महिलांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या मंदा फड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2022   
Total Views |

Manda Phad
 
 
घर चालविण्यासाठी किराणा दुकान, वडे-पापड करण्यापासून सुरू झालेला मंदाताईंचा प्रवास आज हजारो महिलांना रोजगार देण्यापर्यंत पोहोचला आहे. महिलांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या मंदा प्रकाश फड यांच्याविषयी...
 
 
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील निराळे गावातील मंदा यांचा जन्म. वावी येथील महाविद्यालयात त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. कबड्डी खेळाडू म्हणून त्या शाळेत प्रसिद्ध होत्या. वक्तृत्व कलाही अवगत होती. मुलीच्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून वडिलांनी बारावीनंतरच लग्न जमवलं. सासरी मात्र सासूबाई आणि सासरे यांनी मंदाताईंना शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिशियनसाठी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतला. मात्र, मानोरीला लग्नाला जात असताना झालेल्या अपघातात सासूबाई, सासरे आणि दिराचा मृत्यू झाला. यानंतर मात्र मंदाताईंना पुढे काय, असा प्रश्न पडला. त्यांना झोपेत चालणे, रडणे असे अनेक त्रास सुरु झाले. यातून सावरताना त्यांचे ‘आयटीआय’चे शिक्षण पूर्ण झाले व एक वर्ष ‘एचएएल’मध्ये त्यांनी नोकरीही केली. लहान मुलगा सतत आजारी असल्याने त्यांनी नोकरी सोडली. काही महिन्यांतच पती प्रकाश यांचा अपघात झाल्याने त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. पती भाड्याने रिक्षा चालवत. मात्र, अपघातामुळे घरखर्च भागवणेही त्यांना अवघड झाले. अशावेळी घर चालविण्याचा संपूर्ण भार मंदाताईंवर आल्याने त्यांनी घरगुती वडे, पापड, कुरडई असे वाळवणाचे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली. तसेच गोधड्या शिवून देणेही सुरू केले. परिणामी, त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्या व्यवसायाचा आवाकादेखील. घराला हातभार लागावा यासाठी त्यांनी किराणा दुकानदेखील सुरु केले. ‘ऑर्डर्स’ वाढू लागल्याने त्यांनी त्यांच्यासोबत आणखी महिलांना जोडले. २००६ साली त्यांनी ‘सप्तश्रृंगी महिला बचतगटा’ची स्थापना केली. २५ पैशांना एक गोवरी अशा ५० हजार गोवऱ्यांची मोठी ‘ऑर्डर’ त्यांना मिळाली. कालांतराने महिला संघटन वाढून परिसरात त्यांची प्रसिद्धी वाढली.
 
 
 
२००७च्या नाशिक मनपा निवडणुकीत त्यांना जेलरोड येथील प्रभाग क्र. ३५ मधील लोकांनीच निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला. लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी ऐनवेळी एका पक्षाने तिकीट कापल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कुठलीही राजकीय पाश्वर्र्भूमी नसताना त्या केवळ २०० मतांनी पराभूत झाल्या. त्यानंतरही त्यांनी काम सुरुच ठेवले. बचतगटाचे काम करता करता त्यांनी ‘रिलायन्स’मध्ये ‘एलआयसी कोड’वर एक वर्ष काम केले. या दरम्यान त्यांची भाजपशी जवळीक वाढली. तत्कालीन आ. बाळासाहेब सानप यांच्या सोबत त्या अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊ लागल्या. त्यांनी काही काळ नाशिकरोड भाजप महिला आघाडीचे अध्यक्षपदही भूषविले. ‘कॉम्प्युटर’ क्लासेस सुरु करत महिलांना मोफत प्रशिक्षण दिले. महिलांना बचतगटाविषयी माहिती देण्याबरोबरच नर्सिंग शिकण्यासाठी मदत केली. आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक बचतगट स्थापन केले. या माध्यमातून त्यांच्याशी दोन हजाराहून अधिक महिला जोडल्या गेल्या. या सर्वांना एकाच छताखाली आणण्यासाठी ‘रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थे’ची स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खादी ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण, महिलांना पेन्शन सुरु करणे अशा अनेक सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली. २०१७ साली त्यांना महापालिकेसाठी भाजपने तिकीट दिले. यावेळी समोर सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या उमेदवारासमोर केवळ ५० मतांनी त्या पराभूत झाल्या. यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. कापडी पिशव्या शिवणे, जीन्स, पेटिकोट शिवणे यांसह हजारो महिलांना प्रशिक्षण दिले. कोरोनाकाळातही हजारो मास्क विकले गेले. सामाजिक काम करत असताना त्यांनी कधीही कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. सध्या त्यांची मुलगी ‘आयटी इंजिनिअर’ आणि मुलगा ‘सिव्हिल इंजिनिअर’ आहेत. कोरोनाकाळात संस्थेतील सहा महिलांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. एका महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत देऊ केली. तसेच अन्नधान्य, आर्थिक मदत केली. तसेत शक्य त्यांना घरोघरी शिलाईची कामे दिली.
 
२०१७ साली त्यांची ‘मुद्रा योजने’च्या राज्य समन्वयकपदी नेमणूक झाली. याद्वारे कंपनी, व्यवसाय, सरकारी योजनांची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ३५० महिलांचे ‘स्फूर्ती योजने’तून ‘क्ल्स्टर’ केले आहे. मध्यवर्ती कारागृह अधिक्षक मंडळावरही त्या काम करतात. महिला कैद्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. केंद्र सरकारची चार कोटींची योजना देखील त्यांना मंजूर झाली आहे. ‘निर्झरा गारमेंट्स’ नावाची कंपनीही त्यांनी नुकतीच स्थापन केली असून याद्वारे त्या ५०० महिलांना रोजगार देणार आहे. रा. स्व. संघाचे जुने कार्यकर्ते व सध्या दिल्लीस्थित कर्मवीर इधाते यांनीही मंदाताईंना वेळोवेळी मदत केली. माझ्या कार्यात पती प्रकाश यांचेही सहकार्य मिळाल्याचे मंदाताई सांगतात. मंदाताईंना १८ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या त्यांनी साडी सेंटरदेखील सुरू केले आहेत. “मला मृत्यूपूर्वी हजारो महिलांना रोजगार द्यायचा आहे,” असे त्या म्हणतात. मंदाताईंना शेकडो योजना तोंडपाठही आहेत. अखेरपर्यंत ध्येयवादासाठी काम करायचे असून महिलांचे अश्रू पुसण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मंदाताई सांगतात. शून्यातून आपलं विश्व निर्माण करुन महिलांसाठी संघर्ष करत त्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या मंदा फड यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@