राजगडावर सापडली पालीची नवी प्रजात; गडाच्या नावे पालीचे नामकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2021   
Total Views |
rajgadh _1  H x



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्रीच्या उत्तरेकडील डोगररागांमध्ये असलेल्या राजगड किल्ल्यावरुन पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'निमास्पिस' कुळातील या पालीचे नामकरण राजगड किल्ल्याच्या नावे 'निमास्पिस राजगडएन्सिस', असे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पाल राजगड परिसराला प्रदेशनिष्ठ आहे, म्हणजेच जगामध्ये ती इतर कोणत्याही ठिकाणी आढळत नाही.
 
 
 
मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहेच. मात्र, आता या किल्लाचे जैवविविधतेच्या अनुषंगाने असलेले महत्त्वही समोर आले आहे. कारण, राज्यातील चार तरुण वन्यजीव संशोधकांनी या किल्यावरुन पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. अमित सय्यद, विवेक फिलिप सिरियॅक, अनिष परदेशी आणि शौरी सुलाखे या संशोधकांनी पालीच्या 'निम्पासिस' कुळातील नवी प्रजात शोधली आहे. ‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात.
 
 
 
भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. भारतामध्ये ‘निमास्पिस’या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या पश्चिम घाट, मैसूरचे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबर बेटांवरती आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्या नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत.
 
 
 
राजगडावर सापडलेल्या नव्या पालीच्या शोधाचे वृत्त आज 'इव्होल्यूशनरी सिस्टीमॅटिक्स' संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातील सर्वेक्षणादरम्यान ही पाल राजगड किल्ल्यावरील पाली दरवाजाच्या परिसरातील दगडांमध्ये सर्वप्रथम दिसल्याची माहिती संशोधक अनिष परदेशी यांनी दिली. त्यानंतर तिचे नमुने गोळा करुन आकारशास्त्र आणि गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती विज्ञानासाठी नवीन असल्याचे समजल्याचे त्यांनी सांगतिले. या पालीचा आकार २७ मिलीमीटर असून ती 'निमास्पिस' कुळासह देशात आजवर शोधलेली आकाराने सर्वात छोटी पाल असू शकते. ही पाल केवळ राजगडाच्या पाल दरवाजाच्या परिसरामध्येच सापडते.
 
 
 
'निमास्पिस राजगडएन्सिस' या नव्या पालीच्या शोधामुळे राजगडाला ऐतिहासिक बरोबरीनेच जैवविविधतेच्या दृष्टीने देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्रकारच्या प्रदेशनिष्ठ जीवांचा ठेवा इतर गडकिल्ल्यांनाही लाभला आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांची दुरुस्ती करताना प्रदेशनिष्ठ जीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणार नाहीत, यादृष्टीने देखील काळजी घेणे आवश्यक आहे. - अनिष परदेशी, वन्यजीव संशोधक

@@AUTHORINFO_V1@@