हिंदूविरोधाची नवी प्रयोगशाळा?

    08-Oct-2022   
Total Views |

अरविंद केजरीवाल 
 
 
 
 
 केजरीवाल यांच्या राजकारणाची विशिष्ट अशी शैली आहे. ते प्रामुख्याने हिंदू समाजाला कमकुवत करणार्‍या तत्त्वांना जाणीवपूर्वक जवळ करतात, त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तुष्टीकरण करून त्यांच्याद्वारे मिळणार्‍या मतांची बेगमी करतात; (त्याचवेळी संबंधित संघटनादेखील राजाश्रय मिळाल्याने त्याचा मोबदला ‘अनेक’ मार्गांनी करतात ) आणि हे लांगूलचालन दिसून येऊ नये, म्हणून केजरीवाल एकतर प्रचंड विकास केल्याचा दावा करतात, अथवा केंद्र सरकार मला काम करू देत नसल्याची बोंब ठोकतात.
 
 
 
भारतामध्ये हिंदूविरोधाच्या विविध प्रयोगशाळा चालविण्याचे प्रकार सुरू असतात. त्यामध्ये मुस्लीम कट्टरतावादी आणि सामाजिक कार्यांचा आव आणून धर्मांतरे घडविणारे ख्रिश्चनधर्मीय तर अगदी आघाडीवर असतात. भारतामध्ये बहुसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला कमकुवत केल्यास देश आपोआपच कमकुवत होतो, या गृहितकावर मुघल आक्रमक आणि ख्रिश्चन आक्रमकांपासून दीर्घकाळ असे प्रयत्न चालविले जात आहेत. यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचेही वेळोवेळी उघडकीस आले आहे. मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या ‘लव्ह जिहाद’ला आखाती देशांकडून होणाराअर्थपुरवठा असो किंवा परदेशातूनभारतात येऊन रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारी कथित ‘मदर’ असो; या उदाहरणांवरून हिंदूविरोधाचे षड्यंत्र अतिशय नियोजनबद्धपणे चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट होते. या हिंदूविरोधी कारवायांचा जोर ईशान्य भारतात अथवा सीमावर्ती भागात जास्त असल्याचे मानले जाते. मात्र, बारकाईने विचार केल्यास देशातील प्रत्येक शहरात आणि गावातधर्मांतरे घडविणारी, तसा प्रयत्न करणारी, हिंदूविरोध पसरविणारी एक ‘इकोसिस्टीम’ कार्यरत असते.
 
 
त्यामुळे धर्मांतर हेच राष्ट्रांतर, या हेतूने काम करणार्‍या संघटनांना मिळणाराराजकीय पाठिंबा हा एक चिंतेचा विषय आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या समाजात दुही माजविणार्‍या संघटनांना आणि त्या संघटना राजकीय पक्षांना परस्परांना आपल्या स्वार्थासाठी वापरून घेत असतात. यामध्ये राजकीय पक्षांना होणारा लाभ हा तात्कालिक असतो, म्हणजे निवडणुकीमध्ये विशिष्ट गटाची मते मिळण्यापुरताच असतो. मात्र, संबंधित संघटनांना मात्र त्यानिमित्ताने राजाश्रय मिळतो. त्यातच अशा संघटनांकडून धर्मांतर घडविले जात असल्यास आणि ते स्वेच्छेने असले तरीदेखील राजकीय पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्यक्तीने तेथे उपस्थित राहणे, हा गंभीर प्रकार आहे. अशीच एक घटना दिल्लीत विजयादशमीदिनी घडली.
 
 
‘बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे दिल्लीतील करोल बाग परिसरामध्ये धर्मांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे दहा हजार हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात, कोणी स्वेच्छेने आपल्या पसंतीचा धर्म स्वीकारत असल्यास त्यास विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. कारण, भारतीय राज्यघटनेने प्रत्येकत नागरिकास तसे स्वातंत्र्य दिले आहे. यावेळी उपस्थितांना एक शपथ देण्यात आली. त्यामध्ये हिंदू देव-देवतांची पूजा करणार नाही, ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना देव मानणार नाही, अशा प्रकारची शपथही देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम हेदेखील सहभागी झाले होते. केजरीवाल सरकारमधील प्रमुख मंत्री असलेल्या राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे सामाजिक न्याय, अनुसूचित जाती - जमाती, महिला व बालविकास, जल, पर्यटन, संस्कृती, कला आणि भाषा या विषयांचा पदभार आहे.
 
 
 

अरविंद केजरीवाल 
 
 
विजयादशमीदिनी: ‘बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे दिल्लीतील करोल बाग परिसरामध्ये धर्मांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुमारे दहा हजार हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांना एक शपथ देण्यात आली. त्यामध्ये हिंदू देव-देवतांची पूजा करणार नाही, ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना देव मानणार नाही, अशा प्रकारची शपथही देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्रपाल गौतम हेदेखील सहभागी झाले होते. 
 
