अनंत अपार सरस्वती...

    01-Oct-2022   
Total Views |

 सरस्वती
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमध्ये सरस्वती देवीचा फोटो लावण्याची मुळी गरजच काय, अशा आशयाचे अतिशय वादग्रस्त विधान केले. ऐन नवरात्रोत्सवात भुजबळांनी केलेल्या या विवादास्पद वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोडही उठली. त्यानिमित्ताने सरस्वती देवी ही केेवळ विद्येची देवताच नाही, तर आवाजाची, नादाची, शब्दाचीही देवता असून, इतर धर्म, देशांच्या सीमांपलीकडचे या शारदेचे महात्म्य वर्णन करणारा हा माहितीपूर्ण लेख...
 
 
नदीला, वार्‍याला, प्रकाशाला आणि आकाशाला का देश, भाषा वा जाती-धर्माचे बंधन आहे? वाचेला, भाषेला, विद्येला का कुठल्या जाती-धर्माचे बंधन असते? तेजस्वी सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाला दही दिशांना धावायचे इतकेच माहीत! उत्तुंग पर्वतावरून निघालेल्या प्रवाहाला खोल समुद्राकडे धावत जाणे इतकेच माहीत! कड्यावरून स्वत:ला झोकून देऊन वाहणारी एक नदी म्हणजे सरस्वती! तिने माता होऊन काठावरील मानवच काय, प्राणी आणि वनस्पती वाढवल्या. सरस्वती देवी ही वाचेची पण नदी आहे! तिने मातृभाषा होऊन सर्वांना विद्या दिली आहे.
 
 
भारतीय आध्यात्मिक विचारप्रवाह वैदिक, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांतून बहरला. या तीनही धर्मातून गणेश, लक्ष्मी, राम, सरस्वती अशा अनेक देवी-देवांना पूज्य मानले गेले.
 
 
हिंदूंच्या सर्वात प्राचीन अशा वैदिक साहित्यात सरस्वतीचे स्तवन करताना म्हटले आहे-
 
हे सरस्वती, हत्ती ज्याप्रमाणे सहज कमळे उपटतो त्याप्रमाणे तू तुझ्या वेगवान लहरींनी रस्त्यात येणार्‍या पर्वतांचा चुरा करतेस! कुठेही न थांबणारा तुझा गर्जना करत वाहणारा वेगवान प्रवाह आम्हाला युद्धात यश देवो! हे नदी देवते, देवांची निंदा करणार्‍यांना तू पळवून लाव! दुष्ट व कपटी लोकांचा नाश कर! सज्जनांचे रक्षण कर! सज्जनांच्या हितासाठी सुपीक भूमी दे! आमच्या बुद्धीचे रक्षण करून, तू आम्हाला सुरक्षा दे! सप्तनद्यांमध्ये तू आम्हाला सर्वात प्रिय आहेस! तू आमच्या मैत्रीचा स्वीकार कर! आम्हाला कधीही तुझ्यापासून दूर करू नकोस! - बार्हस्पत्यो भरद्वाज ऋषी, ऋग्वेद 6.61
 
 
जैन धर्मातसुद्धा सरस्वतीला सर्व विद्यांचे स्रोत मानले जाते. तिला ‘श्रुतदेवी’, ‘शारदा’ आणि ‘वागेश्वरी’ या नावांनी पण ओळखले जाते. जैन शिल्पांमध्ये सरस्वती देवीची मूर्ती सहसा उभी असते. ती चतुर्भुज असून तिच्या एका हातात पुस्तक, एका हातात जपमाळ, कधी समोरील दोन हातात वीणा, तर कधी एका हातात कमंडलू व एका हातात पद्म धारण केले असते.
जैनांनी अनेक स्तोत्रांमधून सरस्वतीला वंदन केले आहे. त्यापैकी हे एक सरस्वतीची नावे सांगणारे स्तोत्र-
 
