूने मतदान केल्यामुळे एलन मस्क यांनी रविवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे मस्क यांनी ट्विट करून म्हटले आहे. मस्क यांच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा ‘रिस्टोअर’ करण्यात आले.

ट्विटरवर परतल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इथे परतण्यात मला रस नाही. माझ्या ‘ट्रम्प मीडिया अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी ग्रुप’ (ढचढॠ) स्टार्टअपने विकसित केलेले ‘ट्रूथ सोशल’ अ‍ॅपवर मी असेन. यात ट्विटरपेक्षा चांगले ‘युजर्स’ माझ्याशी जोडले गेले आहे. ते खूप चांगले काम करत आहे.22 महिन्यांनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर पुनरागमन केल्यानंतर त्यांच्या ‘फॉलोवर्स’मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ज्यावेळी त्यांचे ट्विटर अकाऊंट ‘रिस्टोअर’ करण्यात आले तेव्हा त्यांचे 2.3 लाख ‘फॉलोवर्स’ होते. मात्र, काही मिनिटांतच त्यांच्या ’फॉलोवर्स’ची संख्या आता दहा लाखांच्याही पुढे जाऊन पोहोचली आहे. दि. 8 जानेवारी, 2021 रोजी त्यांनी शेवटचे ट्विट केले होते.
 
केवळ ट्विटरच नाही, तर अनेक सोशल साईट्सवरून त्यांना ‘बॅन’ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ‘ट्रूथ सोशल’ नावाने स्वतःचे सोशल मीडिया अ‍ॅप लॉन्च केले होते. दरम्यान, ज्यावेळी ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट ‘ब्लॉक’ करण्यात आले, त्यावेळी विजया गाड्डे या पॉलिसी हेड म्हणून काम पाहत होत्या. ट्विटरला विकत घेतल्यानंतर मस्क यांनी गाड्डे यांना घरचा रस्ता दाखवला. सध्या कमी शब्दांत आपले म्हणणे मांडण्यासाठी ट्विटर हे प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु, विशिष्ट विचारधारेच्या लोकांना ‘टार्गेट’ करण्याचा धडाका ट्विटरने लावला होता. कंगना राणावतलाही त्याचा फटका बसला. भारतातील ‘कू’ अ‍ॅपदेखील ट्विटरला पर्याय म्हणूनच आणले गेले. परंतु, आता मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असल्याचेच यावरून दिसून येत आहे. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.