निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही – राहुल गांधी यांची जाहिर धमकी

    01-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही आम्ही त्यांना सोडणार नाही, आम्ही त्यांना शोधून काढू; अशी धमकी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली आहे.

राहुल गांधी यांनी अलिकडेच केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावा राहुल गांधी करत आहेत. शुक्रवारी संसद परिसरात त्यांनी निवडणूक आयोगास धमकी दिली. ते म्हणाले, निवडणूक आयोगात हे काम जो कोणी करत असेल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हा देशद्रोह आहे. तुम्ही निवृत्त झाला असाल किंवा कुठेही असाल, आम्ही तुम्हाला शोधून काढू, अशी धमकी राहुल गांधी यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना केराच्या टोपलीत टाकले आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोग दररोज होणाऱ्या अशा निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करते. निवडणूक आयोगाने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊ नका असे सांगितले आहे.

राहुल गांधी नैराश्यात – रविशंकर प्रसाद, भाजपचे ज्येष्ठ नेते

लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने राहुल गांधी हे नैराश्यात आहेत. यापुढे ते बिहार आणि बंगालमध्येही पराभूत होणार आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहावे. जनतेने का नाकारले, याचा गांभीर्याने विचार करावा. निवडणुका हरल्यानंतर सतत यंत्रणांवर शंका घेणे ही पराभवाची मानसिकता आहे. बिहारमध्येही एसआयआरचा मुद्द्यावर वस्तुस्थिती स्पष्ट आहे. काँग्रेसला खोट्या मतदारांच्या आधारावर निवडणूका जिंकायच्या आहेत का, असाही सवाल रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे.

एसआयआरवर संसदेत चर्चा शक्य नाही – किरेन रिजिजू, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री

संसदेत एसआयआरवर चर्चा व्हावी या विरोधकांच्या मागणीवर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की सरकार नियमांनुसार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, एसआयआरवर चर्चा होऊ शकत नाही. कारण ही घटनात्मक संस्थेद्वारे केली जाणारी प्रक्रिया आहे आणि ती पहिल्यांदाच होत नाही.