कालचक्राचा प्रवास (लेखांक-3)

    17-Nov-2022   
Total Views |
chakra

भारताचे वय दहा हजार वर्षे आहे. माझे व्यक्तिगत वय एक दिवस ते 100 वर्षे असे असू शकते, पण राष्ट्रीय वय दहा हजार वर्षांचे आहे. हे जाणणे म्हणजे ‘स्व’ची ओळख होय. या दहा हजार वर्षांच्या असलेल्या माझी सांस्कृतिक ओळख आहे, तत्त्वज्ञानात्मक ओळख आहे, वैज्ञानिक ओळख आहे, राज्यशास्त्रीय ओळख आहे आणि ती फार श्रेष्ठ आहे.


मागच्या पिढीने आपल्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा केला आहे. हे कर्ज सावकारी कर्ज नाही किंवा बँक अथवा एखाद्या आर्थिक संस्थेचे कर्ज नाही. अशी आर्थिक कर्जे व्याजासहित फेडावी लागतात. आपल्या देशातील काही बदमाश वित्तीय संस्थांची कोट्यवधी रुपयांची कर्जे घेतात, ती फेडणे अशक्य झाली की, विदेशात पळून जातात. आपल्याला असे कुठे पळून जायचे नाही.

हे भांडवली कर्ज आहे आणि ते फार वेगळ्या प्रकारचे कर्ज आहे. त्याच्या व्याजाची आणि मुद्दलाची परतफेड करायची नाही. या कर्जामध्ये आपल्या भांडवलाची भर घालून आपल्या पूर्वजांनी म्हणजे लोकमान्य टिळक, पं. नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू, डॉ. हेडगेवार, श्रीगुरूजी यांच्यापासून ते लालकृष्ण अडवाणींपर्यंत ज्या थोर पुरुषांनी आपल्या माथ्यावर कर्ज ठेवले आहे, त्या कर्जाच्या भांडवलात त्यांच्यापेक्षाही अधिक भर आपल्याला घालावी लागेल आणि हे कर्जाचे भांडवल आपल्या मागून येणार्‍या पिढीला द्यावे लागेल. राष्ट्रीय वारशाच्या कर्जाची फेड अशा प्रकारे करावी लागते. नुसतीच मुद्दल खात बसलो, तर दिवाळखोरी येते आणि मुद्दलात भर घातली की, समृद्धी प्राप्त होते. असे पुरुषार्थाचे काम आपल्याला करावे लागेल.

आपला देश जवळजवळ एक हजार वर्षे पारतंत्र्यात होता. व्हॉट्सअ‍ॅपवर खूप ’व्हायरल’ झालेला एक किस्सा मी वाचला. वाचकांपैकी अनेकजणांनी तो वाचला असेल. त्या किश्श्यात जपानी माणूस भारतीयांना फार जवळ करीत नाही. याचे कारण काय, हे सांगितलेले आहे. जपानी माणूस विचारतो की, आक्रमक बाबर किती सैन्य घेऊन आला? किती हजार मुघल होते? तुमची संख्या किती होती? नंतरच्या बाबराच्या वंशजांच्या सैन्यात तुमचेच लोक कसे सामील झाले? जालियनवाला बागेत गोळ्या झाडणारे सैनिक हिंदूच होते. आदेश देणारा एकच ब्रिटिश होता, त्याचे नाव डायर. सैनिकांनी आदेश देणार्‍या डायरला गोळ्या का नाही घातल्या? आपल्याच बांधवांवर गोळ्या का घातल्या? जपानी माणसाचे प्रश्न फार झोंबणारे आहेत. अस्वस्थ करून झोप उडविणारे आहेत. आम्ही आमच्या पापांमुळे गुलाम झालो. आता आम्हाला दृढनिश्चय करावा लागेल की, हे पाप आमची पिढी करणार नाही आणि पाप न करण्याचा वारसा आम्ही येणार्‍या पिढीला देऊन जाऊ.