 
केजरीवाल सरकारमधील प्रमुख मंत्री असलेल्या, सामाजिक न्याय खात्याचा पदभार असलेल्या राजेंद्र पाल गौतम यांनी अशाप्रकारे धर्मांतरणाच्या कार्यक्रमास सहभागी होणे योग्य की अयोग्य; असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या तेथील उपस्थिती आक्षेप घेतला आहे. मात्र, भाजपच्या आक्षेपास राजेंद्र पाल गौतम यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात की, “माझा बौद्ध धर्मावर विश्वास असून त्याविषयी कोणत्याही व्यक्तीस आक्षेप असण्याचे कारण नाही. घटनेने प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या पसंतीचा धर्म पाळण्याची मुभा दिली आहे. भाजप हा राष्ट्रविरोधी पक्ष असून आपची भिती वाटत असल्यानेच त्यांनी तक्रारी दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.”
 
 
भाजपच्या आरोपास प्रत्युत्तर देण्याचा आम आदमी पक्षास पूर्ण अधिकार आहे. मात्र, ज्या घटनेवरून वादंगास प्रारंभ झाला आहे, ती घटना अतिशय संवेदनशील आहे. कारण, अशाच धर्मांतरणाच्या कार्यक्रमामध्ये भाजप सरकारमधील मंत्री सहभागी झाले असते आणि त्यांनी उपस्थितांना हिंदू धर्मामध्ये सामील करून घेतले असे, तर देशात कशाप्रकारची तीव्र प्रतिक्रिया उमटली असती, त्याची कल्पना करता येईल. तसे झाले असते तर ‘देशात फॅसिस्टशाही आली’, ‘भाजप भारताचेहिंदूकरण करत आहे’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला अजेंडा पुढे नेत आहे’ हे आणि अशा प्रकारचे अनेक आरोप झाले असते. कारण, सरकारचा भाग असलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे धर्मांतरणाच्या कार्यक्रमांमध्ये सामील होणे, हे एकप्रकारे त्या कार्यक्रमास सरकारचा पाठिंबा असल्याचेच दाखविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आक्षेप हा धर्मांतरणास नसून तेथे केजरीवाल सरकारच्या मंत्र्यांच्या असलेल्या उपस्थितीस आहे.
 
 
त्यांच्या उपस्थितीमुळे केजरीवाल सरकारच्या धोरणाविषयी शंका निर्माण होण्यास वाव आहे. कारण, सरकारला राज्यकारभार करताना प्रत्येक धर्मास आणि प्रत्येक धर्माच्या अनुयायांना समान वागणूक देणे हेच भारतीय राज्यघटनेने तत्त्व आहे. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ नये, यासाठी देशातील प्रत्येक सरकारने काम करणे अपेक्षित असते. मात्र, सरकारमधील प्रमुख मंत्रीच धर्मांतरण कार्यक्रमास उपस्थिती लावत असतील, तर त्यामुळे अन्य धर्मीयांच्या मनात किंतु निर्माण होणार नाही, याची खात्री कोण देणार?
 
 
 
 

अरविंद केजरीवाल
 
 
 
केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांच्या कृतीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, खा. मनोज तिवारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत ‘आप’ सरकारवर टिकेची झोड उठविली. भाटिया यांनी ‘आप’चे मंत्री आणि त्यांचे वरिष्ठ नेते सातत्याने हिंदूंच्या भावना दुखावणारीवक्तव्ये करत असल्याचा आरोप केला आहे. हे कृत्य अरविंद केजरीवाल यांच्या इशार्‍यावर घडत असते. केजरीवाल सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी हिंदूंच्या भावना दुखावण्यासोबतच राष्ट्राच्या अखंडतेस आव्हान दिले आहे. हिंदू देव-देवतांचा अवमान करून हिंदूद्वेष हेच आपचे धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदू देव-देवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका करून ‘आप’ आणि त्यांच्या नेत्यांच्या मनात हिंदूविरोध ठासून भरलेला असल्याचे सिद्ध केल्याचेही भाटिया यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे आदेश गुप्ता यांनी संसद मार्ग पोलीस स्थानकामध्ये सदर प्रकाराविरोधात तक्रारही दाखल केली आहे.
 
 
आम आदमी पक्षाचे संशयास्पद धोरण
 
 
आम आदमी पक्ष आणि पक्षाचे सर्वेसर्वाअरविंद केजरीवाल यांच्यावर हिंदूविरोधाचा होणारा आरोप हा केवळ राजकीय नाही. त्यांची विविध वक्तव्ये आणि धोरणे पाहिल्यास ते जाणीवपूर्वक हिंदू समाजाला लक्ष्य करत आहेत, का असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे भाजप अथवा विश्व हिंदू परिषदेच्या आरोपांना निव्वळ राजकीय आरोप म्हणता येणार नाही. कारण, केजरीवाल हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू समाजाला आक्रमक ठरविण्याचा प्रयत्न अनेकदा करत असतात, असा आरोप भाजपसह हिंदुत्ववादी संघटना वारंवार करत असतात.
 
