भारतातील पक्ष्यांच्या यादीत भर; अरुणाचल प्रदेशामध्ये आढळला 'हा' दुर्मीळ पक्षी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2021   
Total Views |
bird _1  H x W:




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
भारतातील पक्ष्यांच्या यादीत भर पडली आहे. कारण, 'थ्री - बॅन्डेड रोजफिंच' या पक्ष्याची भारतामधून प्रथमच छायाचित्रित नोंद करण्यात आली आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांच्या पथकाने अरुणाचल प्रदेशमधील जंगलामधून या पक्ष्याची नोंद केली आहे. ही प्रजात दक्षिण चीनमधील स्थानिक असून ती भूतानपर्यंत स्थलांतर करते.
 
 
'बीएनएचएस'चे सहाय्यक संचालक डाॅ. गिरीश जठार आणि त्यांचे पथक हे सध्या पूर्व हिमालयात 'फिंच' पक्ष्यांचे सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणादरम्यान संशोधक अर्थव सिंह आणि हिमाद्री शेखर मोंडल यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला पास परिसरात 'थ्री - बॅन्डेड रोजफिंच'च्या नर आणि मादीचे छायाचित्र टिपले. या परिसरात सामान्यपणे दिसणाऱ्या 'व्हाईट-ब्राऊड रोजफिंज' पक्ष्यांसमवेत ही जोडी त्यांना दिसली. याविषयी अथर्व सिंह म्हणाले की, चीनमधून भूतानकडे स्थलांतर करताना 'थ्री - बॅन्डेड रोजफिंच' पक्षी अरुणाचल प्रदेशातील या जंगलाचा भ्रमणमार्ग म्हणून वापर करत असावा. त्यामुळे हा परिसर या प्रजातीचा स्थलांतरचा मार्ग असण्याची शक्यता आहे.
 
 
चीनमध्ये ज्या उच्चतम भागातून या प्रजातीच्या अधिवासाची आजतागायत नोंद आहे. त्या अधिवासापेक्षाही उच्चतम भागात ती भारतामध्ये आढळून आल्याची माहिती डॉ. गिरीश जठार यांनी दिली. संशोधकांनी केलेली ही नोंद 'इंडियन बर्ड्स' या जर्नलमध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. भारतामधून आजतागायत १,३४० प्रजातींची नोंद झाली आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि हौशी पक्षीनिरीक्षकांकडून दुर्गम भागात सुरू असलेल्या पक्षीनिरीक्षणामुळे भारतामध्ये बर्‍याच पक्ष्यांची नव्याने नोंद झाली आहे. २०१६ पासून भारताच्या पक्ष्यांच्या यादीत १०४ प्रजातींची भर पडली आहे. २०२० मध्ये यामध्ये तीन आणि २०२१ मध्ये पाच प्रजातींची भर पडली आहे.

@@AUTHORINFO_V1@@