प्रवाळ संकटात..

    22-Jun-2021   
Total Views | 120

coral_1  H x W:




ग्रीनहाऊस’मधील गॅस उत्सर्जनामुळे पूर्व-औद्योगिक काळापासून जागतिक तापमानामध्ये अंदाजे एक अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाळांच्या (कोरल) आम्लीकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘प्रवाळ रीफ’ ही जगातील एक संकटग्रस्त परिसंस्था म्हणून तयार होत आहे.


‘युनेस्को’च्या मते, आपण जर याच वेगाने ‘ग्रीनहाऊस’मधील वायूंचे उत्सर्जन करत राहिलो, तर या शतकाच्या अखेरीस ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ’ म्हणून मानांकित असलेल्या सर्व २९प्रवाळ रीफ’ अस्तित्वात राहणार नाहीत. तापमानात बदल होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रवाळ हे आपल्या उतींमधून ‘सिम्बिओटिक’ शेवाळ उत्सर्जित करतात. यामुळे प्रवाळांचा रंग बदलतो आणि त्यांचे आम्लीकरण होते. समुद्रातील तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ झाल्याने प्रवाळांचे आम्लीकरण होण्यास सुरुवात होते. प्रवाळांचे दीर्घकाळापर्यंत आम्लीकरण झाल्यास ते नष्ट होतात. जगभरातील ‘रीफ’-‘बिल्डिंग’ प्रवाळांपैकी एक तृतीयांश ‘प्रवाळ रीफ’ लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जगभरात मोठ्या प्रमाणात प्रवाळ आम्लीकरणाच्या घटनांमध्ये सातत्य दिसते. ऑस्ट्रेलियामधील ‘ग्रेट बॅरियर रीफ’ आणि अमेरिकेतील वायव्य हवाईयन बेटांवरील प्रवाळांवर हा परिणाम जाणवत आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये ‘ग्रेट बॅरियर रीफ’च्या आम्लीकरणामुळे जवळपास ५० टक्के प्रवाळ नष्ट झाले आहेत. वैश्विक तापमानामध्ये सतत वाढ होत राहिल्यास प्रवाळ आम्लीकरणाच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्याची तीव्रताही वाढेल. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, दर दशकात दोनदा होणार्‍या या घटनांमुळे प्रवाळांच्या मृत्युदरामध्ये वाढ होऊ शकते. या अनुषंगाने भारताचा विचार केल्यास लक्षद्वीप आणि अंदमान बेटानजीकच्या प्रवाळांचे आम्लीकरण समोर आले आहे. खासकरून लक्षद्वीप सागरी परिक्षेत्रातील ‘प्रवाळ रीफ’चे दरवर्षी आम्लीकरण होत असल्याचे निरीक्षण भारतीय समुद्री संशोधकांनी नोंदवले आहे. जागतिक पातळीवरील कोणत्याही परिसंस्थेपैकी सर्वाधिक जैवविविधता ही प्रवाळांमध्ये आढळते. ही परिसंस्था जगभरातील बहुतांशी गरीब देशातील ५०० दशलक्ष लोकांना थेट रोजगार देते.


प्रवाळांच्या संरक्षणासाठी...



समुद्राच्या पृष्ठभागाच्या ०. टक्क्यापेक्षा कमी भागावर आच्छादित असूनही, प्रवाळ हे जैवविविधतेचे भांडार आहेत. अनेक जलचरांसमवेत माशांच्या एकूण प्रजातींपैकी एक चतुर्थांशपेक्षा जास्त प्रजाती या प्रवाळांमध्ये आढळून येतात. याव्यतिरिक्त, ‘प्रवाळ रीफ’ या खाद्य, पुरापासून संरक्षण, मासेमारी आणि पर्यटन उद्योगाची संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांचे नष्ट होण्याचे परिणाम आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रावर दिसू शकते. २०१४ मध्ये ‘ग्लोबल एन्व्हायर्नमेंटल चेंज’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ‘प्रवाळ रीफ’चे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्य हे एक कोटी अमेरिकी डॉलर आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ने २०१५ साली केलेल्या अभ्यासानुसार नष्ट होणारी प्रवाळ परिसंस्था ही त्यावर आधारित संधींचे वर्षाकाठी ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान करेल, असे स्पष्ट झाले आहे. ‘प्रवाळ रीफ’ या जागतिक पर्यावरणाच्या आरोग्याचे मुख्य सूचकदेखील आहेत. हवामानबदलासंबंधी असणार्‍या पॅरिस कराराच्या अनुषंगाने ‘प्रवाळ रीफ’ना तग धरून ठेवण्यासाठी जागतिक तापमान हे पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. जर कराराची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास वायुमंडलातील कार्बनच्या एकाग्रतेत घट दिसून येईल, ज्यामुळे प्रवाळांच्या वाढीसाठी परिस्थिती सुधारेल आणि ते वाचवण्यासाठी इतर उपाययोजना यशस्वी होण्यास सक्षम ठरतील. स्थानिक प्रदूषण आणि विध्वंसक मासेमारीच्या पद्धतीही ‘प्रवाळ रीफ’ वाचवू शकतात. मात्र, त्यासाठी ‘ग्रीनहाऊस’ गॅस उत्सर्जनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. जागतिक तापमान कमी होण्याकरिता आर्थिक यंत्रणेला कमी ‘ग्रीनहाऊस’ गॅस उत्सर्जनाच्या दिशेने वेगाने जाण्याची आवश्यकता आहे. ‘प्रवाळ रीफ’ टिकवून ठेवणे आणि त्यांचे पुनःसंचयन करणे ही एक मालमत्ता मानली पाहिजे आणि त्यांच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून प्रवाळांच्या पुनःसंचयनाला सुरुवात होणार आहे.


 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121