असते एकेकाचे अज्ञान

    03-Oct-2022   
Total Views |
supriaya sule
 
 
 
केंद्र सरकारने ‘पीएफआय’वर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, तसेच जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जर अशा बंदीची कुणी मागणी करत असेल, तर त्यावर चर्चा झाली पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, असे सुप्रिया सुळेबाईंचे मत आहे. अर्थात मुंबईकर १२ बॉम्बस्फोटांनी हादरल्यावर मुद्दाम तेरावा बॉम्बस्फोट झाला असे धांदात खोटे बोलणार्या पिताश्रींच्या कन्येकडून आणखी काय अपेक्षा. सुप्रिया सुळेबाईंनी त्यांच्या कीर्ती आणि ख्यातीला साजेसेच विधान केले आहे. खरेतर राजकीय डावपेच, कटकारस्थान शिजताना त्यांनी लहानपणापासूनच पाहिलेले असणार यात वाद नाही. कारण जसे आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात संत्री नाहीत. तसेच शरद पवारांसारख्या नेत्याच्या घरात सुप्रिया सुळेंसारखे विधान करणारेच वारसदार असू शकतात, यात काही शंका नाही.
 
 
पवारांची लेक म्हणून लोकसभेत लोक सुप्रियांना निवडून देतात. तिथे आपण काय करतो, हे सांगताना मागे त्या म्हणाल्या होत्या की, आम्ही साड्यांवर चर्चा करतो. लोकसभेत साड्यांवर चर्चा करताना सुप्रियांना देशातले प्रश्न समजण्यासाठी वेळ नक्कीच नसावा हे जनतेने समजून घ्यायला हवे. त्यामुळेच ‘पीएफआय’ म्हणजे काय? याबद्दलही सुप्रिया यांना माहिती असेल का? असा संशयही काही लोक व्यक्त करतात. काही लोकांचे म्हणणे की, एक एकरात कोटी रुपयांचे उत्पन्न देणारे वांग्याची शेती करताना या आधुनिक शेतकरी महिलेला वेळ कुठून असणार? राहिले तर लवासा पण आहेच की.
 
 
तेथील हवे नको बघणे ही काय खायची गोष्ट आहे? त्यातच केंद्र सरकारने मुळासकट भ्रष्टाचार उखडायचा ठरवले आहे. त्यामुळे ‘ईडी’च्या कारवाया सुरू. ‘ईडी’ची काडी कुठपर्यंत आग लावेल, याचाही धसका भल्याभल्यांना आहे. सुप्रिया सुळे या सगळ्यापलीकडे आहेत का? त्यामुळेच ‘पीएफआय’ वगैरेंबद्दल माहिती घेणे कुठे त्यांना परवडते. दुसरे असे की, केंद्रात आणि नुकत्याच राज्यात आलेल्या भाजप सरकारने देशात हिंदुत्वाची लाट निर्माण केली. या लाटेच्या बाहेर फेकले गेलो, तर जनता दारात उभी करणार नाही, याची जाणीव सुप्रियांना आहे. त्यामुळे देवदर्शन, नवरात्रीमध्ये गरबा खेळणे हेसुद्धा आता त्यांना करावे लागते. या सगळ्या कधीही न केलेल्या प्रपंचात त्यांना कुठे वेळ आहे, ‘पीएफआय’बद्दल माहिती घ्यायला. त्यामुळे आपण इतकेच म्हणायचे, असते एकेकाचे अज्ञान!
मल्लिकार्जुन की शशी?
मिताभ बच्चन ‘सिलसिला’ चित्रपटातील एका गाण्याच्या पूर्वी नायिका रेखाला उद्देशून म्हणतात, “तुम होती तो...” अगदी तसेच आता काहीसे दिग्विजय सिंग यांच्याबाबत वाटत आहे. कारण, दिग्विजय सिंग यांसारखा हक्काचा मोहरा काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद झाला आहे. आता आपल्यासारख्या लोकांच्या हातात इतकेच उरले की, काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय सिंग झाले असते, तर हा सुंदर विचार करणे? आपल्याच महिला पदाधिकारीला ‘सौ टका टंच माल’ म्हणणारे दिग्गी अध्यक्ष होणार नाहीत, हा खरेतर काँग्रेसपेक्षा भाजपला मोठा धक्का आहे. पण ‘रूको जरा,’ काँग्रेस पक्षाकडे दिग्गीपेक्षा वरचढ असणारे हिरे आहेत. शशी थरूर यांना काय कमी समजता की काय? दिग्गींपेक्षा शशी कोणत्याही बाबतीत मागे आहेत का? नाहीच. हिंदू धर्म आणि श्रद्धांबाबत निंदा करण्याचा विडा उचलण्यात तर या दोघांचाही हातखंडा आहे. वादग्रस्त विकृत विधान, हावभाव आणि कृती यामध्ये तर दोघेही शेरास सव्वाशेर.
 
 
दिग्विजय यांच्या राजकीय आणि सामाजिक गोतावळ्यात कोण आहेत, हे पाहिल्यावर जाणवते की, हा माणूस दाखवताना चंचल, मूर्ख वगैरे दाखवतो, पण याचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. दुसरीकडे शशी थरूर यांच्या कार्याची थोरवी काय वर्णावी? सुनंदा पुष्कर प्रकरण ते प्रत्येक देशात मैत्रीण (?) आहे, असा दावा करणारे शशी. हेच त्यांचे कार्यक्षेत्र असे कित्येक जण म्हणतही असतात. तर दिग्विजयनंतर आता उरले केवळ शशी थरूर आणि मल्लिकार्जुन. महाराष्ट्राचे प्रभारी असलेले आणि अतिशय ‘खर्जा’तल्या आवाजाने भाषण करणारे मल्लिकार्जुन हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील का? होतीलही.
 
 
कारण, गांधी घराण्याची हाजी हाजी करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. काँग्रेसच्या मायलेकरांसाठी (सोनिया, राहुल आणि प्रियांका) मल्लिकार्जुन यांची जमेची बाजूही आहे की, ते केवळ ८० वर्षांचे आहेत. शशी थरूर ६६ वर्षांचे, तर मल्लिकार्जुन ८० वर्षांचे. आता काही उद्धट, नतद्रष्ट विचारत आहेत की, काँग्रेसला यांच्यापेक्षा कुणीही वयाने ज्येष्ठ असलेला कार्यकर्ता भेटलाच नाही वाटते. असो, आपल्याला काय? तो काँग्रेसचा अंतर्गत मामला आहे. मात्र, सध्या भूमंडळात एकच प्रश्न छळत आहे, दि. १९ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचा नवनिर्वाचित अध्यक्ष घोषित होणार, शशी थरूर की मल्लिकार्जुन खर्गे?
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.