यासाठी ‘सेक्युलॅरिझम’चे पाप आपल्याला धुवून काढावे लागेल. जातीजातींमध्ये भांडणे लावणारे राजनेते, मग ते सार्वजनिकरित्या कितीही मोठे का असेना, त्यांना झुरळ आणि पालीसारखे दूर केले पाहिजे. असे राजकारण हे आपल्या राष्ट्र शरीराला झालेला कर्करोग आहे, असे समजले पाहिजे. जो कुणी हिंदू धर्मातील वेगवेगळ्या पंथांत भांडण लावण्याचे काम करील, त्यांना बाबराचा वंशज समजला पाहिजे. जो कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करील, त्याला अफजलखानाचा चेला समजले पाहिजे. आपण प्रथम भारतीय आहोत, दुसर्‍यांदा भारतीय आहोत, तिसर्‍यांदाही भारतीय आहोत आणि मरेपर्यंत आपल्याला भारतीयच राहायचे आहे


आपली जात आपल्या घरापुरती असावी. आपला उपासना धर्म आपले कुटुंब आणि प्रार्थनास्थळ एवढ्यापुरता मर्यादित असावा. त्यावरून भांडण करू नये, वादविवाद करू नये. ही भांडणे आपल्याला दुर्बळ करतात. भांडणे लावणार्‍या राजनेत्यांना धनवान करतात आणि समाजातील दुर्बळ घटकांना असुरक्षित आणि लाचार करतात. हे आपण समजून घ्यायला पाहिजे.कुणाचे, कसलेही उपदेश, भाषणे, वक्तव्ये, डोके गहाण ठेवून ऐकू नयेत. देवाने प्रत्येकाला मेंदू दिला आहे, या मेंदूत विचारशक्ती असते. प्रत्येकामध्येे अंगभूत योग्य काय, अयोग्य काय हे जाणून घेण्याची क्षमता असते. अग्नी दाहक असतो, तसेच बर्फ थंड असतो, हे जसे सहजपणे समजते. तसेच सर्वांच्या हिताचे काय आहे आणि अहित करणारे काय आहे, हेदेखील प्रत्येकाला समजते. या समजशक्तीचा ज्याचा त्याने विकास करून घ्यायचा असतो.

या संदर्भात भगवान गौतम बुद्धांचा उपदेश प्रमाण मानला पाहिजे. भगवंत सांगून गेले की, मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, ग्रंथ सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, परंपरा अशी आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, मोठी माणसे सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, असा-असा कुलाचार आहे म्हणून त्याचे आंधळेपणाने अनुसरण करू नका, जे अनुभवाला येईल किंवा ज्याची अनुभूती घेता येईल, त्यावरच विश्वास ठेवा. ‘अत्तो दीपो भव’ हा भगवंतांचा आदेश आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे भारतमातेचे महान सुपुत्र होऊन गेले. आपण सर्व त्यांचे वंंशज आहोत. त्यांनी जे सांगितले ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.



chakra 1


आपण सध्या स्वजागृतीच्या कालखंडातून जात आहोत. ‘स्व’ ची ओळखसुद्धा आपली आपल्यालाच करून घ्यावी लागते. मी कुणाचा तरी पुत्र असतो, माझ्या निवासस्थानाचा एक पत्ता असतो, माझा पोटापाण्याचा काही व्यवसाय असतो, ही झाली आपली व्यक्तिगत ओळख. त्याचवेळी मी समाजाचा एक घटक असतो. समाज म्हणूनदेखील माझी एक ओळख असते. मी देशाच्या कोणत्यातरी राज्यात असतो, त्या राज्याचा घटक म्हणून माझी ओळख असते. ते राज्य भारताचा एक भाग असतं, म्हणून भारतवासी ही माझी पुढची ओळख असते. या भारताचे वय दहा हजार वर्षे आहे.


माझे व्यक्तिगत वय एक दिवस ते 100 वर्षे असे असू शकते, पण राष्ट्रीय वय दहा हजार वर्षांचे आहे. हे जाणणे म्हणजे ‘स्व’ची ओळख होय. या दहा हजार वर्षांच्या असलेल्या माझी सांस्कृतिक ओळख आहे, तत्त्वज्ञानात्मक ओळख आहे, वैज्ञानिक ओळख आहे, राज्यशास्त्रीय ओळख आहे आणि ती फार श्रेष्ठ आहे. अशी ओळख असणारा जगात माझ्यासारखा कुणी नाही. माझी बरोबरी करील, असा कुणी नाही. या ओळखीने मी अमृतमय आहे, अमर आहे, शाश्वत आहे आणि सनातन आहे. या ओळखीच्या जागरणाचे कार्य दीर्घकाळापासून आपल्या देशात चालू आहे. हे कार्य महान स्त्री-पुरूषांनी केलेले आहे. यामध्ये आपल्या मातृशक्तीचा सहभाग फार मोठा आहे. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी रूप बनून त्यांनी केलेले काम थक्क करणारे आहे. या सर्वांचे नामस्मरण करणे अशक्य आहे. तो वारसा आणि त्यांचे कर्ज घेऊन आपण जगत आहोत.

