नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी इस्रायलला स्वसंरक्षणाचा हक्क असून पश्चिम आशियातील अस्थिरता आणि दहशतीचे मूळ इराणमध्येच आहे, असे सांगून ‘जी – ७’ राष्ट्रांनी इस्रायलला आपला पाठिंबा जाहिर केला आहे.
कॅनडामध्ये ‘जी – ७’ शिखर परिषदेस मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. शिखर परिषदेच्या बैठकीपूर्वी ‘जी – ७’ नेत्यांनी पश्चिम आशियातील चालू संघर्षावर एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये शांततेसाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे आणि इस्रायलच्या स्वतःच्या बचावाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. त्यात म्हटले आहे की, मध्य पूर्वेतील शांतता आणि स्थैर्यासाठी ‘जी – ७’ वचनबद्ध आहे. इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. इस्रायलच्या सुरक्षेसाठी ‘जी – ७’ आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार करत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
‘जी – ७’ राष्ट्रांनी इराणला लक्ष्य केले असून अस्थैर्यासाठी जबाबदार धरले आहे. निवेदनात म्हटले की, इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचा प्रमुख स्रोत आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, असे ‘जी – ७’चे मत आहे. या संकटाच्या निराकरणानंतर मध्य पूर्वेतील दहशत आणि अस्थिरता कमी होईल. त्याचप्रमाणे गाझामधील युद्धबंदीदेखील याद्वारे शक्य आहे. ‘जी – ७’ आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेवरील परिणामांबद्दल जागरूक असून आणि बाजारपेठेतील स्थिरता राखण्यासाठी समान विचारसरणीच्या भागीदारांसह समन्वय साधण्यास तयार आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.