नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी कॅनडात कनानास्किस येथे होणाऱ्या ‘जी - ७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कॅनडात दाखल झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या अधिकृत निमंत्रणानंतर २०१५ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे.
पहलगाम दहशतवादील आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटणार आहेत. आपल्या २३ तासांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील आणि ‘जी - ७’ शिखर परिषदेत आउटरीच सत्रांना उपस्थित राहतील. शिखर परिषदेत विविध नेत्यांना भेटणे, महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर भारताचे विचार मांडणे आणि ग्लोबल साउथच्या प्राधान्यांवर भर देणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे.
२०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच कॅनडा दौरा आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्य़ा या दौऱ्याकडे जगाचे लक्ष असेल. कॅनडाचे पंतप्रधा कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘जी - ७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर कॅनडातील खलिस्तानी नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजीदेखील व्यक्त केली आहे. मात्र, पंतप्रधान कार्नी यांनी नाराजीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले निमंत्रण अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.