 
प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती।
तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसगामिनी॥पञ्चमं विदुषां माता षष्ठं वागीश्वरी तथा।कुमारी सप्तमं प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी॥नवमं च जगन्माता, दशमं ब्राह्मिणी तथा।एकादशं तु ब्रह्माणी, द्वादशं वरदा भवेत्॥वाणी त्रयोदशं नाम, भाषा चैव चतुर्दशं।
पञ्चदशं श्रुतदेवी, षोडशं गौर्निगद्यते ॥
 
 
 
सरस्वतीचे पहिले नाव भारती, दुसरे सरस्वती, तिसरे शारदा, चौथे हंसगामिनी, पाचवे विदुषी, सहावे वागेश्वरी, सातवे कुमारी, आठवे ब्रह्मचारिणी, नववे जगन्माता, दहावे नाव ब्राह्मिणी, अकरावे ब्रह्माणी, बारावे नाव वरदा, तेरावे वाणी, चौदावे भाषा, पंधरावे नाव श्रुतदेवी आणि सोळावे नाव गौ आहे. अशा प्रकारे सरस्वती देवीची सोळा नावे आहेत.
 
 
सरस्वती देवीची उपासना बौद्धांनी पण केली आहे. अनेक बौद्ध सूत्रातून सरस्वतीचे गुण वर्णन आले आहे. तांत्रिक बौद्ध पंथात सरस्वती ध्यानाची देवता आहे. ती साहित्य, काव्य आणि बुद्धीची देवी आहे. तिची अनेक वेगवेगळे रूपे असून, त्यातील प्रमुख रूप श्वेत किंवा लाल आहे. तिच्या श्वेत रूपात ती विद्येची देवी आहे आणि लाल रूपात ती शक्ती देवता आहे. कधीकधी तिला मंजुश्रीची पत्नी म्हणूनदेखील चित्रित केले जाते.
 
 
प्राचीन काळातील हिंदू, जैन व बौद्ध धर्मातील ऋषी, मुनी, साधू, व भिक्षूंनी सरस्वतीचे गुणगान केले. त्यानंतर मध्य युगात ज्ञानेश्वरांपासून शेख महंमदापर्यंत सर्व जाती-धर्मातील संतानी सरस्वती देवीला वंदन केले आहे.
 
 
ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानदेव म्हणतात- 
 
 
आतां अभिनव वाग्विलासिनी।
जे चातुर्यार्थकलाकामिनी।ते शारदा विश्वमोहिनी। नमिली मियां॥तर एकनाथी भागवतात, संत एकनाथ म्हणतात-आतां नमूं सरस्वती। जे सारासारविवेकमूर्तीं।चेतनारूपें इंद्रियवृत्ती। जे चाळीती सर्वदा॥दासबोधाच्या सुरवातीला रामदास स्वामी म्हणतात -आतां वंदीन वेदमाता। श्रीशारदा ब्रह्मसुता।शब्दमूल वाग्देवता। माहं माया॥तर तुकाराम महाराज हरिपाठात म्हणतात-नमिला गणपति माउली सारजा।आतां गुरुराजा दंडवत ॥1॥संत तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेत म्हणतात-गणेश,शारदा आणि सदगुरू।आपणचि भक्तकामकल्पतरू।देवदेवता नारद तुंबरू। आपणचि जाहला॥तर कवयत्री बहिणाबाई म्हणतात -माझी माय सरसोती माले शिकवते बोलीलेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली॥संत शेख महंमद म्हणतात -हरि तुं कागद नि वरि अक्षरें।
पंडित विचारे मी वागेश्वरी॥
 
 
विजापूरचा इब्राहिम आदिलशाह दुसरा त्याच्या किताब ई नवरस मध्ये लिहितो-
 
 
सारदा गनेस माता पिता तुम मानो निर्मल
इबराहीम गुप्त घेसो अपनवाज
प्रगट कीनो धन्य मेरो रास
 
