‘टॉप-१०’ यादीतील ‘कर्करोग सर्जन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2021   
Total Views |

Doctor _1  H x


कर्करूग्णाला वेळेत उपचार मिळणे फार गरजेचे असते. कोरोना काळात बिकट परिस्थिती असतानाही आपली सेवा अविरतपणे देणार्‍या डॉ. अनिल अशोक हेरूर यांच्याविषयी आपण जाणून घेऊया.



कोरोना काळात कर्करोग रूग्णांना उपचारासाठी मुंबईकडे जाता येत नव्हते. सामान्य माणसांसाठी आजही रेल्वेसेवा बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाला. त्यानंतर रेल्वेसेवा मधले काही महिने वगळता सामान्य माणसांसाठी बंदच आहे. रुग्णांची अडचण लक्षात घेऊन डॉ. अनिल हेरुर यांनी आपली सेवा रुग्णांसाठी पूर्ण वेळ सुरूच ठेवली होती. त्यामुळे अनेक रुग्णांनी डॉ. हेरुर यांच्याकडेच उपचार घेणे पसंत केले. या काळात अनेक खासगी डॉक्टरांनी आपली सेवा बंद ठेवली होती. पण डॉ. हेरूर यांची सेवा पूर्णपणे सुरू होती. यातूनच डॉ. हेरुर हे सामाजिक भान जपत असल्याचे दिसून येत आहे.



डॉ. हेरूर यांचे शालेय शिक्षण ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ येथे झाले. ‘डी. जे. रुपारेल’ या महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ‘सेंट जी. एस मेडिकल कॉलेज’ आणि ‘केईएम’ रूग्णालयातून वैद्यकीय प्रशिक्षण घेतले. ‘लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल महाविद्यालया’तून शल्यचिकित्सेत ‘मास्टर्स’ची पदवी संपादन केली. टाटा रुग्णालयात त्यांनी सात वर्षे ‘पॅ्रक्टिस’ केली. त्यानंतर काही वर्षे शिक्षणासाठी ते परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांनी अन्ननलिका आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग या विषयामध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांचेच शिक्षण त्यांनी परदेशात जाऊन घेतले. अमेरिकेत प्रसिद्ध रुग्णालयाची शिष्यवृत्ती डॉ. अनिल यांना मिळाली होती.


एवढेच नव्हे, तर त्यांना जपानमध्येही शिष्यवृत्ती मिळाली होती. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही डॉ. हेरुर यांच्या मनात कधीही परदेशात स्थायिक होण्याचा विचार आला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीत कर्करोगावर उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध नाही, हे दिसून आले होते. त्याचक्षणी डॉ. हेरुर यांनी डोंबिवलीत उपचार सुरू करण्याचे मनाशी पक्के केले होते. त्यांच्या घरात सर्वजणच डॉक्टर असल्याने लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्यांना गुणही चांगले मिळत असल्याने गुणवत्तेवर त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला होता. त्यांची टाटा रुग्णालयात ‘पोस्टिंग’ झाली होती.



‘एमएस’ करताना त्याठिकाणी शल्यक्रिया पाहून त्यांना कर्करोग या विषयात ‘स्पेशलायझेशन’ करण्याची इच्छा निर्माण झाली. कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे, ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. कर्करोग रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचे प्रमाणही त्याकाळात कमी होते. डॉ. हेरुर यांच्या आई डॉक्टर असल्याने त्यांचे फडके रस्त्यावर रुग्णालय होतेच. त्याच रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर डॉ. हेरुर यांनी कर्करोग रूग्णांवर उपचार करणारा विभाग सुरू केला. डोंबिवलीतील कर्करूग्णांना डोंबिवलीतच उपचार मिळण्यास मदत झाली.


डॉ. हेरुर यांनी ‘कोविड’ काळात ही ‘रोबोटिक सर्जरी’ आणि ‘लेप्रोस्कोपी’ या दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया ‘कोविड’ काळात सुरू ठेवल्या होत्या. डॉ. हेरूर यांनी कर्करोगातील ‘लेप्रोस्कोपी’ या एक हजारांहून अधिक सर्जरी केल्या आहेत. कर्करोगांचे भारतात आता सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहे. तोंडाचा कर्करोगांचा अनुभव भारतात आहे. गुटखा खाणारी लोक भारतात आहे. अमेरिकेत तोंडाचा कर्करोग आढळून येत नाही. अमेरिकेतून एक विद्यार्थी भारतात आला होता. त्याने तीन दिवसांत फोटोच्या दहा रिल संपविल्या होत्या. कारण, त्याला अमेरिकेत कर्करोगाच्या अशा केसेस पाहताच आल्या नाहीत, असे त्याने सांगितले. आता सेलिब्रेटीसुद्धा भारतात कर्करोगांवर उपचार घेत आहे.


सेलिब्रेटींच्या परदेशात जाण्यामागे गोपनीयता हे एकमेव कारण आहे. पण आता ‘ट्रेंड’ बदलत आहे. सेलिब्रेटींनीसुद्धा डॉ. हेरूर यांच्याकडे स्वत:वर उपचार करून घेतले आहे. भारतात जी चांगली कामे केली जातात, ते लिखित स्वरूपात ठेवले जात नाही. त्यामुळे केवळ डॉक्टरांनीच नव्हे तर प्रत्येकाने आपले काम लिखित स्वरूपात ठेवण्याची गरज आहे. डॉ. अनिल यांची २० ‘पब्लिकेशन्स’ आहेत, त्या माध्यमातून ते आपले काम ‘डॉक्युमेंटरी’च्या स्वरूपात जतन करून ठेवत आहे. सध्या जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे आपण काय खातो, हेदेखील कर्करोग होण्याचे एक प्रमुख कारण ठरू शकते. आपल्या जीवनशैलीमुळे ६० टक्के कर्करोग होतात. कर्करोगांमध्ये स्तनांचा कर्करोग प्रथम क्रमांकावर आहे. स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगांचे प्रमाण जास्त आहे. पुरूषांनाही काही प्रमाणात होतो. याशिवाय पुरूषांमध्ये तोंडाचा व फुप्फुसांचा कर्करोग जास्त प्रमाणात होत आहे. हे दोन्ही कर्करोग तंबाखूजन्य पदार्थामुळे होत आहे.


डॉ. अनिल यांनी २०१७ मध्ये ‘मैत्री परिवार सपोर्ट ग्रुप’ची स्थापना केली आहे. या ग्रुपमधील कर्करोगातून बरे झालेले रुग्ण इतर रूग्णांना भेटत असत. त्यांची कर्करोगाची भीती घालविण्याचे काम या ‘सपोर्ट ग्रुप’मधून केले जाते. याव्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम डॉ. अनिल राबवित असतात. वैद्यकीय सेवेत राहून सामाजिक व्रत जपणार्‍या डॉ. अनिल यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!





@@AUTHORINFO_V1@@