 
आम आदमी पक्षाने काही वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये चर्चवर हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ले केल्याची आवई उठविली होती. त्यानंतर देशभरातील हिंदू समाजाला ख्रिश्चनविरोधी ठरविण्याचा प्रकार घडला होता. मात्र, या प्रकाराची चौकशी झाल्यानंतर या प्रकारात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, यातून ‘आप’ आणि ख्रिश्चन संघटना यांच्यामधील संबंध अतिशय मधूर असल्याचे दिसून आले येते.
 
 
सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत. गुजरातमध्ये ‘आप’च्याप्रचाराविषयी ख्रिश्चन संघटना मोठ्या प्रमाणावर रस घेत आहेत. ‘युनियन ऑफ कॅथलिक एशियन न्यूज’ (युसीए न्यूज) या ख्रिश्चन संघटनांच्या संकेतस्थळार ‘फ्लेजलिंग पार्टी टू टेक ऑन प्रो-हिंदू बीजेपी ऑन होम टर्फ’ असा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखामध्ये गुजरातला ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असे संबोधून तेथे भाजपचा पराभव केवळ आम आदमी पक्षच करू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चनांकडून होणारी बेकायदेशीर धर्मांतरे, ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेचा गैरप्रकार याविरोधी भाजप सरकारने केलेल्या कारवाईवरूनही या लेखामध्ये भाजपला ख्रिश्चनविरोधी ठरविण्यात आले आहे. त्याउलट, अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष हा ख्रिश्चनांची तेथे काळजी घेईल, असेही सांगण्यात आले आहे.
 
 
पंजाबमध्येही ‘आप’ने अशाच प्रकारची रणनीती वापरली होती. पंजाबमध्ये ख्रिश्चन धर्मांतरण ही आता गंभीर समस्या झाली आहे. आतापर्यंत त्याविषयी चकार शब्दही न बोलणार्‍या ‘अकाल तख्ता’नेही त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे शिखांचे धर्मांतरण रोखण्यासाठी धार्मिक जागृती करणारे पथके तयार करण्याचा निर्णय ‘अकाल तख्ता’ने घेतला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ‘आप’ उमेदवारांच्या मंचांवर वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरू दिसून आले होते. सत्तेत आल्यानंतरही भगवंत मान सरकारने धर्मांतरणाविरोधात ठोस निर्णय घेतलेला नाही.
 
 
दिल्लीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या आंदोलनांमध्येही आम आदमी पक्षाचे नेते सहभागी होते. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरातील मुस्लिमांना भडकविण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील शाहीनबाग परिसरात मुस्लिमांना आंदोलनास बसविण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये दंगलही घडविण्यात आली होती. त्यामध्ये आप आमदार अमानतुल्लाह खानसह अन्य नेत्यांचा समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे.
 
 
पक्षाच्या धोरणांसह खुद्द अरविंद केजरीवाल यांनीदेखील अनेकदा हिंदूविरोधी वक्तव्ये, ट्विट्स केले आहेत.काश्मिरी पंडितांचा नरसंहार दाखविणार्‍या ‘द काश्मीर फाईल्स’या चित्रपटाची खिल्ली उडविणे, चित्रपटातील घटनांना खोटे ठरविणे, हातात झाडू (‘आप’चे चिन्ह) घेतलेलाव्यक्ती स्वस्तिक चिन्हास मारत असल्याचे चित्र ट्विट करणे, हनुमानास दंगेखोर म्हणून दाखविणे, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीस विरोध करणे, दिल्लीमध्ये हिंदूंना छटपूजा करण्यास प्रतिबंध करणे हे आणि असे असंख्य प्रकार केजरीवाल यांनी केले आहेत.
 
 
 
अरविंद केजरीवाल
 
 
 
 
केजरीवाल यांच्या राजकारणाची विशिष्ट अशी शैली आहे. ते प्रामुख्याने हिंदू समाजाला कमकुवत करणार्‍या तत्त्वांना जाणीवपूर्वक जवळ करतात, त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तुष्टीकरण करून त्यांच्याद्वारे मिळणार्‍या मतांची बेगमी करतात; (त्याचवेळी संबंधित संघटनादेखील राजाश्रय मिळाल्याने त्याचा मोबदला ‘अनेक’ मार्गांनी करतात) आणि हे लांगूलचालन दिसून येऊ नये म्हणून केजरीवाल एकतर प्रचंड विकास केल्याचा दावा करतात, अथवा केंद्र सरकार मला काम करू देत नसल्याची बोंब ठोकतात. केजरीवाल यांचे हे धोरण ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ला बळ देणारी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या राजकारणाची ही शैली देशाची राष्ट्रीय एकता, अखंडचा आणि समाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय धोकादायक ठरत आहे, यात कोणतीही शंका नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.