 
सर्व जातीच्या हिंदूंनी, जैन व बौद्धांनी सरस्वतीची उपासना केली आहे. भारतीय मुसलमानांनीसुद्धा सरस्वतीची उपासना केली आहे. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत, पाठशालांमध्ये सर्व जाती-धर्माची मुले-मुली एकत्र शिकत असत. या पाठशालांमध्ये सरस्वतीची उपासना होत असे. बिटिश शिक्षण पद्धती आल्यावर ही प्रथा इंग्रजी शाळांमधून हळूहळू बंद झाली. तरीही अजूनही अनेक शाळांमधून सरस्वती देवीची पूजा केली जाते. तात्त्पर्य, सर्व जाती-धर्माच्या संतानी, गुरूंनी आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना केली आहे.
 
 
 
 
 सरस्वती
 
 
 
 
बिकानेर, राजस्थान येथील 13व्या शतकातील जैन सरस्वतीची मूर्ती. आता दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.
 
 
 
वाग्देवी सरस्वती ही विद्येची नदी वाहत वाहत युरोपमध्ये सुद्धा पोहोचली - ती भाषेतून आणि शब्दातून. आजच्या विषयाला धरून एक उदाहरण घेऊ - ‘सृ’ म्हणजे ‘वाहते पाणी’पासून आलेले शब्द आहेत - सरिता, स्रवणे, सरोवर, सारस (पाण्यातील पक्षी) अगदी पुण्यातील ‘सारसबाग’सुद्धा! म्हणूनच वाहणारी आणि पाणी देणारी नदी ती ‘सरस्वती.’ त्याच धातूपासून युरोपियन भाषांमध्ये नदीसाठी असलेले शब्द पहा - strem (Scots), stroom (Dutch), Strom (German), strøm (Danish), straum (Norwegian Nynorsk), ström (Swedish), straumur (Icelandic), srovė (Lithuanian), strumień (Polish) stream (English) . भारतातील सरस्वती नदी वाहत वाहत युरोपियन भाषेतील नदी, ओहोळ, खळखळ वाहणारी ‘स्ट्रीम’ झाली आहे. आज एखाद्या कार्यक्रमाचे प्रवाह केले जाते, अर्थात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माहिती वाहून नेली जाते ... ती माहितीची नदी म्हणजेच ज्ञानसरिता ... सरस्वती!
 
 
सरस्वती ही आवाजाची, नादाची, शब्दाची देवी असल्याने ती जगातील सर्व भाषांची देवी आहे. सगळं ज्ञान भाषेत असल्याने, ती ज्ञानाची देवी आहे. पृथ्वीच्या पाठीवर सरस्वतीपासून कोणीही वंचित राहू शकत नाही. जो कोणी कुठलेही ज्ञान मिळवतो, शब्द ऐकतो, समजतो, विचार करतो, बोलतो, गातो ... त्या सगळ्याची अधिष्ठात्री देवी सरस्वती देवी आहे. ती कोणा एकाची, कोणा एका समाजाची इतकी सीमित देवी नाही. ती विश्वमोहिनी आहे! संपूर्ण विश्वाला वाक्चातुर्याने मोहून टाकणारी देवी आहे!
याकरिता संतानी म्हटले आहे-
 
 
मुक्यासी प्रसन्न झालिया सरस्वती॥
तत्त्काळ तो वदेल श्रुति॥
 
 
सरस्वती देवी प्रसन्न झाली तर तो मनुष्य मुका जरी असला तरीसुद्धा तो वेद गाऊ लागेल. मात्र, सरस्वती देवी प्रसन्न नसेल तर तो मनुष्य असत्य, अहितकारी आणि असंबद्ध बडबड करेल. या नवरात्रीत सरस्वती देवीला एकच प्रार्थना...
 
 
या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
 
 
सर्व प्राण्यांमध्ये जी देवी विद्या रूपाने विराजमान आहे, तिला त्रिवार वंदन असो!
संदर्भ -
 
1. The Beautiful Tree - Dharmapala
2. https://en.wiktionary.org/wiki/
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.