समाजमाध्यमे आणि त्याची सजगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2021   
Total Views |

social media _1 &nbs



आधुनिक काळात अभिव्यक्त होण्यासाठी समाजमाध्यम हे एक उत्तम साधन सर्वांच्या हातात आले आहे. 'I am not answerable to anybody, it's my space' या व अशा प्रकारच्या आविर्भावात अनेक लोक सोशल मीडियाचा वापर अनिर्बंध पद्धतीने करताना दिसतात. आपण आपले काम इतके बेमालूम पद्धतीने करतो की, कोणतेही डिजिटल फूटप्रिंट मागे सोडत नाही. असा एक दुर्दम्य आत्मविश्वास काही लोकांना असतो.



मात्र, इंग्लंड क्रिकेट संघातील उदयोन्मुख गोलंदाज ओली रॉबिन्सन याला त्याने आठ-दहा वर्षांपूर्वी केलेल्या समाजमाध्यमातील वक्तव्यावरून संघातून निलंबित करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे समाजमाध्यमे आणि ती वापरण्याची सजगता याबाबत पुन्हा एकदा ‘आत्मीयमंथन’ होणे आवश्यक आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाज माध्यमांचा वापर कसा जागरूकपणे करायला हवा, याचा धडा या घटनेतून निश्चितपणे मिळायला हवा.

वयाच्या अठराव्या वर्षी समाज माध्यमांवर जे मत रॉबिन्सनने व्यक्त केले होते त्याचा फटका त्याला नऊ वर्षांनी म्हणजे वयाच्या २७ व्या वर्षी बसेल आणि ज्या दिवशी त्याची क्रिकेट कारकिर्द खर्‍या अर्थाने सुरू होणार होती, त्याच दिवशी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम मिळेल, हे अगदी स्वप्नवत ठरणारे आहे. ओली रॉबिन्सनने काही वर्णभेदी आणि लिंगभेद विषयाची ट्विट्स केली होती. त्यावेळीही त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तेव्हा त्याने त्याबद्दल माफी मागून ती ट्विट्स मागे घेण्याचा प्रयत्न केला होता.

नऊ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यांमध्ये जेव्हा त्याचा इंग्लंडच्या क्रिकेट संघात समावेश झाला. तेव्हा या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ती जुनी ट्विट्स पुन्हा समाज माध्यमांवर प्रदर्शित झाली आणि नव्याने गदारोळ निर्माण झाला. अखेर इंग्लिश क्रिकेट बोर्डाला रॉबिन्सनवर कारवाई करून निलंबित करावे लागले. पूर्वी केलेल्या चुकीचे पुरावे पुन्हा एकदा अशा प्रकारे समाज माध्यमांवर कसे प्रदर्शित होतात, हा संशोधनाचा विषय नक्कीच आहे. मात्र, नकळत्या वयात केलेल्या चुकांचा तोटा नंतरच्या काळातही होतो, हे यावरून दिसून येते. समाजमाध्यमांचा वापर किती सजगपणे आणि जागरूकपणे करायला हवा हेसुद्धा या घटनेने अधोरेखित होत आहे. इंग्लिश बोर्डाने रॉबिन्सनवर केलेली कारवाई खूपच कडक आहे, अशा प्रकारची मते व्यक्त होत असली, तरी सध्याच्या परिस्थितीत इंग्लिश क्रिकेट व्यवस्थापनासमोर दुसरा अन्य पर्यायदेखील नाहीच.


जी आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने त्याने केली होती, ती नकळत्या वयात आणि अनावधानाने केली होती, असा युक्तिवाद जरी करण्यात येत असला तरी अजूनही रॉबिन्सनच्या मनात त्याच भावना नसतील हे कशावरून, याची हमी देता येत नाही. जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंड क्रिकेट संघात इतर वंश व राष्ट्रे यांचे खेळाडू आहेत. कृष्णवर्णीय खेळाडू आणि कृष्णवर्णीय (अश्वेतवर्णीय) नागरिकांबाबत ट्विटरवर टिप्पणी केली आहे, तो रॉबिन्सन इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळताना जोफ्रा आर्चर यासारख्या कृष्णवर्णीय (अश्वेतवर्णीय) क्रिकेटपटूसोबत कसे काय जुळवून घेऊ शकतो, हा विषय आता चर्चिला जात आहे.


जोफ्रा आर्चरसारख्या अनेक कृष्णवर्णीय (अश्वेतवर्णीय) खेळाडूंच्या मनात रॉबिन्सनसारख्या गौरवर्णीय खेळाडूंबाबत काय भावना असतील, याचाही विचार यानिमित्ताने करायला हवा. वरवर पाहता रॉबिन्सनवर करण्यात आलेली कारवाई खूपच कडक वाटत असली, तरी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आणि युवा क्रिकेटपटूंना योग्य धडा मिळावा म्हणून ही कारवाई योग्यच मानायला हवी. भारतीय गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले आहे की, सोशल मीडियावर तुम्ही व्यक्त केलेली मते कधीच नष्ट होत नाहीत. ती कधी पुढे येऊन तुम्हाला त्रास देतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ही माध्यमे वापरताना काळजी घ्यायलाच हवी. हा संदेश केवळ खेळाडूंसाठी नाही, तर समाजातील सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानावा लागेल. एखाद्या खेळाडूचे किंवा व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्याने पूर्वी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेली मते अशा प्रकारे जर काही वर्षांनी समोर येत असतील तर समाजमाध्यमांबाबत सजगता आणि साक्षरता यांची गरज प्रतिपादित होत आहे.



@@AUTHORINFO_V1@@