नवी दिल्ली : (Radhika Yadav Case) हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची गुरुग्राम येथील राहत्या घरी वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी वडील दीपक यादव यांनी हत्येबद्दल पश्चातापही व्यक्त केला आहे. दीपक यादव यांचे भाऊ विजय यादव यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. "आरोपी दीपक यादव यांना पश्चाताप होत असून त्यांनी फाशी मिळावी, असा एफआयआर लिहिण्याची पोलिसांना विनंती केली आहे", ते म्हणाले.
दीपक यादव यांची एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. "जे काही घडले ते अतिशय चुकीचे होते. मी जेव्हा माझ्या भावाला पोलीस ठाण्यात भेटलो तेव्हा त्याने पोलिसांना फाशी व्हावी, असा एफआयआर बनवा, अशी विनंती केली. माझ्या भावाने कन्या वध केला", अशी प्रतिक्रिया विजय यादव यांनी दिली. दीपक यादव यांचे दुसरे भाऊ राजेश यादव यांनी म्हटले आहे की, "राधिकाच्या करिअरसाठी त्याने सर्वकाही केले, तरीही अचानक त्याने इतके कठोर पाऊल कसे उचलले, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या दुर्दैवी घटनेला क्षणिक राग कारणीभूत असण्याची शक्यता आहे."
शनिवारी गुरुग्राम पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, माजी राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची स्वतःची अकादमी नव्हती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून खेळाडूंना प्रशिक्षण देत असे. ज्यावर तिच्या वडिलांनी आक्षेप घेतला. "राधिकाची स्वतःची अकॅडमी नव्हती. ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देत असे. दीपक यांनी तिला अनेक वेळा प्रशिक्षण सत्रे थांबवण्यास सांगितले होते, परंतु तिने नकार दिला. हे वडील आणि मुलीमधील भांडणाचे मूळ कारण होते", असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\