मतभेद वैचारिक न राहता व्यक्तिगत होऊ लागलेत. अभिनिवेश इतका वाढलाय की, चांगुलपणादेखील नाकारला जातो आहे. सर्वोच्च त्यागाची खिल्ली उडवली जातेय. राजकीय पक्षांचे ‘आय.टी. सेल’ आणि वृत्तवाहिन्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे.
आजच सहज म्हणून फेसबुकवर मुलूखगिरी करताना काही मजेदार टिप्पणी वाचायला मिळाली. प्रत्येक टिप्पणी काही तरी टोकदारपणाने मांडण्याचा प्रयत्न करत होती. सगळेच विचारवंतांच्या थाटात मत प्रदर्शन करत होते आणि आपण म्हणतोय, मांडतोय तेच खरं आणि बरोबर आहे, असा एकूण आविर्भाव होता प्रत्येकाचा. मतंमतांतरांचा गलबला सध्या फारच जोरात असतो आणि फेसबुक काय, किंवा व्हॉट्स अॅप, अथवा इन्स्टाग्राम सगळाच उकिरडा. थोडा कचरा आणि घाण मीही केली तर काय बिघडले, हाच विचार प्रत्येकाचा.याचं मूळ खरंतर प्रिंट मीडियात सापडेल. मध्यंतरीच्या काळात अनेक बातम्या, अनेक वृत्तपत्रे खरेखोटे पडताळून न पाहताच छापण्यात पुढाकार घेत असतात. यांचेच ‘अॅडव्हान्स व्हर्जन’ (सुधारित आवृत्ती) म्हणजे आताच्या वृत्तवाहिन्या.
बदललेला काळ
कधी काळी समाजप्रबोधन करण्याचे साधन म्हणून वृत्तपत्रे, पाक्षिकं चालवली जात असत. यामध्ये वैचारिक वाद घडत असत. टिळक, आगरकर, पु. बा. भावे, अत्रे, माडखोलकर, असे वैचारिक आणि तात्त्विक वाद-विवाद झडत असत. पण, सत्याचा अपलाप कधी होत नव्हता. कारण, मूळ हेतू समाजप्रबोधन हाच असायचा. आर्थिक आणि राजकीय हितसंबंध फार नसत. सत्य वृत्त वाचकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचे मानले जात असे. गोविंदराव तळवलकर, विद्याधर गोखले, अरुण टिकेकर, गं. त्र्यं. माडखोलकर, मा. गो. वैद्य असे ताकदीचे संपादक होते, तोवर पत्रकारितेचे पावित्र्य जपले गेले. हळूहळू काळ बदलायला लागला. बातमी एकच असली तरी आकडेवारीत फरक पडू लागला. तरीही पहिल्या पानाची बातमी सगळ्यांची एकच असायची. ‘हेडलाईन’ वेगळी असली तरी बातमी तीच असायची. मग आकडेवारी आणि बातमीची जागा वेगळी झाली, पानही बदलले. आता तर बातमी, ‘हेडलाईन्स’, पान, आकडेवारी, बातमी देण्याची पद्धत सगळंच बदललं. मुख्य म्हणजे, वृत्तसेवा देणार्या संस्थांची उद्दिष्ट बदलली. पूर्वी भर बातमी देण्यावर असायचा, आता पक्षीय दृष्टिकोन बातमीच बदलून टाकतो. त्यामुळे वाचकही आपल्या पूर्वग्रहांवर ठाम राहतो. त्यालाही काही संपादक, पत्रकार यांच्या संपलेल्या विश्वासार्हतेची जाणीव झालेली असते.
