आदित्य राजे हे आपले सरकार आहे

    23-Oct-2022   
Total Views |

aditya thackeray
 
 
आपले दोनपैकी कोण खरे मुख्यमंत्री कोण? म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, असा प्रश्न महाराष्ट्रातील राजकुमार चिरंजीव आदित्य यांना पडला आहे. अर्थात, त्यांना तो प्रश्न पडू शकतो. कारण, मागे ते ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरणमंत्री होते तिथे तर एक नव्हे, दोन नव्हे, तर कितीतरी जण स्वतःला मुख्यमंत्री समजायचे. समजायचे म्हणजे, ते लोक कायम महाराष्ट्राचे मालक असल्यासारख्या तोर्‍यात असायचे. ‘ते म्हणजे महाराष्ट्र’, ‘ते म्हणजे मराठी माणूस’, ‘ते म्हणजे मुंबई’ असेही ते छातीठोकपणे सांगायचे. त्यातले खरेखुरे शपथ घेतलेले मुख्यमंत्री कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे घराबाहेर पडलेच नाहीत. सगळ्या महाराष्ट्राचा कारभार म्हणे ‘फेसबुक’वरून हाकण्याचा त्यांचा मनसुबा होता.
 
 
ते घराबाहेर पडले नाहीत म्हणून मग पंतप्रधानपदाचे आजन्म दावेदार असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ बारामतीचे काकाश्री घराबाहेर पडले. दुसरीकडे काकाश्रींचे पुतणेही मुख्यमंत्री बनू शकले नाहीत, पण दुधाची तहान ताकावर भागवावी, अगदी तसेच हे पुतणेही ‘प्रति’चे ‘प्रती मुख्यमंत्री’ म्हणून वागू लागले. या सगळ्यावर कडी म्हणजे मुख्यमंत्री असूनही घरीच थांबून सगळ्या महाराष्ट्राला स्थगिती देणार्‍या त्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले लोकही कायम मुख्यमंत्री असल्याच्या थाटातच वागायचे, बोलायचे. त्यातला ‘एक’जण तर अगदी भुवयी उडवत लोकांसमोर दररोज सकाळी विचारांचा प्रसारही करायचा. बरं, बाळराजे आदित्य त्यावेळी काय करायचे? वर उल्लेखलेले सगळे प्रतिमुख्यमंत्री असतील, तर बाळराजे किंवा युवराज म्हणू, ते पर्यावरणमंत्री असतानादेखील एकनाथ शिंदेंच्या खात्याचे काम पाहायचे. अगदी पोलीस खात्याच्याही बैठका घ्यायचे.
 
 
थोडक्यात, युवराजांचा संचार, मार्गदर्शन मंत्रिमंडळातील सर्वच खात्यांना असायचे. (हे सगळं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सांगितले आहे.) तर अशा महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोण मुख्यमंत्री आणि कोण-कोणत्या खात्याचा मंत्री आहे, हे समजणे खूप कठीण होते. भरीसभर महाविकास आघाडीच्या कित्येक मंत्र्यांवर गुन्हे दाखल झालेले. काहीतर अजूनही तुरुंगात आहेत. काही त्यावेळी छातीत दुखतंयचा बहाणा करत जे तुरुंगातून बाहेर आले, ते मंत्रीच बनले. मंत्री बनून पुन्हा तांदूळ वगैरेमध्ये हात साफ केले. (लोक असे म्हणतात.) त्या तसल्या भयंकर परिस्थितीमधून महाराष्ट्र बाहेर आला. पण बाळराजे, युवराज आदित्य महाराज बाहेर पडले नाही. ते आजही गोंधळलेत की मुख्यमंत्री कोण? पण आता एकमात्र आहे, आदित्यनी यापैकी कुणालाही मुख्यमंत्री मानले, तरी महाराष्ट्राचा विकासच होत आहे. विकासाला स्थगिती मिळत नाही. कारण, हे आपले सरकार आहे.
 
 
तीन तिघाडा काम बिघाडा
 
काय करावे? मी बोललो, तरी लोक हसतात. बरं. माझ्यावर कुणी काय बोलले, तरी लोक हसतात. खरंच मी इतका आनंददायी आहे का? गेले बिचारे आमचे ते... किती छान-छान उपमा दिल्या होत्या मला, ‘कोविडयोलॉजिस्ट’, कुणी मला ‘बेस्ट’ म्हणायचे. जाऊ दे. ‘बेस्ट’ म्हटले की, एसटी आठवते आणि एसटी म्हटले की, मग तो संप आठवतो. मग संप आठवला की, काकांच्या घरावर काढलेला मोर्चा आठवतो. हुश्श.. हुश्शच! नकोच त्या आठवणी. त्यानंतर मग माझ्या पक्षातले त्या कालचे काही तिकीट इच्छुक लोक मला ‘कुटुंबप्रमुख’ ही म्हणायचे. पण गेले तेही. पण छे! त्यात काय एवढे काकासारखे वादळ सोबत आहे ना? काय म्हणता, त्या वादळामुळेच मूळच्या पक्षातले निष्ठावंत पाल्यापाचोळ्यांसारखे उडून गेले. उडून जाऊ दे.
 
 
आमच्या मा. महापौरताई मागेच म्हणाल्या, जे गेले ते छोटे-छोटे साप आहेत, मोठे तर आमच्याकडे आहेत. काय म्हणतो, माझ्या आठवणी. मागे आमचे असेच एक सेनापती म्हणाले की, मी पंतप्रधान होईल अशी भीती वाटली म्हणून भाजपने आमचा पक्ष फोडला. किती छान... किंबहुना खूपच छान. मी पंतप्रधान... हं, पण हे मी बोलू शकत नाही. काकांना आवडणार नाही. ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीचेच आहेत. मीसुद्धा आहे म्हटल्यावर? जाऊ दे. नको बोलूया या विषयावर. पण, हा विषय विसरू नका बरं. आता आमच्या चिरंजीवांनी पण म्हटले की, मी चांगला डॉक्टर झालो असतो. होय झालो असतो, मी महाराष्ट्राचा डॉक्टर. डॉक्टर काय काम करतात, शस्त्रक्रिया करतात ना! आम्ही तर गेले कित्येक वर्ष आमच्या शब्दांतून कोथळा बाहेर काढतो. डॉक्टर रुग्णांच्या उपचारासाठी काय काय उपकरण वापरतात. आमचे शस्त्र आमची जीभ आहे जीभ.
 
 
एक फेसबुक लाईव्ह केले की खेळ खल्लास. म्हणता, संजय राऊत म्हणाले होते की डॉक्टरांना काय कळते? मग, आता काय करू? चिरंजीवांनी दिलेली डॉक्टरकीची उपमा विसरू का? मग, आता मी कोण आहे? काय म्हणता, मी सध्या केवळ आणि केवळ डाव्या विचारसरणीच्या टोळक्यांचे आवडते पात्र आहे? थांबा, काहीही बोलू नका. आता आमच्याकडे शेरास सव्वाशेर आहेत, मी तर मी, सोबत महापौर सोबत अंधारेसुद्धा आहेत. तीन-तीन जण... कळले का? असं असं बोलू की, सगळे शत्रू पळून जातील. काय म्हणता, तीन तीन जण म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा?
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.