गांधीनगर : (Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 या विमानाचा १२ जूनला भीषण अपघात झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान केवळ ३२ सेकंदांतच एका निवासी भागातील इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत विमानातील २६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. एएआयबीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात एअर इंडियाच्या विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर काही सेकंदांतच कोणत्या गोष्टी घडल्या, हे सांगितले आहे.
१२ जूनचा घटनाक्रम :
सकाळी ११ वाजून ३७ मिनिटे : एअर इंडियाचे ड्रीमलायनर VT-ANB हे नवी दिल्लीहून अहमदाबादला उतरले.
दुपारी १ वाजून १८ मिनिटे आणि ३८ सेकंद : विमानतळावरील बे ३४ वरून विमान निघताना दिसून येते.
दुपारी १ वाजून २५ मिनिटे आणि १५ सेकंद : विमानाच्या क्रू मेंबर्संनी टॅक्सी क्लिअरन्सची परवानगी मागितल्यानंतर एअर कंट्रोल कडून परवानगी देण्याच येते. विमान रनवे २३ च्या दिशेने जाते.
दुपारी १ वाजून ३२ मिनिटे आणि ३ सेकंद : विमान ग्राउंड कंट्रोलवरून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित केले जाते.
दुपारी १ वाजून ३७ मिनिटे आणि ३३ सेकंद : टेकऑफ क्लिअरन्स जारी केला जातो, ज्यामुळे उड्डाणाकरिता परवानगी मिळते
दुपारी १ वाजून ३७ मिनिटे आणि ३७ सेकंद : विमान उड्डाणासाठी तयार होते.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटे आणि ३९ सेकंद : विमान उड्डाण घेते. तपासकर्त्यांनी नोंदवले आहे की, एअर/ग्राउंड सेन्सर्स लिफ्टऑफच्या अनुषंगाने एअर मोडमध्ये बदलतात.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटे आणि ४२ सेकंद : विमानाने कमाल १८० नॉट्सचा वेग गाठला. त्याच वेळेस लगेचच, इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन पुरवठा करणारे फ्युअल स्विचेस अगदी एक सेकंदाच्या अंतराने एकामागून एक रन मोडवरून कटऑफ मोडवर गेले. त्यामुळे या दोन्ही इंजिन्समधील इंधन पुरवठा हवेतच बंद झाला. त्यामुळे इंजिन्सपर्यंत इंधन पोहोचणं थांबलं आणि इंधन पुरवठा कमी पडू लागल्यामुळे इंजिन्स हळूहळू बंद होऊ लागले.
कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगनुसार, अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये एक पायलटने दुसऱ्या पायलटला विचारले की, "तू फ्यूएल स्विच बंद का केलं?" तर त्यावर दुसऱ्या पायलटने "मी बंद केलेलं नाही." असे उत्तर दिले.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटे आणि ४७ सेकंद : दोन्ही इंजिनचे काम हळूहळू निष्क्रिय होत जाते. रॅम एअर टर्बाइन अर्थात रॅटच्या पंपमधून हायड्रॉलिक पॉवर पुरवण्यास सुरुवात होते.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटे आणि ५२ सेकंद : इंजिन १ चा इंधन कटऑफ स्विच 'कटऑफ'वरून 'रन'वर परत हलवला जातो.
दुपारी १ वाजून ३८ मिनिटे आणि ५६ सेकंद : इंजिन २ चा इंधन कटऑफ स्विच त्याचप्रमाणे रन'वर पूर्ववत केला जातो.
दुपारी १ वाजून ३९ मिनिटे आणि ५ सेकंद : पायलटपैकी एकाकडून जमिनीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला 'मेडे मेडे' म्हणजे आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला जातो.
दुपारी १ वाजून ३९ मिनिटे आणि ११ सेकंद : विमानातील डेटा रेकॉर्डिंग थांबते
दुपारी १ वाजून ४४ मिनिटे आणि ४४ सेकंद : विमान कोसळल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विमानतळ परिसरातून अग्निशमन दलाचे जवान रवाना होतात.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\