नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील खरेदी पूर्णपणे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा आणि धोरणात्मक मूल्यांकनाच्या आधारे ठरते. त्याचप्रमाणे, भारताची ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही जागतिक परिस्थिती आणि बाजारात उपलब्धतेनुसार निर्णय घेतो, अशा शब्दात भारताने अमेरिकेस ठणकावले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील नवीन टॅरिफ लावण्याचे कारण देताना उच्च व्यापार अडथळे, तसेच रशियन तेल आणि संरक्षणसामग्रीवर भारताच्या अवलंबतेचा उल्लेख केला. मात्र, याला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, एका तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून भारताच्या संबंधांचा आढावा घेणे अयोग्य आहे. भारताचे विविध देशांशी असलेले संबंध गुणात्मकतेवर आधारित असतात. रशियासोबत भारताचे संबंध दीर्घकालीन आणि विश्वासार्ह आहेत. संरक्षण क्षेत्रातील खरेदी पूर्णपणे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा आणि धोरणात्मक मूल्यांकनाच्या आधारे ठरते. त्याचप्रमाणे, भारताची ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही जागतिक परिस्थिती आणि बाजारात उपलब्धतेनुसार निर्णय घेतो, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
भारत-अमेरिका संबंधांनी वेळोवेळी अनेक बदल आणि आव्हानांचा सामना केला असूनही हे संबंध टिकून राहिले आहेत, यावर जयस्वाल यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले, हे संबंध परस्पर हित आणि सन्मानावर आधारित आहेत. भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षांत अधिक दृढ झाले आहे. यामध्ये आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे ठरवलेल्या महत्त्वपूर्ण अजेंडावर आमचा लक्ष केंद्रीत आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांतील संबंध पूर्ववत वाढत राहतील, असा विश्वास व्यक्त केला. आम्हाला खात्री आहे की भारत-अमेरिका संबंध भविष्यातही सकारात्मक दिशेनेच पुढे जातील, असे जयस्वाल म्हणाले.