समाजमाध्यमे व विद्वानांनी लादलेली लढाई
तथाकथित विद्वानांनी ठरावीक पक्षीय दावणीला बांधलेल्या विद्वत्तेची जाणीव सामान्य वाचकालादेखील झालेली असते. मग त्यालाही ढळढळीत दिसत असलेलं खोटं खरं वाटू लागते अन् खरं खोटं. ही असली पत्रकारिता, वृत्तसेवा काय साधू इच्छिते, हा एक प्रश्नच आहे. ही एक आभासी लढाई आहे. राजकीय पक्षांचे ‘आय.टी. सेल’, वृत्तवाहिन्या या आम्हाला आपापसात लढवण्याच काम, नव्हे पाप करताहेत. वास्तविक या बातम्या, टिप्पण्या आमच्या जीवनावर काहीच परिणाम करत नाहीत. पण, आभासी जगात यांनी भरवून दिलेले, कालवलेले विष आज आम्हाला असंवेदनशील बनवताहेत. मित्र मित्रांपासून दुरावताहेत. समाज तुकडे तुकडे होतो आहे. गैरसमजाची दरी अजूनच रुंद होते आहे. कोरोना महामारीनं प्रत्येक जण एकांडा झाला आहे. समोरासमोर मुद्देसूदपणे बोलणे संपल्यात जमा आहे. एकमेकांच्या श्रद्धांना नखं लावण्याच्या या उद्योगात आम्ही आदर आणि आपलेपणा आभासी जगातच गाडून टाकत आहोत. राजकीय पक्षांची सत्ता स्पर्धा त्यांच्या या ‘आय.टी. सेल’मार्फत ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, ज्याला सरकार कोणत्याही पक्षाचे असलं तरीही दुरान्वयानेही काही फायदा आणि फरकही पडत नाही, अशा सामान्य लोकांमध्ये दुरावा निर्माण करते आहे. मतभेद वैचारिक न राहता व्यक्तिगत होऊ लागलेत. अभिनिवेश इतका वाढलाय की, चांगुलपणादेखील नाकारला जातो आहे. सर्वोच्च त्यागाची खिल्ली उडवली जातेय. राजकीय पक्षांचे ‘आय.टी. सेल’ आणि वृत्तवाहिन्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे.
सार्वत्रिक मूल्यंच नाकारली जात आहेत
राष्ट्रवाद नाकारला जातो आहे. ज्या एकाच मुद्द्यावर संपूर्ण जगाचा आकार आणि देशांच्या सीमारेषा आखल्या गेल्या, ज्या मुद्द्यावर जगभर स्वातंत्र्य चळवळी उभारल्या गेल्या, तो मुद्दा नाकारला जातोय. तथाकथित लिबरल्स राष्ट्रवाद नाकारण्याच्या उन्मादात राष्ट्र नाकारताना दिसत आहेत. वास्तविक पाहता, विचारसरणी कोणतीही असो, ‘राष्ट्र’ ही संकल्पना उचलून धरली गेली आहे. लेनीन असो वा स्टॅलिन, गांधी, नेहरू, पटेल असोत वा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, राममनोहर लोहिया असोत की, भाई डांगे, ‘राष्ट्र’ ही संकल्पना सगळ्यांनीच सर्वतोपरी मानली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मवीर डॉ. मुंजे हे तर राष्ट्रच सर्वात महत्त्वाचे मानणारे. कारण, राष्ट्र म्हणजे जमिनीचा सीमारेषांनी युक्त असा तुकडा नसतो, तर त्या तुकड्यावर वस्ती करून असलेल्या मानवसमूहाच्या संस्कृती, आकांक्षा, परंपरा यांचा एकच एक आविष्कार असतो. त्यामुळे राष्ट्र आणि राष्ट्रवाद नाकारणे त्या समाजाचे, देशाचे भविष्यात प्रचंड नुकसान करणारे ठरते. सोव्हिएत रशियाचे विघटन हे यांचे उत्तम उदाहरण ठरते. मानवसमूहाची संस्कृती, आकांक्षा, परंपरा नाकारणे म्हणजे त्या मानवसमूहाला त्याच्या मुळांपासून तोडणे ठरते. दुसरीकडे तथाकथित राष्ट्रवादी, लिबरल्सच्या राष्ट्रभक्तीविषयीच शंका घेताना दिसतात. उदारमतवादी असले आणि चीन, रशियाकरिता त्यांच्या मनात विशेष संवेदना असल्या तरी तेही या देशाप्रति प्रेम ठेवतात, या देशाला आपलं मानीत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.तेव्हा नाकारायचेच असेल तर राजकीय पक्षांच्या ‘आय.टी. सेल’चे मेसेजेस नाकारा. माणसामाणसांत मतं-मतांतरं असतातच. त्यातही प्रत्येकाची तत्त्व आणि मूल्यप्रणाली वेगळी असते हे मान्य करू. काही तत्त्व सर्वोच्च ठेवून, मतंभिन्नतेसह माणसाप्रति आदर आणि आपलेपणा बाळगूयात. शेवटी जगायचं याच माणसांत आहे.
- डॉ. विवेक राजे