आता हे कर्ज आपल्याला फेडायचे आहे, म्हणजे मुद्दलात भर घालायची आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उपनिषदांची उंची गाठेल, असा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही. आपल्याला तिथेच थांबून नाही चालणार त्यात भर घालावी लागेल. विज्ञानाच्या क्षेत्रात प्राचीन काळी आपण खूप पुढे होतो. तो वैज्ञानिक वारसा स्वकर्तृत्वाने पुढे न्यावा लागेल. प्रत्येक जड पदार्थ ऊर्जेचे रूप असतो, असा आईनस्टाईनचा सिद्धांत आहे. लाकडात ऊर्जा असते. ती पेटवून बाहेर काढाता येते, हे आपण जाणतो. म्हणजे दगडदेखील ऊर्जेचे रूप असेल, तर त्यातील ऊर्जा कशी काढायची, याचे तंत्रज्ञान शोधावे लागेल.


आपली बुद्धी त्यासाठी वापरली पाहिजे. पगडी-पागोट्याच्या राजकारणासाठी नाही किंवा याने माझे मुख्यमंत्रिपद पळविले, त्याने गद्दारी केली, असली रडगाणी गाण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. वाल्मिकी, कालिदास, हे काळावर मात करणारे कवी झाले. आपल्या समोर असे ध्येय का असू नये, कविता किंवा अन्य साहित्यात मीदेखील येणार्‍या हजारो पिढ्यांना पुरून उरेल, असे धन ठेवून जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ही तर अगदी अलीकडच्या काळातील हिमालयाची शिखरे आहेत. आपल्यात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे की, आपल्यालाही त्यांच्यासारखे बनता आले पाहिजे. मी सत्तेचा गैरवापर करून तुरूंगाची वारी करणार नाही, असा संकल्प असला पाहिजे.

समर्थ रामदास स्वामी सांगून गेले, ‘सांगे वडिलांची कीर्ति। तो एक मूर्ख॥’ पूर्वजांचा अभिमान असावा, त्यांचे गोडवे गाण्यात बुद्धी घालवू नये. जग आज एका विलक्षण वळणावर आहे. कम्युनिझमचा अंत झाला आहे, पण साम्राज्यवादाचा अंत झाला नाही. लोकशाही राजवटीतचा विकास झालेला आहे. परंतु, जागतिक स्तरावर ‘मी म्हणतो तेच खरे’ ही प्रवृत्ती संपली नाही. व्यक्ती हे एक मूल्य आहे. व्यक्ती मुक्त असली पाहिजे, हा विचार जगभर चालतो. परंतु, व्यक्तीला बंधनात कसं बांधून ठेवता येईल, याचे नवनवीन प्रयोग सुरू झालेले असतात.


माहिती-तंत्रज्ञान आणि त्यातील उपकरणे माझ्या उपयोगासाठी आहेत की, मी त्यांचा गुलाम झालो आहे, म्हणजे बंधनात अडकलो आहे, याचा विचार प्रत्येकाने स्वतंत्रपणे करायला पाहिजे. नको असलेल्या जाहिराती, आवश्यक नसलेल्या वस्तू, त्यांचा जाहिरातीद्वारे होणारा मारा, आपल्याला मुक्त करतात की गुलाम करतात, हे ‘आपलाचि वाद, आपणासि’ करून प्रत्येकाने जाणून घ्यायला पाहिजे. शेवटी ‘स्व’ विकास तर आपल्याला करून घ्यायचाच आहे, ‘स्व’बरोबर समाज, स्वदेश, स्वधर्म यांनादेखील इतके उन्नत करायचे आहे की, स्वर्गस्थ आपल्या पितरांना अभिमानाने म्हणावेसे वाटेल,‘ही खरी कर्जाची फेड झाली आहे.’



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.