तुमसे ना हो पाएगा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2021   
Total Views |

pak_1  H x W: 0
एक आठवडा उलटल्यानंतरही पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या हाती कुठलेही धागेदोरे लागले नाहीत. उलट पाकिस्तानने हा हल्ला नसून गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याचा दावा केला होता. पण, चीनने पाकिस्तानचा हा दावा धुडकावून लावत हा दहशतवादी हल्लाच असल्याचे जाहीर केले. एवढ्यावर थांबेल तो चीन कसला, ‘तुमसे ना हो पाएगा’ म्हणत चीनने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती थेट पाकिस्तानात पाठवली. आता चीनची ही समिती पाकिस्तानच्या तपास अधिकार्‍यांबरोबर या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करेल.
 
 
 
चीन-पाकिस्तान हे एकमेकांचे खरंतर परिस्थितीजन्य मित्र. मनात एकमेकांविषयी कुठलीही सद्भावना नसताना केवळ आणि केवळ स्वार्थासाठी एकमेकांना चिकटण्यात त्यांनी नेहमीच धन्यता मानली. पाकिस्तान तर अन्नधान्यापासून ते अगदी बांधकामापर्यंत सर्वच गोष्टींसाठी चीननिर्भर आहे. दुसरीकडे विस्तारवादी चिनी ड्रॅगननेही पाकिस्तानला विकासाच्या नावाखाली अगदी घट्ट विळखा घातलेला दिसतो. इतका की, पाकिस्तानच्या मुलीही चिनी मुलं लग्नासाठी अक्षरश: पळवून नेतात. एवढेच नाही तर पाकस्थित चिनी कंपन्यांमध्ये पाकिस्तानी कर्मचार्‍यांना नमाज पढण्यापासून रोखणे असो, अथवा पाकमधील चिनी नागरिकांना ट्राफिकचे नियम मोडण्याबद्दल कोणतेही शिक्षा न करणे असो, सर्वार्थाने पाकिस्तान चीनच्या ऋणांखाली दाबला गेला आहे. खरंतर गेल्या काही काळातील अशा आणखीन खंडीभर घटनांचा दाखला देता देईल, जिथे पाकिस्तानला वारंवार चीनसमोर असे ना तसे, नमते हे घ्यावेच लागले. चीनची आपल्यावर खप्पामर्जी होऊ नये म्हणून पाकिस्तानची नेहमीच कसोटी लागते. नुकतेच एका मुलाखतीत चीनमधील उघूर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांवर प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांची उडालेली धांदल आणि बनवाबनवी तर अख्ख्या जगाने पाहिली. पण, आता इमरान खान यांना आणि त्यांच्या देशालाही चीनकडून मिळणार्‍या अशा प्रकारच्या तुच्छ, दुय्यम वागणुकीची जणू सवयच जडलेली दिसते. याचाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाकिस्तानात पाहायला मिळाला.
 
 
 
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट हे तसे नित्याचे. त्यातच ‘सीपेक’च्या कामावरून यापूर्वीही प्रकल्पाला विरोध करणार्‍यांकडून असे हल्लेही करण्यात आले. त्यात पाकिस्तानींबरोबरच चिनीही लक्ष्यच होते. असाच एक हल्ला गेल्या आठवड्यातही झाला. ‘सीपेक’ अंतर्गत बांधल्या जाणार्‍या एका धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४० जणांच्या टीमच्या बसमध्ये हा स्फोट घडला. या हल्ल्यात १३ जण मृत्युमुखी पडले आणि त्यापैकी नऊ हे चिनी नागरिक होते. मग काय, आपल्या नागरिकांवर आपल्याच मित्रदेशात झालेल्या हल्ल्यामुळे चीन एकाएकी खवळून उठला. त्याने पाकिस्तानकडे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची आग्रही मागणी वजा आदेशच दिला. पण, या घटनेला साधारण एक आठवडा उलटल्यानंतरही पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या हाती कुठलेही धागेदोरे लागले नाहीत. उलट पाकिस्तानने हा हल्ला नसून गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याचा दावा केला होता. पण, चीनने पाकिस्तानचा हा दावा धुडकावून लावत हा दहशतवादी हल्लाच असल्याचे जाहीर केले. एवढ्यावर थांबेल तो चीन कसला, ‘तुमसे ना हो पाएगा’ म्हणत चीनने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती थेट पाकिस्तानात पाठवली. आता चीनची ही समिती पाकिस्तानच्या तपास अधिकार्‍यांबरोबर या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करेल. पण, या प्रकारामुळे चीनचा पाकिस्तानी तपास यंत्रणेवर साधा विश्वासही नसल्याचेच अधोरेखित होते. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये तर चीनला ‘आम्हीच ही चौकशी करू,’ हे खडसावून सांगण्याची साधी हिंमतसुद्धा नाही. पण, शेवटी काय, पाकिस्तानकडे चीनच्या ताटाखालचे मांजर बनून राहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाहीच.
 
 
 
मात्र, पाकिस्तान-चीनचे हे नाते वरकरणी कितीही अविश्वासाचे आणि एकमेकांकडे संशयाने पाहणारे असले, तरी त्या दोन्ही देशांना आज एकमेकांची नितांत गरज आहे. कारण, या दोन्ही देशांच्या मागे ठामपणे उभा राहील, त्यांच्यासाठी प्रसंगी युद्धभूमीवर उतरेल असा इतर कोणताही देश नाही. त्यामुळे ‘तुझ्यावाचून जमेना अन् तुझ्याविना करमेना’ अशीच या दोन्ही देशांची दशा! चीन आपला वापर करतोय, याची पाकिस्तानलाही पूर्ण कल्पना असून, पाकिस्तान स्वत:च आपला वापर चीनला करू देतोय, हे लक्षात घ्यावे लागेल. कारण, चीनशी मिळतेजुळते घेतले, तर त्याच्याच बळावर पाकिस्तानला भारताला डोळे दाखवता येतात. त्यामुळे कुठे तरी भारतावर अंकुश ठेवण्यासाठीच या दोन्ही देशांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्याचे उद्योग चालवले आहेत. परंतु, पाकिस्तानच्या कळत-नकळत चीनने हा देश पोखरायला कधीच सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर या देशाच्या पंतप्रधानापासून ते लष्करशाहीपर्यंत अगदी सगळ्याच स्तरावर चीनचे मिंधे म्हणून पाकिस्तानी नागरिक वावरताना दिसतात. हीच चिनी रीत कायम राहिली, तर भविष्यात पाकिस्तानचा तिबेट होईल, तो दिवस दूर नाही.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@